ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांचा जन्म २४ जुलै १९३२ रोजी झाला.
प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते.
मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे. मधुकर तोरडमल यांनी कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.
मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातून मायबाप प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केलेली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करायचे.
मधुकर तोरडमल यांनी धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत. ‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे मामांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.
प्रा. मधुकर तोरडमल यांचे २ जुलै २०१७ रोजी मुंबई येथे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
Leave a Reply