नवीन लेखन...

मनाचा दगड आणि दगडातील जीवन

माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!

नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

विंदांनी कितीतरी वर्षांपूर्वी लिहीलेल्या कवितेला आज मूर्त रुप आल्याचा निष्कर्ष काढता येतो. मनावर ओरखडे काढणाऱ्या कितीतरी गोष्टी क्षणाक्षणाला आपल्या आजुबाजूला आणि काहीतर आपल्या साक्षीने घडत असतात, तरी आपल्याला काहीच वाटत नाही. दगडावर कसले ओरखडे येणार म्हणा, दगडावर साचलं तर फक्त शेवाळच, जिवंतपणाची एक मोसमी खुण मात्र, बाकी सर्व मृत..!!

परवा ‘झा २४ तास’वरचा एसआरएमधील भ्रष्टाचाराचा नागडा उघडा बिभत्स खेळ पाहीला आणि आपल्या मनाचा दगड होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री पटली. हा एक उघडकीला आलेला एक प्रकार, असे प्रकार रोजच्या रोज घडतात आणि त्यांना रोखावं असं आपल्यापैकी कुणालाच वाटत नाही. ट्राफिक डिपार्टमेंट हे सर्वात पारदर्शक सरकारी खातं आहे, असा लांचलुचपत खात्याने दिलेला अहवाल दाखवतच ट्रफिक पोलिस, ऐन गर्दीच्या ठिकाणी केलेल्या पार्किंगकडे कानाडोळा करतो, हे आपण त्या पार्किंगचा त्रास सहन करत निमूट पाहातो. उठ सुट जनतेच्या सार्वभोमत्चाचा मंत्र जपत सर्वपक्षीय नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीही निर्लज्जपणे पैसे खातात आणि वर आपल्यालाच स्वच्छ राहायची शिकवण देतात. ह्यांना जाब विचारणं सोडाच, उलट आपण त्यांना निवडून देण्यासाठी धडपड करतो. म्हाडा, एसआरए, महानगरपालिका, मंत्रालय आणि इतर कोणतीही सरकारी आॅफिसं, सरकार कोणाचंही असो, जनतेलाच नाडून काळा पैसा रिचवण्याची ही सर्वात मोठी निर्लज्ज ठिकाणं आहेत हे माहित असुनही त्यात काम करणारांना आपण साहेब म्हणतो ही आपला दगड झाल्याचीच लक्षणं आहेत. एकेक सरकारी अधिकारी किती करोडचा आहे आपणच मिटक्या मारत एकमेकाला सांगत बसतो व एखाद्या कार्यक्रमाला त्यालाच लहान मुलांना बक्षिस द्यायला बोलावतो हे काम दगडाचंच.

हे सर्व मोठे विषय झाले. प्रत्यक्षातल्या अशा कितीतरी लहान लहान गोष्टींमधे आपणही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामिलही असतो. कुठल्या भितीत बसायचं हे दगडाच्या हातात कुठं असतं? भर रस्त्यात कुणावर तरी वार होत असतात आणि बाकीचे ‘कशाला भानगडीत पडा’ म्हणून दुर्लक्ष करून पुढं जात असतात. लोकलमधे किंवा रस्त्यात एखाद्या स्त्रीची खुलेआम छेड काढली जात असते आणि बाकीचे मख्खपणे बघत असतात किंवा त्याचं व्हिडीयो शुटींग तरी करत असतात. हेच शुटींग नंतर निर्लज्ज चॅनलवाले ‘बार्कींग न्यूज’ म्हणून दाखवतात आणि आपणही मिटक्या मारत आणि खोटं हळहळत ते बघत बसतो. ट्रेनमधल्या जीवघेण्या गर्दीत उभ्या असलेल्या वृद्धाला आपली जागा न देता कित्येकजण आपले डोळे खिडकीच्या बाहेर लावून बसलेले दिसतात. लोकलमधे पाठी-पोटावर घेतलेल्या भरगच्च सॅकचा त्रास, मागे-पुढे चेंगरून उभ्या असलेल्या आपल्या सहप्रवाशाना होतोय याची यत्किंचितही दखल न घेता, कानात इअर फोन व डोळे मोबाईलमधल्या पिक्चरमधे असे अनेकजण उभे असतात. मुंबई मेट्रोसाठी मुंबईतील पूर्ण वाढलेली आणि शंभर दिडशेपेक्षा जास्त वय असलेली झाढं कापणार ही बातमी आणि नविन चार कोटी झाडं लावणार हा सरकारी विनोद वाचून आपल्याला काहीच वाटत नाही ही सर्व आपल्या मनाचा दगड झाल्याची लक्षणं नाहीत तर काय..!

भिती मनाचा दगड झाल्याची नाही, तर हा दगड समाजाचाच कपाळमोक्ष करील याची आहे. ती प्रक्रीया सुरू होण्यापूर्वीच हा दगड फोडला पाहीजे. दगडाच्या आतही जीवन असू शकतं हे रामदासस्वामींनी शिवरायांना दाखवून दिलं होतं. आता मात्र आपल्यालाच आपले रामदास स्वामी बनवून, स्वत:च्याच मनाचा दगड फोडून आतील जीवनाला वर आणायची कधी नव्हती येवढी गरज आज आहे.

स्वत:चं, दुसऱ्याचं दु:ख-त्रास, होणारा अन्याय पाहून मन अस्वस्थ होऊन, त्यावर जमेल तशी सकारात्मक कृती प्रत्येकाने केली, तरच या दगड झालेल्या मनातील जीवनप्रवाह जिवंत राहू शकेल. अगदी एका माणसाला मदत केली तरी ती पुरेशी आहे. फक्त ‘मला काय करायचंय’ ही वृत्ती सोडणं गरजेचं आहे. आपल्याला जमेल तशी मदत अडल्या-नडल्यांना करणं हे मनाचा दगड न होऊ देण्यावर औषध..मदत म्हणजे फक्त पैसा नव्हे, पैशांचा नंबर तर खुप नंतर येतो. मदत म्हणजे फुंकर धालणं, दोन शब्द बोलणं. आपला थोडा वेळ खर्चून दोन चांगले शब्द बोललो, तरी कित्येकांना उभारी येऊन त्यांची लढाई लढण्यासाठी त्यांना पाठबळ मिळेल.

रणांगणावरील युद्ध अर्जुनच लढला, पण त्याच्या सोबत कृष्ण आहे या भावनेनं त्याला लढांई लढायला ताकद दिली. आपण आपलाच किंवा दुसऱ्याचा कृष्ण होऊ शकतो. त्यासाठी नविन अवताराची वाट पाहाण्याची गरज नाही. अर्जुनाप्रमाणे प्रत्येकजण आपली लढाई आपण स्वत:च लढतो, नव्हे, ती त्याला स्वत:लाच लढावी लागते. या लढाईत आपल्यासोबत कुणीतरी कृष्ण आहे हा विश्वास लढणाऱ्याला आत्मविश्वास देतो. आपणही एखाद्या गरजूसोबत आहोत हा विश्वास त्याच्यात निर्माण करणं, म्हणजे दगड झालेल्या मनातील ‘जीवन’ जिवंत ठेवणं..

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..