गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त वेळ मिळत नाही. हवं तेव्हा, हवं तिथे हवं ते खाता येत नाही. फोटो काढण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. एकच फायदा म्हणजे रस्ता कळतो. असाच हा भीमाशंकर ते खांडस मी ट्रेक केला. ट्रेक भर उन्हाळ्यात होता. आदल्या दिवशी आम्ही भीमाशंकरला मुक्कामी होतो. सकाळी लवकर उठून आम्ही चालायला सुरवात केली होती. आधी एकदा रस्ता चुकलो. मग पुन्हा योग्य रस्त्यावर आलो. मोठे ग्रुप बरोबर असताना असे रस्ते चुकणे योग्य नाही, पण रस्ता चुकला नाही तर ट्रेक पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. या ट्रेकचे दोन रस्ते आहेत असं ऐकतो. एक शिडीची वाट आणि दुसरी गणपती घाटाची वाट. शिडीची वाट अधिक अवघड आहे असं ऐकलय, आम्ही मात्र तुलनेनी कमी कठीण अशा गणपती घाटाच्या वाटेनीच गेलो होतो. पहिला उताराचा एक मोठा टप्पा पार करून आल्यावर थोडा पठाराचा भाग आहे. डोंगरावरून पाहताना तिथे गाव असावं असं वाटत. पण तिथे गेल्यावर असं काही नाही हे लक्षात आलं. सिंहगडावर जाताना अनेक ठिकाणी जसे लिंबू सरबत किंवा ताक विकायला माणसं बसतात, त्यांची ती कच्ची दुकानं कशी असतात तसं एक लाकडी बंधाकाम आम्हाला लागलं. कच्च बांधकाम होतं. फक्त चार खांब, त्याच्यावर तिरके टाकलेले वर काही खांब, आणि त्यांच्यावर झावळ्या. बसायला सुद्धा झाडाचं खोड आडवं टाकून आधार केलेला. जागा छान होती. आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ थोडी पोटपूजा केली. आणि पुढे निघालो. पण माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला. या ट्रेकच्या आधीच माझा एकट्यानी राजमाचीचा ट्रेक करून झाला होता. राजमाची नंतर ही भीमाशंकरची जागा डोक्यात बसली. ट्रेक यथावकाश पूर्ण झाला. आम्ही पुण्यात आलो.
आता एखादी ट्रेकिंगची कल्पना डोक्यात शिरली कि ती स्वस्थ बसून देत नाही. एकटं भीमाशंकरला जायचं. आणि आधी गेलो होतो त्याप्रमाणे नियोजन न करता रात्री मुक्कामाला ‘त्या’ ठिकाणी जायचं, आणि सकाळी उठून पुढे खांडसला जायचं!
मग एक दिवस नक्की केला. आदल्या रात्री घरातले बाकीचे सगळे झोपल्यावर मी माझी बॅग भरली. बॅग म्हणजे काय होतं, खाली अंथरायला एक घोंगडी, एक पांघरायला शाल.. खायचं सामान उद्या घरातून बाहेर पडलो कि घेऊ असं ठरवलं. आणि बॅग घराच्या दरवाज्याजवळ आणून ठेवली. सकाळी लवकर उठलो, लायब्ररीमध्ये जातो असं सांगून सकाळी लवकर बाहेर पडलो. तयार केलेली बॅग उचलून बाहेर पडलो. थेट स्वारगेटला गेलो. तिथे गेल्यावर कळलं थेट भीमाशंकर गाडी दुपारी होती, मी स्वारगेट वर पोहोचलो होतो सकाळचे सातला. थोडी संत्री, अंजीरं, थोड्या काकड्या, गाजरं असं सामान विकत घेतलं. थेट नाही तर गाडी बदलून जावू, असा विचार करून राजगुरुनगरची गाडी मिळाली. तिकडे गेलो. जाताना एसटी पंक्चर झाली. एरवी मी वैतागलो असतो. पण मला वेळ हवा होता. माझं लक्ष भीमाशंकरच्या जंगलात येणाऱ्या रात्रीवर