नवीन लेखन...

तुलनेचे बळी

पाटील सरांचा राजू अनेक वर्षांनंतर अचानक समोर येऊन उभा राहिल्यानंतर मला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. राजू माझा वर्गमित्र व त्याचे वडील आमचे गणिताचे शिक्षक. राजूचा मोठा भाऊ बंडया खूप हुशार असल्याच्या व घरात तो एक कौतुकाचा विषय असल्याच्या बातम्या नेहमी आमच्यापर्यंत पोचत. त्यामुळे बंडयासारखी हुशार माणसं कशी दिसत असतील याबद्दल माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना कायम उत्सुकता वाटत असे. आज राजूबरोबर आलेल्या त्याच्या पत्नीचा मूड नक्कीच चांगला नव्हता. तिची प्रथमच भेट होत असल्यामुळे आमच्या शालेय जीवनातील काही मनोरंजक किस्से तिला सांगण्याची इच्छा मनातच राहिली. कारण ती कोणत्या तरी कारणामुळे प्रचंड तणावग्रस्त झालेली दिसत होती. राजूने थोडाही वेळ वाया न घालवता मूळ मुद्द्याला हात घातला व त्या दोघांची समस्या माझ्यासमोर मांडली.

राजू सांगू लागला. ‘‘माझा मोठा भाऊ बंडया हुशार व अत्यंत अभ्यासू वृत्तीचा. संगणकाबद्दल फार पूर्वीपासून आकर्षण असल्यामुळे त्याच क्षेत्रात कर्तृत्व गाजवायचा त्याने निश्चय केला होता. शिक्षण संपताच त्याला एका खासगी कंपनीत चांगली संधी तर मिळालीच, पण काही महिन्यांतच तो कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला रवाना झाला. आपणही स्वत:ची सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण होताच त्याने नोकरीला रामराम ठोकला. आज अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत त्याची स्वत:ची कंपनी आहे व अत्यंत धनाढ्य व्यक्तींमध्ये त्याची गणना होते. केवळ एक भाऊ म्हणूनच नव्हे तर एक यशस्वी व्यक्ती म्हणून मला त्याचं प्रचंड कौतुक वाटतं. माझ्यावर मात्र माझ्या वडिलांच्या पेशाचा मोठया प्रमाणात प्रभाव होता. आपलीही एक आदर्श शिक्षक म्हणून समाजात गणना व्हावी असं मला फार पूर्वीपासून वाटत असे व त्या दिशेने मी माझी वाटचाल सुरू ठेवली होती. एका अत्यंत मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या मुलीशी माझं लग्न झालं. तिचे वडीलही शिक्षक असल्यामुळे तिला या क्षेत्राविषयी माहिती होती. शिक्षकदिनी मला मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराने माझ्या स्वप्नपूर्तीवर शिक्कामोर्तब केलं होतं. आदर्श शिक्षक होण्याच्या प्रयत्नांमध्ये पत्नीकडून मिळालेल्या प्रोत्साहनाचा खूप मोठा वाटा होता यात शंकाच नाही.’’

मर्यादित मिळकतीत पण सुखासमाधानाने चाललेल्या आमच्या संसाराला काही दिवसांनंतर ग्रहण लागण्याची चिन्हं दिसू लागली. अमेरिकेत असलेल्या भावाच्या व माझ्या मिळकतीची तुलना माझ्या आईकडून घरात सतत होऊ लागली. तो श्रीमंत व मी मात्र एक भिकारडा शिक्षक अशा शब्दांमधे वेळी-अवेळी केल्या जाणाऱ्या तुलनेमुळे घरातल्या सुखासमाधानाने भरलेल्या वातावरणाला तडे जाण्यास सुरुवात झाली. माझा सतत होणारा अपमान काही दिवस माझ्या पत्नीने सहन केला, पण आता तिच्याही सहनशक्तीची मर्यादा संपली आहे. काहीही गरज नसताना केवळ आर्थिक प्राप्तीवरून स्वत:च्या सख्ख्या मुलांची तुलना करून एखादी आई एक सुखी संसार का उद्ध्वस्त करते याबद्दल मला कमालीचं आश्चर्य वाटतं. वृध्द आईवडिलांना एकटं सोडून कायमचं घराबाहेर पडण्याची इच्छा होत नाही व स्वत:चा सतत होत असलेला अपमानही सहन होत नाही. आता आपल्याकडून योग्य सल्ला मिळेल या आशेने आम्ही उभयता इथे आलो आहोत.

माझा सल्ला घेतल्यानंतर राजू व त्याची पत्नी काही दिवसातच घराबाहेर पडले, पण राजूने त्याच्या आई-वडिलांबद्दलच्या जबाबदाऱ्या झटकल्या नाहीत. बंडया वर्षातून एकदा भारतात येतो आणि दोन्ही घरचा पाहुणचार घेऊन आनंदाने अमेरिकेला रवाना होतो. राजूच्या आईला एकटेपणा खायला उठतो व दोन भावांमध्ये तुलना केल्याबद्दल आजकाल तिला खूप पश्चात्ताप होतो. पण आता उशीर होऊन गेला आहे.

का वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही! घराघरातले आई-वडील आपल्या मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या साच्यांमध्ये ओतण्याचा प्रयत्न करत असतात. एकेकाळी या साच्यांची नावं स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेहरू वगैरे होती व काळ बदलला तसे हे साचेही बदलले व त्यांनी अमिताभ, शाहरुख, तेंडुलकर, सानिया ही रूपं धारण केली. तुलना करण्याच्या वाईट सवयीमुळे आजपर्यंत अनेक मुलं घरातून पळून गेली आहेत, अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, अनेक हुशार विद्यार्थ्यांचं पूर्ण भवितव्य उद्ध्वस्त झालं आहे तर अनेकांच्या सोन्यासारख्या संसाराची लक्तरं लोंबू लागली आहेत.

एकदा मी माझ्या एका जुन्या मित्राकडे गेलो होतो. फ्लॅटचा दरवाजा सताड उघडा असल्यामुळे जिन्याच्या पायऱ्या चढत असताना मायलेकाचा सुखसंवाद माझ्या कानावर पडला. अरे शंतनू, काय रात्रंदिवस त्या कॉम्प्युटरसमोर पडलेला असतोस? कधी त्या स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाच आणि थोडाफार तरी त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न कर. आजच्या पिढीचा प्रतिनिधी बाळ शंतनू एकही सेकंद वाया न घालवता उत्तरला – ‘आई, मी विवेकानंदांपेक्षाही ग्रेट झालो तर तुझी काही हरकत तर नाही ना? अगं, इतर कोणासारखं होण्यापेक्षा शंतनू म्हणून मला जग गाजवू दे की!’

श्रीकांत पोहनकर 
98226 98100 
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..