“बगळा” या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरीचा ज्येष्ठ साहित्यिक चरित्रकार वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद
आजवर प्रकाश संतांच्या “वनवास”मुळे “लंपन” भेटला होता. आता प्रसाद कुमठेकरांचा “चिंत्या” भेटला. गंमत म्हणजे हा “चिंत्या” स्वतः काहीच सांगत नाही. ‘ बगळा’ कादंबरीचा हा नायक पाचव्या इयत्तेत शिकतोय. तो स्वत्तःविषयी काही सांगत नसला तरी त्याच्या मित्रांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या तोंडून तो समजत उलगडत जातो.
चिंत्या कमी बोलणारा आहे आणि स्वतंत्र विचार करणारा आहे. वयाच्या मानानं त्याला समज चांगली आहे अन॒ तो आअुट ऑफ बॉक्स विचार करतो. तो प्रामाणिक आहे. चांगली निरीक्षण शक्ती आहे त्याच्याकडे. त्याचं वागणं, बोलणं मळवाटेने जाणाऱ्यांना समजणं कठीण आणि चौकटीत अडकलेल्या रूढ चौकटबद्ध शिक्षणपद्धतीला त्याला प्रोत्साहन देता येणं दुष्प्राप्य …आणि हे कमी म्हणून काय ‘चिंत्या’ सारख्यांच्या उमलू पाहणाऱ्या प्रवृत्तीवर पाणी ओतायला भोवतीच्या चालीरीती, गैरसमजुती, चाकोरीबद्ध सामाजिक स्थितीगती, आर्थिक अडचणी असतातच.
हुशार, संवेदनशील, सरळमार्गी मुलाची चाकोरीबद्ध शिक्षणपद्धतीत होणारी कोंडी प्रसाद कुमठेकरांनी एरवी साध्या वाटणाऱ्या घटनेतून समोर आणली आहे. चिंत्याकडून मित्राचा अकरा रुपये किंमतीचा क्रिकेट बॉल हरवतो. तो विकत घेऊन मित्राची भरपाई करण्याचे दडपण चिंत्यावर येते.. पैसे मिळवण्याच्या धडपडीत (प्रामाणिक) चिंत्याला मार्ग सापडतो तो बगळा पकडून तो विकून पैसे मिळवण्याचा. त्या साठीचे त्याचे प्रयत्न त्याची वृत्ती, बुद्धी, कौशल्य, निरागसता, क्षमता दाखवतात आणि त्याच वेळी भोवतीच्या संबंधितांच्या प्रतिक्रिया, सामाजिक- आर्थिक व्यवस्था यांचं दर्शनही घडवतात. अवघ्या काही दिवसांच्या अवधीतील हा जीवनपट तिथला समाज, त्याची धारणा, शिक्षण व्यवस्था यावर प्रकाश टाकतो… वर वर साधी वाटणारी हि कादंबरी वाचकाला विचारात टाकते. अनेक विसंगतीवर बोट ठेवते.
उदगीरच्या परिसरातील बोली भाषेत हि कादंबरी असली तरी वाचताना अडखळायला होत नाही. तिच्यातले काही शब्द प्रमाण मराठी भाषेला अपरिचित असले तरी ते समजतात. त्यातल्या सामासिक शब्दांची फोडही समजते.
एरवी नगण्य वाटणाऱ्या एका घटनेवरची ही छोटी कादंबरी जाताजाता वाचकाला एक टपली मारते आणि ‘चिंत्या’ विषयी विचार करायला लावते. चौकस, उत्सुक, बुद्धिमान मुलांचे बगळे मुक्त संचार करू शकतील ना, हि आशंका हुरहूर लावते.. अस्वस्थ करते.
बगळा
प्रसाद कुमठेकर
पार पब्लिकेशन्स
किंमत ३०० रुपये
Leave a Reply