होतं. भीमाशंकरच्या शंकराच्या मंदिरापासून ती जागा तासादीड तासाच्या अंतरावर होती, त्यामुळे भीमाशंकर हुन दुपारी दोन-अडीच पर्यंत निघालो पुढे चालायला तरी चालणार होते. यथावकाश मला राजगुरुनगरला पोहोचायला साडेनऊ झाले. मग मी तिथे पण थोडा टाईमपास केला. तिथून सुद्धा थेट एसटी नव्हतीच. पण मी विचार केला कि भीमाशंकरला जाऊन वेळ घालवावा. मग मी वडाप पकडली, तिने मला अकरापर्यंत भीमाशंकरला पोहोचवलं. अधिक वेळ न घालवता मी थेट मंदिरात गेलो. मी प्रचंड घाबरट आहे. माझा भूत-पिशाच्च वगैरेंवर अजिबात विश्वास नाही, पण त्यांच्या गोष्टी ऐकायला मला आवडतात. त्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या. एकांताच्या ठिकाणी त्या नेमक्या आठवतात. त्याच्यावर उपाय म्हणून मग मी गाणी म्हणतो, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणतो वगैरे. पण अजून दिवस सुरु होता, परिसरात माणसांची वरदळ सुरु होती. मी आपला गाभाऱ्यात गेलो. फुलांचा वास त्या गाभाऱ्यात तुंबला होता. मी तिथे प्रार्थना केली, उद्यापर्यंत लक्ष ठेवून असा. बाहेर पडलो गाभाऱ्यातून. वेळ तर भरपूर होता. गुप्त भीमाशंकर पाहून येऊ असा विचार करून तिकडे निघालो. एक सांगायचं राहिलं दिवस अजून उन्हाळ्याचेच होते. पण सगळा परिसर अभयारण्याचा आहे, त्यामुळे कायम हवेत गारवा हा असतोच. गुप्त भीमाशंकरला उन्हाळ्यात पाहण्यासारख काहीच नव्हतं. धबधब्याच कोरडं पात्र. आणि गरम तापलेला काळा दगड. त्यात कातळाच्या सावलीत शंकराची छोटीची पिंड आणि समोर नंदी, नंदी मात्र उन्हात होता. तो परिसर मात्र वर्दळीपासून लांब होता, त्यामुळे शांत होता. माझ्या डोक्यात भुतांच्या गोष्टी नाचू लागल्या. मग मी ठरवून किशोर कुमारची दर्दभरी गाणी जोरात म्हणायला सुरवात केली. अशी तीन-चार गाणी म्हणून झाली. मग गाणीही आठवेनाशी झाली. तोपर्यंत साडेबारा होऊन गेले होते. मग मी एक गाजर एक काकडी खाल्ली. वेळ तर अजून भरपूर होता. मग बसून राहिलो तिथेच. वातावरण शांत होतं. मग मी मोबाईल काढला आणि अण्णांचा वृंदावनी सारंग लावला. डोळे मिटून बसलो. त्यांनतर भुतांच्या गोष्टी पण थांबल्या. आणि एकटं वाटणही बंद झालं. मग तो संपल्यावर उठलो. एक वाजून गेला होता. पुन्हा मुख्य मंदिरापर्यंत आलो. दुपारची गर्दी कमी होती. पुन्हा एकदा गाभाऱ्यात गेलो. पुन्हा तीच प्रार्थना. फक्त गुप्त भीमाशंकर पासून मुख्य मंदिरापर्यंत येताना अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांचे माहितीपर बोर्ड लावले आहेत. त्यात अनेक फुलपाखरं, पक्षी, शेकरू मुख्य. मग बाकीचे प्राणी वगैरे होते. त्यात बिबट्या सुद्धा भीमाशंकरच्या अभयारण्यात आहे असं मी वाचलं त्या बोर्डवर मग घाबरलो. माझ्याकडे कोणतही हत्यार नव्हतं. स्व संरक्षणासाठीच कोणतही साधन नव्हतं. आणि मी तर जंगलात राहायचं म्हणत होतो. एकदा विचार केला, कि नको.. आपण इथेच थांबू आणि सकाळी पुढे चालायला सुरवात करू. पण तो विचार किती क्षणभरच टिकला.
