ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील वातावरणात चित्रविचित्र बदल घडत आहेत. उदा. काही ठिकाणी भरपूर पाऊस तर काही ठिकाणी आवर्षण. काही ठिकाणाचा उष्णतेचा पारा चढलेला दिसत आहे. तर आचानक गारांचा पाऊस पडताना दिसतो तर काही ठिकाणी प्रचंड थंडी पडत आहे. या सर्वांचे एकत्रित परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात बघायला मिळतातच तसेच आपल्या देशाच्या अर्थकारणावरही याचा परिमाण होताना दिसतो. त्याचा बहुतांश विपरीत परिणाम बळीराजालाही भोगावा लागतो.
दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो. कसे ते पुढे पाहू :-
एल निनो म्हणजे काय आणि त्याच्या ऋतुमानावर, हवामानावर आणि आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यागोदर त्याबद्दलचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.
इ. स. १५०० च्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनार्यावर लहान बोटींतून मासेमारी करणार्या कोळ्यांना प्रशांत महासागराचा पारा अधूनमधून चढत असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. पेरूच्या किनार्याजवळ दर काही (सुमारे ४ ते ७) वर्षांनी समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त तापलेले असते असा अनुभव त्यांना वारंवार येत असे. पाण्याचे तापमान वाढण्याची घटना सहसा नाताळच्या सुमारास घडत असल्यामुळे त्यांनी ह्या घटनेचे नामकरण एल निन्यो, अर्थात बालयेशू किंवा छोटा मुलगा असे केले. इ.स. १७०० ते १९०० च्या दरम्यान अनेक युरोपीय खलाशांनी ह्या तापमानवाढीच्या नोंदी लिहून ठेवल्या. ह्या नोंदी पुढे एल निन्यो आणि त्याच्या परिणामांच्या संशोधनांमध्ये उपयुक्त ठरल्या. १८९१ मध्ये पेरू देशातील डॉ. लुइस करॅंझा ह्या भूगोलतज्ज्ञाने दक्षिण अमेरिकेच्या पाऊसपाण्यामध्ये आणि हवामानामध्ये होणारे विचित्र बदल हे एल निन्योमुळे होतात असे सांगणारे त्याचे संशोधन प्रसिद्ध केले.
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमीकडून पूर्व दिशेस वारे वाहतात आणि ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती, अशा प्रकारे एल निनोचा परिणाम दिसतो.
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना असे संबोधले जाते.
काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरतेय. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.
उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक, की ज्यामुळे एल निनो किंवा ला निना हे परिणाम प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधातील पश्चिम भागावर स्पष्टपणे होत असल्याचे दिसून आले आहे.
मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी सोळा घटकांचे मॉडेल अथवा प्रारुप वापरले जाते. या मॉडेलमध्ये सहा घटक तापमानासंबंधी, तर पाच घटक हवेच्या दाबासंबंधी आहेत. तापमानाशी निगडित असलेल्या अल-निनोचा परिणाम हा सर्वात महत्वाचा घटक आहे. हा परिणाम विशेषत: डिसेंबर महिन्यात आढळून येत असल्यामुळे त्याला हे नाव पडले आहे.
‘अल-निनो’ परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात असलेले ताहिती नावाचे बेट आणि पेरू या देशाच्या किनापट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह होय. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे (अल-निनोमुळे) हजारो चौरस किलोमिटर क्षेत्रफळावरील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ एक अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. परंतु तापमान एक ते दीड अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तविताना या तापमान वाढीचा (अल-निनोचा) प्रभाव विचारात घ्यावा लागतो. अल-निनो तीव्र असल्यास तापमान पाच अंश सेल्सियसपर्यंत वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे प्रशांत महासागरात पाण्यालगतची हवा गरम होऊन तिचे बाष्पात रुपांतर होते व ती उंचावर निघून जाते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो.
हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांच्यावरील हवेचा दाब एकमेकांशी निगडित असल्याने हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब हा कमी असावा लागतो. त्यामुळे अल-निनो आल्यास मोसमी पाऊस भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांत कमी पडतो वा पडतही नाही. हा अल-निनो दरवर्षी येतोच असे नाही. अल-निनो सोडून सोळा पैकी इतर पंधरा घटक अनुकूल असल्यास अल-निनोचा मान्सूनवर परिणाम होत नाही.
गेल्या काही वर्षांत अल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचा पृष्ठभाग उबदार होऊ लागला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगात आणि मार्गात बदल होत आहे आणि त्याचा ऋतुमानाच्या चक्रावरही वाईट परिणाम घडू लागल्यामुळे बऱ्याच देशात दुष्काळसदृश्य तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होताना आपण अनुभवतो. अल निनोमुळे इ..स.१८७०च्या नंतर सर्वत्र सगळ्यात जास्त उष्मा जाणवू लागला आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील तापमान मागील ५ वर्षातील सरासरी पेक्षा सर्वात जास्त होते. या दिवशी किमान तपमान, २४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले किंबहुना डिसेंबर अखेरीस कडाक्याची थंडी पडते. तरी अल निनोचे सावट अजूनतरी कमी होणार नाहीये असे संकेत अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिले आहेत.
काही देशात अल निनोचा प्रभाव जास्त राहील असा अंदाज आहे. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की जागतिक तापमानात एकसारखी वाढ होत असल्याने अल निनोच्या प्रभावात वाढ होईल आणि म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल, भरपूर झाडे लावावी लागतील आणि खनिज इंधनांचा वापर कमीत कमी करावा लगेल आणि यातच सर्वांचे भले आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply