नवीन लेखन...

असे गुरू ! , असेही गुरू !

(१) असे गुरू : ( प्राचीन-अर्वाचीन )  :

गुरुपौर्णिमा  हा दिवस गुरूपूजेसाठी किंवा गुरूस्मृती जागवण्यासाठी असतो. शतकानुशतकें आपल्या संस्कृतीत गुरूचें महत्व अधोरेखित केलें गेलेलें आहे. खालील संस्कृत श्लोक प्रसिद्धच आहे –

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात् परब्रह्म: तस्मै श्रीगुरवे नम: ।

संत कबीर यांचा दोहासुद्धा प्रसिद्ध आहे –

गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागूँ पाँय ?
बलिहारी गुरु आपकी, गोविन्द दियो बताय  ।

 एका अन्य पदामध्ये रचयिया म्हणतोच –
गुरुबिन  ज्ञान कहाँ से पाऊँ ?

दत्तात्रेयाच्या एका भजनात म्हटलेलें आहे –
स्मरा स्मरा रे दत्तगुरू । दत्तगुरू भवतापहरू  ।।

ध्यानीं घ्या, रचयिता इथें दत्ताला ‘देव’ म्हणून भजायला सांगत नाहीं ; तर ‘गुरू’ म्हणून स्मरायला सांगतो आहे.

माझ्यासारखा एक ‘अदना-सा’ कवीही म्हणतो –
गुरु की गरिमा का बरनन सब बड़ों बड़ों ने है किया ।

शास्त्रीय संगीतात गुरुचें स्थान अतिशय महत्वाचें मानलें जातें. त्या क्षेत्रातील प्रत्येक गायक-वादक आपल्या गुरूंचें नांव काढतांच कानाच्या पाळीला हात लावून आपला आदर व्यक्त करतो. संगीत क्षेत्रातील व्यक्तींना तर गुरुपौर्णिमेचें फारच महत्व. संगीत क्षेत्रामधील थोर व्यक्ती आपल्या गुरूच्या स्मरणार्थ उत्सवही साजरा करतात जसें की पं .भीमसेन जोशी यांनी सुरूं केलेला ‘सवाई गंधर्व महोत्सव’. पं. देवधरही विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या स्मरणार्थ मैफलींचें आयोजन  असत.   या व अशा अन्य,  गुरुस्मरणार्थ आयोजलेल्या संगीतोत्सवांमध्ये आपली कला सादर करणें याला गायक-वादक आपलें महद्.भाग्य समजतात. शास्त्रीय संगीतात गुरुला उल्लेखून बांधलेल्या चिजाही आहेत. एकीत गायक, ‘गुरुजी ऽ ’ अशी गुरुला साद घालतो. पं. भीमसेन जोशी व विद्वान डॉ. बालमुरलीकृष्णन् यांच्या सहगायनातील ‘भज रे गुरुदेवम्’ हें भजन प्रसिद्धच आहे. वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये व लेखांमध्ये ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-वादकांनी ( उदा. विदुषी किशोरी आमोणकर , उस्ताद अल्लारखा खाँ , विदुषी धोंडूताई कुलकर्णी इ.) आपल्या गुरूचें आपल्या जीवनातील महत्व सांगितलें आहे व आपल्याला दिलेल्या  कलाज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

उस्ताद या शब्दाचा अर्थ ‘हुशार, ज्ञान असलेला, expert, wise’ असा होतो ; तसेंच ‘गुरु’, ‘शिक्षक’ असाही होतो. कुस्तीच्या क्षेत्रात उत्तर भारतात तालमीतल्या गुरूला ‘उस्ताद’ म्हणतात, तर मराठीत ‘वस्ताद’. अर्थात्, इथें ‘वस्ताद’ चा अर्थ ‘उस्ताद’ म्हणजे ‘गुरु’ असाच होतो.

