त्यांनी मुंबईतील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालया’तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली होती. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत यांचा जन्म ३१ मे १९१० रोजी इंदूर येथे झाला. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात ‘माय मॅगझिन’ हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह. ना. आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भा.रा. भागवतांनी बालवयातच लेखन सुरू केले. घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी ‘वसंत’ नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने ‘निळे पाकीट’ या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता ‘आनंद’ मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट ‘बालोद्यान’ ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती. भागवतांनी १९३० च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला.
१९३५-३६ मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक होते. महात्मा गांधींच्या अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह लीलावती भागवत यांच्याशी झालेला होता व त्या गरोदर होत्या. पण भा.रा. भागवत भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात एस.एम. जोशी यांच्यासोबत भागवत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. विसापूरच्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला. त्याच काळात त्यांची आई वारली. तुरुंगवासाच्या काळातही भागवतांचे लेखन चालू होते. सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.
बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
त्यांनी लहान मुलांसाठी – विशेषत: कुमार वयोगटासाठी – अनेक कादंबर्याव व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्याय व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी ‘ज्यूल व्हर्न’ या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथा लेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मा.भा.रा. भागवत यांचे २७ ऑक्टोबर २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भा.रा. भागवत यांच्यावरील विषेशांक खालील लिंकवर वाचता येईल.
http://www.aisiakshare.com/brbf
Leave a Reply