बर्याच लोकांना सारख्या ढेकरा येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे जास्त आढळते.
वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जिवाणू प्रक्रिया.
बध्दकोष्ठता असल्यावर मोठया आतडयात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा असतो.
उपचार
बैठया जीवनपध्दतीत गॅस होणे स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे. निदान चालण्याची सवय असावी. ज्या अन्नपदार्थांमुळे गॅस वायू होतो ते टाळावेत.
वायूने फारच त्रास होऊन पोट फुगले असल्यास एक सोपा उपाय करता येईल. गुडघे व कोपरावर ओणवे होऊन गुदद्वारात साधी लहान रबरी नळी सरकवल्यास आतील हवेला वाट मिळून ती बाहेर पडते. वर सरकणे हा हवेचा नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणूनच पाण्यातून बुडबुडे वर येतात. या गुणधर्माचा वापर करून हवा गुदद्वाराच्या तोंडाशी आणता येते. आतडयाला पीळ पडला असल्यासही कधीकधी या उपायाचा गुण येतो व ऑपरेशन टळते. मात्र नळी अर्ध्या वितीपेक्षा जास्त आत सरकवू नये. योगासनांपैकी काही आसने गॅस गुदद्वाराकडे आणतात. (उदा. पवनमुक्तासन)
आयुर्वेद
वायू, गुबा-यामागे काही कारणे असू शकतात. अति पाणी पिणे,आहारात बटाटा,रताळी, साबुदाणा असे पिठूळ पदार्थ असणे, हरबरा डाळ आणि उडीद, इत्यादी डाळी. अशा विशिष्ट पदार्थांशी संबंध टाळावेत. बैठे काम करणा-यांनाही याचा त्रास होतो.
वायू, गुबारा यांचा त्रास होणा-यांना कपभर गरम पाण्याबरोबर दीड चमचा लवणभास्कर चूर्ण किंवा एक चमचा हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगला उपयोग होतो. ही चूर्णे जेवणाबरोबर, म्हणजे भात-पोळी याबरोबरही घेता येतात.
बैठे काम करणा-यांनी पोटाच्या साध्या क्रिया कराव्यात. एक साधी क्रिया पुढीलप्रमाणे. जेवणानंतर दीड-दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून5 ते 15 सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार व नेहमी केल्यास गुबा-याचा त्रास निश्चित कमी होतो. मात्र बेंबी आत ओढून धरल्यास दुखत असेल तर आतील अवयवांना सूज आहे अशी शंका येणे साहजिक आहे अशा बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योगाभ्यासात पोटासाठी बरेच उपाय आहेत.(नौलि, उड्डियान, इ.) या उपायांचा निश्चित उपयोग होतो.
होमिओपथी निवड
आर्सेनिकम, बेलाडोना, सीना, कॉस्टिकम, चामोमिला, फेरम मेट लायकोपोडियम,नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर,डायस्कोरिया, चायना
— लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
— आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन (Posted by Sushama Mohite)
Leave a Reply