हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं. वेगानं वाहणारी गंगा, तिचा वाहताना होणारा आवाज, दिवसाच्या वेळी जाणवत नसला तरी, रात्री दहानंतरच्या निरव शांततेत हा आवाज मंत्रजागरासारखा जाणवतो.
किंचित हिरवट झांक असणारं ते पाणी गेली कित्येक शतकं तसंच वाहतं आहे आणि पुढेही वाहणार आहे. हरीद्वारपासून पुढे वीस-पंचवीस किलोमिटरवर असणाऱ्या ऋषीकेशला गंगेचं पाणी निळसर आहे. हरीद्वारची गंगा हिरवट आणि ऋषिकेशची निळसर असं का, याचं शास्त्रीय कारण माहित असलं तरी अशा ठिकाणी त्याचा उहापोह करू नये असं मला वाटतं. काही कुतुहलं ही कुतुहलंच राहीली पाहीजेत, नाहीतर त्यातली मजा निघून जाते. आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्तात, रक्ताच्या गुठळ्या करणारीही रसायनं असतात. तरी कुठे जखम झाली तरच तिथल्या रक्ताची गुठळी करणारी ती रसायनं, आपल्या शरीरातल्या रक्ताच्या एरवी गुठळ्या का करत नाहीत, याचं शास्त्रीय कारण माहित असलं तरी त्याचा विचार करू नये, त्याचं कुतुहल राहू द्यावं. चंद्र पृथ्वीवर पडत का नाही याचं उत्तर माहीत असलं तरी तरी ते गुलदस्त्यात असलेलंच जगण्यासाठी चांगलं. नाहीतर बायकोसाठी प्रेमानं आणलेल्या पांच रुपयांच्या गजऱ्याचा हिशोब आॅडीटमधे लावण्यासारखं असंतं. सायन्सनेही सर्व कुतुहलांचा उलगडा अवश्य करावा, पण त्याची चर्चा करू नये.
बघा, मला गोष्ट सांगायची ती वेगळीच आहे आणि मी एकदम शास्त्रावर घसरलो. मोकळ्या आभाळाखाली, वाहत्या नदीकिनारी मनही असंच मोकळं होऊन वढायं वढायं होऊ लागतं. आणखी एक, इथं हरीद्वार, ऋषीकेशला गंगेच्या पाण्याला ‘पाणी’ न म्हणता ‘जल’ म्हणतात आणि आपणही तसंच म्हणावं हा तिथल्या लोकांचा आग्रह असतो. मी मात्र सोयीसाठी पाणीच म्हणणार आहे. परत गंगेसोबत वाहत गेलो बघा.
आमच्या हाॅटेलातून समोर गंगा वाहताना दिसते. पहाटे साडेतिनपासून गंगेत आंघोळ करण्यासाठी लोक येत असतात. गंगेच्या त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यात लोक विलक्षण श्रद्धेनं आंघोळ करताना दिसतात. स्त्री, पुरूष, वृद्ध एवढंच कशाला नखावढ्या पोरांनाही त्या पवित्र पाण्यात यथेच्छ बुचकळवून काढत असतात. हे ठिकाणच असं आहे, की इथं लाज-लज्जा-शरम हे पांढरपेशे शब्द आपल्या आजुबाजूलाही फिरकत नाहीत. स्त्री-पुरूष हा शारीर भेद इथं मनातही फिरकत नाही आणि त्यामुळे दिसतही नाही, मनात असते आपण सारी गंगेची लेकरं हीच भावना..!
आमच्या हाॅटेलच्या समोरच एक फुलवाली बसते. गंगापुजनासाठी लागणारी फुलं, प्रसाद, पणती वैगेरे वस्तू एका द्रोणात भरून ती विकत असते. गेले दोन दिवस मी तिला बघतोय. सकाळी साडेपांच वाजता सुर्योदयाच्या सुमारास ती येते. आली की प्रथम तिची बसायची जागा झाडून स्वच्छ करते आणि मग गंगेकडे जाऊन पांच मिनिटं गंगेची प्रार्थना करते. ती गंगेला काय सांगते हे कळत नाही पण तिच्या चेहेऱ्यावरची ती विलक्षण श्रद्धा बरंच काही सांगून जाते. माझं आणि माझ्या बालबच्च्यांची पोट असंच भर असंच ती आई, गंगाईला सांगत असणार. एक आई आणखी काय मागणार आपल्या आईकडे? इथं येणाऱ्या माझ्यासहीत सर्वांची भावना हीच असचे.
खरंच, गंगा किती पिढ्यांची पोषणकर्ती आहे. आणि पुढे किती पिढ्या तिच्या स्तन्यावर पोसल्या जाणार आहेत कुणास ठाऊक. आपल्या सर्वांच्या रक्तात तिचंच पाणी असल्यानं की काय माहित नाही, पण तिच्या किनारी आल्यावर, तिचीच लेकरं असलेल्या आपल्या सर्व भावंडांतला प्रांत-जात-थर-वयभेद आपोआप लयाला जातो व आपण केवळ माहेरी आलेल्या माहेरवाशीणीसारखे होतो..आईच्या कुशीत, तिच्या पाणीरुपी पदराशी खेळताना आपण फक्त तिची लेकरं होतो. आईला सर्व लेकरं सारखीच. आपण नक्की कोण आहोत हे जाणून घ्यायचं असेल, तर एकदा तरी या माहेरी यायलाच हवं. गंगेची माया खरी, बाकी सर्व मायावी..!!
-नितीन साळुंखे
9331811091
२४ मे, २०१७
हरीद्वार.
Leave a Reply