मागच्या वेळी ग्रुप बरोबर आलो होतो तो रस्ता माझ्या लक्षात होता. त्यामुळे न चुकता मी निघालो. मी गेलो होतो तो दिवस मी ठरवून विकेंड निवडला नव्हता किंवा गुरवार सुद्धा नव्हता. मी ठरवून मंगळवार निवडला. सोमवारी सुद्धा शंकराला डिमांड भरपूर. त्यामुळे मला एकटाच कुठे चाललास, एकटं फिरू नये वगैरे उपदेश देणारे कोणी भेटणार नाहीत अशी अपेक्षा ठेऊन मी गीवास निवडला होता. माझ्या नियोजित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी फक्त उतरावं लागतं. आणि सगळा जंगलाचा प्रदेश असल्यामुळे कडक ऊन असून सुद्धा त्याचा त्रास असा होत नव्हता. मी अगदी आरामात चालत होतो. सूर्यास्त मला त्या स्पॉट वरून बघायचा होता. म्हणून कोणतीही गडबड न करता मी चाललो होतो. फोटो काढत होतो. जमेल तिथे जंगलाचा व्हिडीओ सुद्धा बनवत होतो. मी काही जंगलाचा अभ्यासक नाही, त्यामुळे मला पक्ष्यांची किंवा फुलपाखरांची विशिष्ट नावं काही माहिती नव्हती. पण मी असंख्य पक्षी पहिले निरनिराळ्या रंगांचे आकाराचे. फुलपाखरंही भरपूर पहिली. अगणित प्रकारची झाडं.. एकटं असलं म्हणजे हे बघता येतं. ग्रुप असेल तर ट्रेक वेळेत पूर्ण करण्यावरच सगळा भर असतो. असं भरपूर बघत मी चाललो होतो. माझ्या इतक लक्षात होतं कि पहिल्या उताराचा टप्पा पार झाला कि थोडी सपाटीची जागा आहे, कि तिथेच लगेच माझा नियोजित स्पॉट.. पण उताराचा पहिला टप्पा संपवून मी सपाटीला आलो तरी ती जागा दिसेना. रस्ता सुद्धा मळलेला वाटत नव्हता. किंबहुना मी मागे पाहिलं तर त्याला रस्ता सुद्धा म्हणणं अवघड होता. मग मात्र माझी तंतरली. तीन-सव्वातीन होऊन गेलेलं होते. आणि आताचा मुख्य प्रश्न होता रस्ता शोधायचा. अशा वेळी सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ‘पॅनिक’ न होण्याचं. पण मी झालो. लगेच अस्वस्थ झालो. ‘पॅनिक’ झाल्यामुळे दिशा सुद्धा कळेनाश्या होतात. तसचं माझही झालं.
पण माझ्या हे लक्षात आलं कि पॅनिक न होणं महत्वाच. all is well वाला प्रकार स्वतःला समजावून सांगितला. दिशांचा अंदाज घेतला. आणि त्या लक्षात आल्या. आपल्या जायचं कुठे ‘खांडस’ला ते भीमाशंकरच्या नेमक्या कोणत्या दिशेला आहे हे आठवलं आणि चालायला लागलो. चालता चालता माझं मुक्कामाच प्लॅनिंग सुद्धा बदलून टाकलं. चालण्याचा वेगही वाढवला. तसा अर्धा तास चाललो आणि माझी नियोजित जागा समोर आली. भीमाशंकरच्या डोंगरावरून जिथे उतरायचं त्याच्या मागे मी उतरलो चुकून, म्हणून सगळी गडबड झाली.. मला आनंदही झाला आणि टेन्शनसुद्धा. जशी गेल्यावेळी मी ती जागा पहिली होती ती आजही तशीच होती. आजूबाजूची झुडपं वाढलेली. पण माणसाचा वावर तिथे होता एवढं काळात होतं. कारण ती जागा स्वच्छ होती. कचरा किंवा पाचोळा दिसत नव्हता. कदाचित ती छोटी टपरी शनिवार रविवार येणाऱ्या ट्रेकर्सना लिंबू पाणी किंवा ताक विकणारी असेल. आज मात्र मी सुनसान होती. चार-सव्वाचार झाले असतील. ऊन उतरतीला लागलेलं कळत होतं. पण अजून तो चांगला हातभार वर होता. सूर्यास्त व्ह्यायला अजून भरपूर वेळ होता. पण तितक्या वेळात मी खांडस पर्यंत पोहोचू शकलो नसतो. मग पुन्हा मी मुक्कामाचा विचार पक्का केला.
