नवीन लेखन...

माझं कोकण

आता ‘माझं कोकण’ पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.

दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय.
तरीदेखील आपल्या पिढीने जे ‘कोकण’ बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
‘कोकण’ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं,
तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही.
पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.

‘कोकण’ म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.

‘कोकण’ म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.

‘कोकण’ म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.

‘कोकण’ म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर झालेला कारभारणीचा चेहरा.

‘कोकण’ म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर.

‘कोकण’ म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव, रोखून बघत असलेले मानाचे दगड.

‘कोकण’ म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.

‘कोकण’ म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण, त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.

‘कोकण’ म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई.

‘कोकण’ म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.

‘कोकण’ म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि कण्हेरीची फुलं.

‘कोकण’ म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.

‘कोकण’ म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.

‘कोकण’ म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.

‘कोकण’ म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटप घातलेली उसळ.

‘कोकण’ म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.

‘कोकण’ म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.

‘कोकण’ म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.

‘कोकण’ म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.

‘कोकण’ म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा, भात, उसळ आणि लाऊडस्पीकर.

‘कोकण’ म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक, उसळ आणि डबलबाऱ्या.

‘कोकण’ म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल.

‘कोकण’ म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा.

‘कोकण’ म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती, शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्त्या आणि पोरांचं भजन.

‘कोकण’ म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा, पूजा, शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं.

‘कोकण’ म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप, धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला.

‘कोकण’ म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं, पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि ‘टुर्लामेंट’.

‘कोकण’ म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा, ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं.

‘कोकण’ म्हणजे चकवणारे मासे, लागलेली रापण, ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.

‘कोकण’ म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या.

‘कोकण’ म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय आणि सगळ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी.

‘कोकण’ म्हणजे खूप काही सांगू पाहणारा, पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा काशीविश्वेश्वराचा एक डाव….

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

2 Comments on माझं कोकण

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..