माझ्या कल्पनेतील विमान
आकाशात उंचच – उंच उडून
जमिनीवर आले तोपर्यत
सारे जग बदलेले होते
फक्त मी तिथेच होतो
सारी माणसे बदलली होती…
माझ्या कल्पनेतील प्रेम
तसेच होते निस्वार्थी !
पण माझी प्रेयसी
बदलली होती
तिचे प्रेम बदलले होते,
तिची प्रेमाची
परिभाषा बदलली होती…
जगातील पाप – पुण्याच्या
व्याख्या बदलल्या होत्या
स्वैराचाराला
समाजमान्यता मिळाली होती
सभ्यता, संस्कार आणि नैतिकता
अडगळीत पडली होती…
देवातील देवत्वाला नव्हे
देवाला महत्व प्राप्त झाले होते
देवही मग पैशाच्या राशीत
लोळत पडले होते
लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती…
सारे जग वेड्यागत
भविष्य घडविण्याचा
बदलण्याचा अट्टहास करीत होते
जगता – जगता उगाच
रोज थोडे मरत होते
तरी काही खुल्यांना
अमरत्वाची प्रतीक्षा होती…
कोणाला वंशाला दिवा हवा होता
कोणाला पोरांचा पसारा
कोणाला सात पिढ्यांची काळजी
कोणाला प्रेम हवे होते सातजन्मीचे
काहींना सारी साधने भोगाची
मरेपर्यंत हवी होती…
सारी माणसे पुन्हा
एकदा प्राणी झाली होती
माणसातील माणुसकीला
मारून खात सुटली होती
माझ्या स्वप्नातील विमान
जमिनीवर स्थिरावताच
माझ्यातील माणुसकीही
क्षणात मेली होती…
© कवी – निलेश बामणे
Leave a Reply