नवीन लेखन...

मायकेल जॅक्सन

Michael Jackson

मायकेल जॅक्सन नावाचे एक भन्नाट आणि बेभान, चित्तथरारक आणि अचाट तुफान मनात आणि तनात १९८० ते १९९५ या काळात ते तुफान घोंघावले.त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५८  रोजी झाला.मायकेल जॅक्सनमध्ये अशी काय ‘मॅजिक’ होती, असे काय गूढ होते, की ज्यामुळे प्रभुदेवा, मिथुन चक्रवर्तीपासून राज ठाकरेंपर्यंत आणि युरोपपासून जपानपर्यंत, जवळजवळ जगभरचे तत्कालीन तरुण-तरुणी त्याच्या प्रभावाखाली आले होते? मायकेल जॅक्सनची विलक्षण ऊर्जा? त्याचा झपाटा? त्याच्या ‘साँग-डान्स’मधील इलेक्ट्रिकल चार्ज? त्याचा आवाज? गाण्याच्या ओळी? मायकेल नावाची मॅजिक जगभर पसरली ती त्याच्या १९८३च्या ‘थ्रिलर’ या थरारक अल्बमनंतर. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याच्या गाण्यांमधले शब्द व त्यांचे संदर्भ समजतही नसत. परंतु असेही कित्येक कोटी तरुण होते, की जे त्याची गाणी, नृत्य, हावभाव आणि वैचित्र्यपूर्ण भासणारे पदन्यास या सर्वाचे सहीसही अनुकरण करायचा प्रयत्न करीत असत.

मायकेल जॅक्सन अजिबात न आवडणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग होता. पण साधारणपणे तो वर्ग तेव्हा पन्नाशीच्या आसपास वा पलीकडे गेला होता. तरुण वर्गातही थोडेफार ‘अॅाण्टी-जॅक्सन’ होते, पण चाहत्यांचा दबदबा (आणि दहशत!) इतकी प्रचंड होती, की त्या ‘विरोधकांचा’ आवाज त्या अफलातून आणि कान भेदून जाणाऱ्या तडाखेबंद ड्रम्सच्या ध्वनी-प्रतिध्वनींमध्ये पूर्णपणे बुडून जात असे. ज्यांना ‘जॅक्सन फिनॉमिनन’ने कधीच संमोहित केलेले नव्हते, त्यांना त्याची ‘मॅजिक’ही उमजली नव्हती आणि आता सुरू झालेले ‘ग्लोबल मोर्निग’ ही उमजलेले नाही.

मायकेल जॅक्सन ही अगदी चपखल असे ‘अमेरिकन फिनॉमिनन’ होते. त्याच्या अगोदर असेच तुफान एल्विस प्रिस्ले या नावाने अमेरिकेत आणि मग जगभर पसरले होते; पण प्रिस्लेच्या काळात टेलिव्हिजन आणि खासगी वाहिन्या आजच्यासारख्या जगभर फोफावल्या नव्हत्या. कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांतीच्या दोन दशके अगोदर एल्विसचे पर्व होते. त्या दोघांच्या ‘ब्रॅण्ड’चा बाज जरी वेगळा असला तरी एक पर्व संपले आणि काही वर्षांतच दुसरे पर्व सुरू झाले असे म्हणण्यासारखी स्थिती होती. विशेष म्हणजे आज जगभर अमेरिका ओळखली जाते ती केवळ त्यांच्या व्हिएतनाम-अफगाणिस्तान-इराक येथील हिंस्र कारवायांमुळे नव्हे; तर हॉलिवूड-एल्विस- मायकेल जॅक्सन अशा ‘मॅजिक मेकर्स’मुळे अमेरिकेत निर्माण होणारी अशी तुफाने झपाटय़ाने ‘लेजंड्स्’ होतात. हा हा म्हणता ती ‘लेजंड्स्’ जगभरच्या लोकांच्या मनाचा कब्जा घेतात. त्यांचे वर्णन योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक अशा निकषांवर करणे म्हणजे तो हंगामा, ते ‘फिनॉमिनन’, ते अनोखे चैतन्य न समजून घेण्यासारखे आहे.

अमेरिकेतील अशी ‘फिनॉमिना’ झपाटय़ाने कॉर्पोरेट रूप धारण करतात. हा हा म्हणता ती ‘ग्लोबल कॉर्पोरेट्स्’ बनतात. एकदा अशी ‘लेजंड्स्’ जागतिक कॉर्पोरेट झाली, की त्यात अब्जावधी डॉलर्स गुंतवले जातात, कोटय़वधी लोक त्यांचे ग्राहक होतात, त्या संशोधनातून एक सामूहिक झिंग तयार होते; मग ती झिंग मार्केट केली जाते, सीडी-डिव्हीडीज्, कॅसेट्स्, टी. व्ही. चॅनल्सच्या माध्यमातून ती झिंग घराघरात पोहोचते- लहान मुले आणि तरुण-तरुणी त्यात इतके दंग होतात, की त्यांच्या पालकांना हे कळेनासे होते, की ‘या पिढीला कशाने झपाटले आहे?’ भुताने झपाटल्यावरही माणूस (म्हणजे तरुण-तरुणी) जसे वागणार नाही तसे वर्तन पाहून काही पालक भयभीत होतात. तेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. मायकेल जॅक्सनच्या (आणि इतरही ‘डान्स-साँग शोज्’च्या) वेळेस ज्या प्रकारच्या आर्त किंकाळ्या, अश्रूपात, छाती बडवून घेत त्याबरोबरच होणारा अक्षरश: लाखो चाहत्यांचा भन्नाट नाच हे सर्व वरकरणी वेताळाने झपाटल्यासारखेच वाटते/ दिसते. त्याच्या मरणानंतरही तो ‘पेनकिलर’ घेऊन मरण पावला, की हृदयविकाराच्या झटक्याने यावर वादंग सुरू झाला आहे. मायकेल जॅक्सनचे निधन २५ जून २००९ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..