प्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांचा जन्म २४ जुलै १९११ रोजी झाला.
प्रतिभावान अश्यासाठी की पन्नालालजींना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता.
पन्नालाल घोष यांनी ३६ व्या वर्षांपर्यंत स्वतःच रियाज करुन विद्या मिळवली होती. त्यांची प्रतिभाइतकी होती की बडे बडे लोक त्याचवेळी त्यांना ओळखू लागले होते. ह्याचं एक कारण हेही होतं की तोपर्यंत बासरीवादन इतकं मागे पडलं होतं की अभिजात संगीतामध्ये तीचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं. पन्नालाल घोष यांच्या मूळे तिला परत संजिवनी मिळाली आणि लोकांनी पन्नालाल घोष यांचे बासरीवादन पाहून लोकांनी तोंडात बोटं घातली. शिवाय ह्याला आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पन्नाबाबूंचं उमदं, सात्त्विक, निरहंकारी, प्रेमळ व्यक्तिमत्व कारणीभूत होतं. ते म्हणायचे सुद्धा की आयुष्याच्या उत्तरार्धात ही कला परमेश्वरासाठीच अर्पण करणार. पन्नालाल घोष यांना व्यायामाची खूप आवड होती. ते म्हणायचे सुद्धा कलाकारानं नेहमी व्यायामाकडे लक्ष दिले पाहीजे. ते स्वतः लाठीकाठी, बॉक्सिंग व मार्शल आर्टचे खेळाडू व प्रशिक्षक राहिले आहेत.
पन्नालाल घोष यांनी बासरीवर बरेच प्रयोग केले. ३२ इंच लांबीची लांब बांबूची बासरी बनवून घेतली. त्यांना त्यातुन घनगंभीर स्वर हवे होते. म्हणुन मग पन्नाबाबूंनी बासरीला ७ वे भोक पाडून घेतले व एक नवा अध्याय लिहीला. याशिवाय ६ तारी तानपुरा, तीव्र स्वरांची तानपुरी व सुरपेटी यांचा पण शोध लावला. या व्यतीरिक्त त्यांनी दीपावली, पुष्पचंद्रिका, हंसनारायणी, चंद्रमौळी व आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्युच्या दु:खाने व्यथित होउन तिच्या नावाने तिची आठवण म्हणुन ‘नुपुरध्वनी’ अश्या रागांची रचना केली.
पन्नाबाबूंच्या ज्या संस्मरणीय मैफिली झाल्या त्यातली संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्याबरोबरची एक. त्यावर्षी कलकत्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पं. ओंकारनाथ ठाकुरांबरोबर संयोजकांनी जुगलबंदी ठेवलेली. पण पन्नालाल घोष यांनी पंडितजींच्या घनगंभीर आवाजाला शोभेल अशी ३६ इंच लांबीची लांब बांबूची बासरी काढली आणि सगळी सभा विस्मयात बुडाली. पण पुढच्याच वेळात पंडितजींच्या बरोबर पन्नालाल घोष यांची मुरली सुद्धा ताना सही सही घेऊ लागली आणि सगळी सभा आश्चर्याचे एक एक धक्के खाऊ लागली.
पन्नालाल घोष यांचे २० एप्रिल १९६० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply