जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे अठ्ठे चाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग सहा
देव देवतांची जिथे स्थापना केलेली आहे तिथे, अथवा ज्या वृक्षाखाली सत्पुरुषांनी साधना केलेली आहे असे वृक्ष जसे अजान, पिंपळ, वड, कडूनिंब, इ.इ. यज्ञासाठी निर्माण केलेली यज्ञकुंडे अथवा भूमी, बौद्ध मंदिर, अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे इ. पूज्य ठिकाणी मलमूत्र विसर्जन करू नये. येथील जलाशय, कुंडे आवार या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.
ही सार्वजनीक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे काम फक्त सरकारचेच, पालिकेचेच आहे काय ? नदी नाले आपण टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यामुळे देखील तुंबतात, हे सोयीस्कर रीत्या आपल्याकडून विसरले जाते. नंतर गळे काढून छाती बडवण्याला काही अर्थ नाही. आईवडील जसे वागतात, ते ज्या चुका करतात, त्याच चुका अनुकरणामुळे पुढे मुले आणि नातवंडे पण करीत राहतात.
आपले माता पिता, गुरू आदि पूज्य व्यक्ती तसेच धर्म ध्वज, तिरंगा, राष्ट्रीय प्रतिके यांचा योग्य तो सन्मान ठेवावा, यांची कोणत्याही प्रकारे विटंबना होऊ नये.
ही आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. हे सांगण्याची वेळ खरं तर येऊ नये. आपण आपले राष्ट्रध्वज कसा वापरतोय, त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, वर्षातून फक्त दोन वेळा, न चुकता कोणत्याही ठिकाणी, तिरंग्याला वंदन करण्यासाठी जात नसू तर आपण आपल्या मुलांना देशभक्ती काय आणि कशी शिकवणार ? हे दिवस म्हणजे फक्त सरकारी सण नाहीत. देशभक्ती व्यक्त करण्याची ही एक संधी असते. ती व्यक्त करावीच ! कुठेही आपला तिरंगा अपमानीत होणार नाही, पायदळी तुडवला जाणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला हवी. राष्ट्रगीत वाजत असताना किंवा ऐकत असताना फक्त दोन मिनिटे स्तब्ध उभे राहाता येत नसेल तर मुलामधे देशभक्ती कशी रुजणार ?
एखादी अमंगल म्हणजे वाईट गोष्ट अथवा वस्तूची सावलीही ओलांडून जाऊ नये. राख, तृण, विष्ठा, उष्टे खरकटे, पवित्र दगड, वारुळाची माती, एखाद्याच्या नावाने दिलेला बली, विनाकारण ओलांडून जाऊ नये. एखाद्याने स्नान केलेली जागा देखील ओलांडू नये.
या वस्तू ओलांडल्यामुळे आपल्याला, त्याच्या जंतुसंसर्गामुळे त्रास होऊ शकतो. एवढी साधी गोष्ट आहे. यात अंधश्रद्धा नाही.
आता रस्त्यावर कुणीतरी ओवाळून टाकलेले लिंबू असेल आणि त्याचे सरबत करून, श्रद्धेने कोणाला प्यावेसे वाटले तर जरुर प्यावे. ना नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०६.०९.२०१७
Leave a Reply