किराणा घराण्याच्या ज्येष्ठ, चिंतनशील गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे येथे झाला.
आई-वडील शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीही मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी आई-वडिलांची तीव्र इच्छा होती, पण हॉस्टेलवर एकटीनं राहण्याची तयारी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचा नाद सोडावा लागला. शेवटी शास्त्र शाखेतली पदवी संपादन करून नंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. खरं तर घरात संगीताची कुणालाच खास आवड नव्हती. संगीत घरात शिरले ते केवळ अपघातानेच. आईच्या आजारपणानं घर बेजार झाल्यामुळे कुणीतरी त्यांना पेटी शिकवण्याचा उपाय सुचवला. आईचं मन त्यात रमलं नाही, पण लेकीनं मात्र सूर पकडला आणि आयुष्यभर सुरांनीही प्रभाताईंना उत्तम साथ दिली.
सुरुवातीच्या काळात विजय करंदीकरांच्या शिकवणुकीतून प्रभाताईंना सुरांची ओळख झाली. रागांशी परिचय झाला. ताल समजू लागला आणि ख्याल, ठुमरी, नाटय़गीत, भावगीत यांसारखे सगळे गानप्रकार त्या मैफलींमधून गाऊ लागल्या. त्यांनी ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर व त्यांचे प्रतिभावंत बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे सातत्याने अनेक वर्षे शिक्षण घेतले. सुरेशबाबू व त्यांच्या मोठय़ा भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्यावरील प्रभाताईंच्या गाढ श्रद्धेचाही प्रत्यय वाचकांना त्यांच्या लेखनातून वारंवार येतो. एके ठिकाणी त्या म्हणतात-
‘‘व्यवसायातल्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकदा मन:शांती ढळण्याचे प्रसंग येतात. मैफल उखडल्यासारखी होते. रियाजानंही समाधान मिळत नाही. जीवनावरची श्रद्धा डळमळायला लागते आणि हलकेच बाबूराव आणि हिराबाई आपले सूर घेऊन मनात वस्तीला येतात. तेवढा एक क्षण पुरेसा होतो. मन पुन्हा उभारी घेतं. शांत परिसरात असलेल्या शिवालयातील शुचिर्भूतता रियाज करताना मला माझ्या सुरांतून जाणवायला लागते. जीवनावरची श्रद्धा पुन्हा दृढ व्हायला लागते.’’
आकाशवाणी नागपूर केंद्र व मुंबई आकाशवाणीवर काही काळ संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख म्हणूनही जवळजवळ दहा वर्षे त्या कार्यरत राहिल्या. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून मा.प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकी सोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही मा.प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात.
प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप – मल्हार, तिलंग – भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. रंगमंचावर गाण्याचा प्रभावी आविष्कार कसा करावा त्याचे तंत्र त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून आत्मसात केले. मा.प्रभा अत्रे यांनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीतिकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या होत्या. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर व्हावा, या उद्देशाने डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन या संस्थेची त्यांनी केलेली स्थापना हे एक महत्वाचे पाऊल ठरले. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन स्थापना आणि पुणे येथे ‘स्वरमयय गुरुकुलची’ स्थापना करुन, शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांना त्या विशेष प्रोत्साहन देत आहेत. क्रियात्मक संगीत आणि संगीत संशोधन या दोन्ही गोष्टींचे मार्गदर्शन त्या करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट केली आहे. संगीतविषयक अनेक प्रकल्पांमध्ये, कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांचा खूप मोठा शिष्य परिवार आहे, त्यात परदेशातून आलेले शिष्यही आहेत. प्रत्यक्ष क्रियेबरोबर लेखन, वाचन, चिंतन आणि चर्चाही महत्वपूर्ण असल्याचे त्या आपल्या शिष्यवर्गाला सांगतात. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र शैलीत संगीतातील नवे राग निर्माण केले आहेत. आपल्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणारी मा. प्रभा अत्रे यांचे ‘स्वरमयी’ हे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकीच आनंद देतात. आपल्या सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे ‘स्वरमयी.’ त्यांच्या ‘स्वरमयी’ या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक लाभले आहे. जवळजवळ दोनशेच्यावर बंदिशी त्यांनी लिहिल्या असून ‘स्वराली, अंतस्वर’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘आचार्य अत्रे अॅवॉर्ड, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, स्वरसागर संगीत पुरस्कार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा ‘स्वररत्न’ पुरस्कार, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ऍ़वॉर्ड, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, इत्यादी पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारने पद्मश्री व पद्मविभूषण देऊन गौरव केला आहे.
त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, ह्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मा. प्रभा अत्रे यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=aPj8nRdJ3B8
Leave a Reply