उर्दू शायरीच्या क्षेत्रातही गुरूला ‘उस्ताद’ म्हटलें जातें. थोर शायर ‘ज़ौक़’ हा, शेवटचा मुघल बादशहा बहादुरशहा जफ़र याचा शायरीतला गुरू होता. शिष्य आपल्या उस्तादाकडे आपली शायरी ‘इस्लाह’ साठी (सुधारण्यासाठी) देत असत. प्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांनीसुद्धा बर्‍याच तरुण शायरांना इस्लाह देलेली आहे. ते ‘शिष्य’ आज स्वत: प्रसिद्ध गझलकार झालेले आहेत, अणि ते आवर्जून सुरेश भटांचें ऋण मान्य करतात.

पूर्वीच्या काळीं प्रत्येक क्षेत्रात ‘गुरू’ असत. पूर्वी व्यवसाय वंशपरंपरागत चालत असत, मग शेती असो, चर्मकारी असो, केशकर्तन असो, लोहारकर्म असो, वा कांहीं अन्य असो. त्या काळात मुलें आपल्या पित्याकडून किंवा कुटुंबातील अन्य ज्येष्ठांकडून व्यवसायातील खाचाखोचा शिकत असत. ते ज्येष्ठ म्हणजे त्या तरुणांचे गुरूच की.

पूजा सांगणार्‍या, धार्मिक विधी करवून घेणार्‍या,  भटजींना म्हणजेच पुरोहितांना, ‘गुरुजी’ म्हणतात. तें कां, तर, पूर्वी, ज्ञानवंत ऋषी, नृप व सम्राट यांचे गुरू असत; आणि यज्ञयाग, होमहवन, वगैरे प्रसंगीं तेच पौरोहित्य करत. ती परंपरा चालूच राहून, आजही पुरोहितांना ‘गुरू’ म्हणून संबोधतात. त्याला ‘जी’ हा प्रत्यय मध्ययुगात लागला.

भारतात पूर्वी अशी परंपरा होती की मुलें एका विशिष्ट वयानंतर (जसें की १२ वर्षें वयाचें झाल्यावर )  गुरुकडून ज्ञानसंपादन करीत, जसें की श्रीकृष्णानें गुरु सांदीपनी यांच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन केलें. सांदीपनी यांच्या, गुरु म्हणून श्रेष्ठत्वाबद्दल एवढें  सांगणें पुरेसें आहे की, त्यांनी श्रीकृष्णासारखा श्रेष्ठ शिष्य तयार केला. द्रोणाचार्य स्वत: श्रेष्ठ धनुर्धर होतेच, पण त्यांचे मोठें महत्व हें की त्यांनी अर्जुनासारखा एकमेवाद्वितीय धनुर्धर घडवला.

गुरूचा प्रत्येक शिष्य श्रेष्ठत्व पावेलच असें नाहीं ( उदा. सुदामा) ; मात्र श्रेष्ठ शिष्य घडवायला श्रेष्ठ गुरूच लागतात, हें निश्चित. चाणक्याचें श्रेष्ठत्व केवळ ‘कौटलीय अर्थशास्त्र’ व ‘चाणक्य सूत्रें’ रचली एवढेच नसून, त्यानें चंद्रगुप्त मौर्यासारखा शिष्य, सम्राट म्हणून तयार केला,  खरेंतर हेंच आहे. विद्यारण्यस्वामींनी त्यांचे शिष्य हरिहर-बुक्कराय हे विजयनगर-साम्राज्याचे-स्थापक तयार केले, एवढेंच नसून त्यांनी स्वत: सुरुवातीच्या काळात त्यांचा ‘प्रमुख अमात्य’ म्हणूनही कार्य पाहिलें, व तिथेंही त्यांना मार्गदर्शन केलें. चाणक्यानेंही चंद्रगुप्ताचा ‘प्रमुख अमात्य’ बनून त्याला याच प्रकारें मार्गदर्शन केलें होतें. संत एकनाथांसारखा शिष्य असलेल्या जनार्दनस्वामींचे गुरू म्हणून महत्व वेगळें सांगायला लागत नाही. आपल्या अनेक रचनांमध्ये एकनाथ ‘एका जनार्दन’ असा उल्लेख करतात. ज्ञानेश्वरही ‘निवृत्तिदासु’ अशा नांवानें स्वत:ला म्हणत, आपले थोरले बंधू निवृतिनाथ यांच्या , ‘आपले गुरु‘ या श्रेष्ठ नात्याचा आदरपूर्वक उल्लेख करतात.

दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होतें की नाहीं, या विषयावर हल्ली बराच वादंग माजलेला आहे. आपण त्यात जाऊं या नको. मात्र एक गोष्ट खरी की शिवराय, बालवयाचे असतांना दादोजी पुण्यातच होते, आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा शिवबांना नक्कीच उपयोग झालेला असणार , आणि त्या अर्थानें, कांहीं अंशीं तरी दादोजी नक्कीच शिवबांचे ‘गुरू’ होते.

पुरातन ग्रीसमधील सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल, अशा फिलॉसॉफर्सची, जे श्रेष्ठ गुरुही  होते, नांवें आदरानें घेतली जातात. अॅरिस्टॉटल ज्याचा गुरू होता, त्या सिकंदराला कोण विसरेल ?

साधारण  समजल्या जाणार्‍या व्यक्तीही असाधारण गुरू असूं शकतात. माझे शाळेतील एक ‘गुरुजी’ , केळकर सर हे स्कॉलरशिपला बसणार्‍या विद्यार्थ्यांची, त्या परिक्षेसाठी शिकवणी विनामूल्य घेत असत, कां तर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला व्हावा. त्याव्यतिरिक्त अनेक वर्षें त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलें होतें, कां तर, शिकून  ते विद्यार्थी जीवनात पुढे यावेत.  हे ‘सर’ निवृत्तीनंतर पुणें येथें स्थायिक झाले. तेथेंही त्यानंतर, विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवण्याचें व्रत त्यांनी निधनापर्यंत सुरूंच ठेवलें होतें.

नंतर मी इन्दौरला उच्च-माध्यमिक शिक्षणासाठी होस्टेलमध्ये असतांना, एक सहाध्यायाला ‘प्लूरेसी’ झाली,  व त्याचे वडील त्याला ट्रीटमेंटसाठी घरी घेऊन गेले; बरा होईतो कांहीं महिने त्याला  क्लासेस मिस् करावे लागले. पण प्रिंसिपॉल व शिक्षक इतके empathetic and considerate की,  हजेरी कमी म्हणून त्याला penalize केलें नाहीं, एवढेंच नव्हे तर, त्याचे टर्मिनल परीक्षेचे कांहीं पेपर मिस् झाले होते, त्यांची खास परीक्षा घेतली ; एका हुशार मुलाचें वर्ष त्यांनी वाया जाऊं दिलें नाहीं .

असे गुरुजन सांदीपनींसारखे, चाणक्यासारखे प्रसिद्ध  होतील न होतील ; मात्र त्यांचें, गुरु म्हणून श्नेष्ठत्व त्याच दर्जाचें आहे, यात शंका नाहीं. Hats off to all such devoted great Gurus !

अशा प्रसिद्ध-अप्रसिद्ध  श्रेष्ठ गुरूंना माझा हा प्रणाम –

तृषितांची आस गुरू, शिष्यांचा ध्यास गुरू, विद्येचा श्वास गुरु महान्
विश्वाचा आंस गुरू, ज्ञानद सुवास गुरू, देवांहुन खास,  गुरु महान्
तोडी नेणीव-पाश , काजळिचा करि विनाश , घनतमीं प्रकाश, गुरु महान्
वंदावे थोर चरण, प्रथम तयाचें स्मरण, ब्रह्माहुनही पावन, गुरु महान्  ।।

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..