मनाच्या खेळात त्याचा आवडता भाग असतो कोणतीही गोष्ट अधांतरी ठेवण्याचा.
अधांतरी असतात विचारांची आंदोलने आणि निर्णय प्रक्रिया. एखाद्या अगदी क्षुल्लक विचारला विनाकारण खूप मोठे बनवायचे आणि खूप मोठ्या विचारला अगदी सामान्य पातळीवर आणायचे हे मनाला खूप आवडते. ते असं का करते याला काही नियम नाही वा तार्किक बैठकही नाही असा अधांतरी प्रकार मन करते.
दुटप्पीपणा विचारात व कृतीत हा त्याचा दुसरा पैलू अनेकांना गोंधळवून टाकणारा. करायचे एक आणि विचार काहीतरी दुसराच यात मन स्वतःही फसते आणि समोरच्यालाही फसवते. त्यामागे काही फार मोठी मनोभूमिका असते असं अजिबात नसते तर एक केवळ चाळा असतो, निर्हेतुक पण खोलवर परिणाम करणारा. हा दुटप्पीपणा करत राहणे ही जेव्हा मनाची सवय बनते तेव्हा तो कोणाचा स्वभाव बनतो आणि दुर्दैवाने त्याला त्यातून सुटता येत नाही. हे न सुटणे त्याला कधी आवडते पण बरेचदा अपरिहार्य बनते.
वर्तणूक व विचार या खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू पण अनेकदा ते दोघे वेगळी नाणीच बनतात फारशी न चालणारी पण सतत चलनात दिसणारी. कोणाच्या वर्तनाचा अंदाज जेव्हा त्याच्या चेहे-यावरून बांधता येत नाही तेव्हा त्याच्या विचारांचा मागोवा घेताच येत नाही आणि संपर्कात येणारा प्रत्येकजण फक्त गोंधळात पडतो. अशा प्रकारे वागताना स्वतःचा काही फार मोठा फायदा होणार असतो असे नसते पण कोणाचे तरी अगदी मामुली नुकसान होईल असा बालिश विचार असतो. आपल्या वागणुकीचा कोणी कधी अंदाज बांधूच शकणार नाही व मी प्रत्येकाला फक्त लटकवून ठेऊ शकतो असा वेडगळ विचार त्यामागे दिसतो.
अशी अधांतरी व तकलादू मनोभूमिका असणारी मने आज खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत व त्यावर कोणताही ठोस उपाय सापडत नाहीये हीच खरी समस्या आहे.
श्रीकृष्ण म्हसकर, ठाणे
Leave a Reply