पांडुरंग रंगीं रंगुन नामामृता प्यालो
पांडुरंग अंतरंगीं, मी विलीन झालो ।।
द्वैत आणि अद्वैतातिल फरक मज कळेना
निर्गुण-सगुणातिल मजला भेद आकळेना
तरी परब्रह्म दिसलें, धन्य धन्य झालो ।।
नकळतांच हृदयीं मोठा चमत्कार झाला
निमिषातच माझा सारा मीपणा गळाला
चिंता-भय मिटले सारे, अंतरीं निवालो ।।
मावळतां ‘मी’, उरला गर्व ना ज़राही
वंदत वा निंदत कोणी, भान मुळी नाहीं
पांघरून विठ्ठलशेला, अनासक्ति ल्यालो ।।
गहिवरलो पाहुनिया तो पंढरिचा नाथ
चरण स्पर्शतां मी, उठवी घरूनिया हात
देहभान विरलें, त्याच्यासंगतीं निघालो ।।
— सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
Leave a Reply