आता मला पुढंच टेन्शन होतं. माझ्याशिवाय आई बाबांना चैन पडत नाही. त्यांचा फोन येईल तेव्हा काय करायचं? काय सांगायचं? कोणाला फोन करायला रेंज सुद्धा मिळेना. मग मी माझी बॅग त्या टपरीच्या एका खांबाला टेकवून उभी केली. बॅगेतून एक काडकी आणि गजर घेऊन रेंज शोधायला बाहेर पडलो. अर्धा पाउण तास पायपीट केल्यावर थोडीशी रेंज मिळाली. मी विष्णूला फोन करून सांगितलं, ‘कि आई ला फोन करून सांग मुकुलच्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, तो बसलाय अभ्यास करत. आणि बहुतेक तो आज रूम वरच थांबले’ आणि बाकीचं तू मॅनेज कर. उद्यापर्यंत मला फोन येता कामा नये.’ खरंच खूप चांगला मित्र आहे माझा. आई बाबांचा खरच फोन आला नाही मला. पण तेव्हढा विष्णूला फोन करून मी बॅग ठेवली होती तिथे येऊन बसलो. मग लक्षात आलं कि रात्री आपल्याला थांबायचं तर शेकोटी केली पाहिजे. आणि तर त्या अंधारात जीव नको होईल. पुन्हा मी उठलो. उन्हालाच असल्यामुळे कोरड्या लाकडांचा तुटवडा नव्हता. कोरडं गवतही तितकंच. अस सगळं साग्रसंगीत घेऊन आलो. चागला तासभर मी वाळकी लाकडं नि गवत तोडत होतो. रात्रभराची सोय करायची होती. यासगळ्यात भरपूर वेळ गेला. सूर्य बुडून गेला आणि माझ्या लक्षातही नाही. आणि खरं म्हणजे मी जिथे होतो तिथे झाडीच इतकी होती कि सूर्यास्त दिसलाही नसता. आता संधिप्रकाश पसरला होता. भूतांची दुसरी लाडकी वेळ. पहिली मध्यरात्री आणि दुसरी संध्याकाळी. मी घाबरायला सुरवात झाली. पण धीर धरून होतो मी. भीत होतो पण धीर सोडला नव्हता. कुठेतरी गुंतवून घ्यायचं म्हणून मी पुन्हा मोबाईल काढला हेडफोन कानात टाकले आणि गुलाम आली लावला. त्याच्या चांगल्या पंधरा-वीस मोठया गझल माझ्याकडे होत्या. मी त्या ऐकल्या. मग पोटात गुडगुड करायला लागलं.. मी संत्री काढली, सोलून एक एक फोड गुलाम आली च्या एका एका शेर बरोबर तोंडात टाकत होतो. गझल संपल्या. संत्री सुद्धा संपली. पोटातली गुडगुडही थांबली.
मला झोप कधीच त्रास देत नाही. माझ्या आयुष्यात तिच्याइतकी कार्यक्षम कोणीच नाही. डोळे मिटले कि मला झोप लागते. पण आज जास्तीत जास्त जगायचा माझा विचार होता. साडे आठलाच मध्यरात्री सारखा अंधार पडला होता. कुठून तरी मला कोल्हेकुई सुद्धा ऐकू आली. प्रचंड घाबरून मी जागेवरून उठलो. जमवलेली लाकडं एकत्र केली. गावात घेतलं आणि आणि जाळ तयार केला. शेकोटी करण्याआधी ती जागा स्वच्छ करून घेतली. थोडा खड्डा खणून त्यात एक जाड लाकडाचा बुंधा उभा केला. बाजूनी थोडी कमी जाड रचली सगळ्याच्या मध्ये गावात भरलं. आणि माझ्या हातानी निर्माण केलेलं ते शिल्प पेटवून दिलं. मधलं गावात भुरभूर पेटून गेल, पण माझी मेहनत वाया गेली नाही. जसं अपेक्षित होतं तसचं ते पेटलं. त्याच्या उजेडात माझी झोपयची जागा थोडीची साफ करून घेतली. साफ म्हणजे काय, दगडं थोडी बाजूला करायची इतकंच. बरोबर आणलेलं घोंगडं खाली अंथरलं आणि त्याच्यावर जाऊन बसलो. मी किती घाबरलो होतो हे मला सांगायची गरज वाटत नाही. ते कोणालाही कळू शकतं. बेक्कार घाबरलो होतो. ते इसापनीतीतल्या गोष्टीत बघा सश्याच्या पाठीवर झाडाचं पान पडत, आणि तो पळत सुटतो तसं प्रत्येक छोट्या मोठ्या आवाजाला माझं होत होतं. पूर्वी ऐकलेल्या सगळ्या गोष्टीतली भूतं समोर नाचायला लागली. पूर्वी एकदा ‘कोकणातले देव’ नावाचं पुस्तक मी वाचलेलं, त्यात भूतांचे प्रकार, त्यांना ओळखायचं कसं, ते सापडण्याची ठिकाणं, त्यांचे अॅक्टिव्ह होण्याचे काळ अशी सगळी रंजक माहिती त्यात होती. एरवी स्मरणशक्ती इतकी साथीला येणार नाही. पण एकटा असलो कि ती तत्परतेने येते. त्या ‘कोकणातले देव’ मधली एकेक भूतं मला समोर दिसायला लागली. शेवटी मी आडवा झालो. कुशीवर झोपलो आणि डोळ्यासमोर पेटवलेली शेकोटी येईल असा झोपलो. झोप येत नव्हतीच. झोपण्याचा प्रयत्न केला पण ती काही साथ देईना. शेवटचा निर्वाणीचा प्रयत्न केला तो ही फेल. मग पुन्हा उठून बसलो. हॅरी पॉटर ज्याप्रमाणे वॉल्डमॉर्ट समोर आल्यावर आनंदाचे प्रसंग आठवतो त्याच प्रयत्नात मी पण लागलो. कानात हेडफोन होतेच. आता कुमार गंधर्वांचा ‘श्री’ सुरु होता. मी ऐकलेल्या रागांपैकी सर्वात गंभीर राग. म्हणजे तो सुरु झाला कि वातावरण गंभीर होऊन जातं. पण मी तो बदलला नाही. डोळ्यासमोर शांत पेटलेली शेकोटी. पण डोळ्यात आनंदाचे प्रसंग आणि कानात श्री! आजूबाजूला नाचत असलेले ‘कोकणातले देव’ सुद्धा माझ्या कानाला कान लावून ‘श्री’ ऐकण्याच्या धडपडीत आहेत असा मला भास झाला. माझी भीती सुद्धा गेली. धीर करून मी अंगावर घेतलेलं पांघरूण बाजूला केलं. आणि उठून उभा राहिलो. हेडफोन कानात होतेच. मग मी शेकोटीच्या आसपासच चालत राहिलो. गोल फिरत राहिलो. शेकोटी दृष्टीआड जाऊ दिली नाही. लघु आणि दीर्घ शंका व्यक्त करून आलो. भीती आता गेली होती. कानात श्री सुरु असल्यामुळे भीतीदायक असे कोणतेही आवाज आता येत नव्हते. पेटलेल्या लाकडाचा उजेड जिथे पर्यंत आहे त्याच्या पलीकडचं काही दिसतं नव्हतं. त्यामुळे भीती कमी झालेली.
रात्रभर मला नीट झोप अशी लागलीच नाही. भीतीने असेल किंवा शेकोटी विजेल या भीतीने असेल पण मी तासातासाने जागा होत होतो, शेकोटी व्यवस्थित करून पुन्हा येऊन झोपत होतो. असा किती वेळा उठलो माझ्या लक्षात नाही. टक्क जाग आली तेव्हा झुंजूमुंजू झालं होतं. शेकोटी विजून गेलेली. फक्त निखारे थोडे शिल्लक होते. रात्री थंडी भरपूर पडली होती. माझे हात आखडले होते थंडीनी. मग मी पुन्हा थोडं गावात आणून शेकोटी पुन्हा पेटवली. थोडं शेकलं अंग! तोंड धुतलं, चूळ भरली. पुन्हा दोन गाजरं आणि अंजीरं खाल्ली. हे सगळे सोपोस्कर होईपर्यंत सूर्य उगवलाच. मी फार वेळ न घेता आवरलं, शेकोटी पाणी मारून पूर्ण विजावली. पुढे चालायला सुरवात केली. आता कसलंच टेन्शन नव्हतं. आता रस्ता चुकण्याची भीती नव्हती. ‘कोकणातल्या देवांची भीती नव्हती. जंगलातल्या प्राण्यांची भीती नव्हती. मला खांडसला पोहोचायला नाऊ वाजले. लगेचच कर्जतला जाणारी वडापसुद्धा मिळाली. कर्जत स्टेशन वर पोहोचतोच तोपर्यंत मुंबई कडून कोणती तरी एक्सप्रेस आलीच. गाडी लगेच सुटेल या भीतीनी मी तसाच तिकीट न काढताच चढलो. मला बसायला सुद्धा जागा मिळाली, आणि पुण्यात शिवाजी नगरला स्टेशन वर एकही तिकीट चेकर नव्हता!!
(घरी कोणालाही माहिती नव्हतं म्हणून मी असा असा फिरून आलोय याचे सर्व पुरावे मी नष्ट केले विष्णू सोडून. म्हणून केवळ ब्लॉग आकर्षक व्हावा यासाठी फोटो वापरतो आहे. मी काढलेला एकही फोटो ठेवला नाही सर्व डिलीट करून टाकले. काही फोटो गुगल वरून घेतलेले आहेत, तर काही मी दुसऱ्या ठिकाणी काढलेले फोटो आहेत..)
Leave a Reply