नवीन लेखन...

दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी



(या लेखाचे लेखक श्री भास्करराव मिसर हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. )

महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्‍या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.

मध्यंतरी पुण्याजवळील डोणजे गाव येथे आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीची आठवण करून देणारी पार्टी अष्टविनायकातील एक ठिकाण असलेले थेऊर गाव येथे आयोजित करण्यात आली होती. ‘फ्रेंडशीप डे’ च्या निमित्ताने पुणे शहरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी या पार्टीसाठी जमले होते. सिंबायोसिस, व्हीआयटी, एमआयटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थी-विद्यार्थीनी या पार्टीसाठी हजर होते. त्यातील बहुतांश विद्यार्थी परराज्यातील असून सिंबायोसिस महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने ही पार्टी आयोजित केल्याचे बोलले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन झाले असले तरी डोणजेमधील रेव्हपार्टीप्रमाणे अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले नाही.

सध्या मद्य प्राशनाला समाजात प्रतिष्ठा मिळाली असली तरी आपल्याकडे दारूबंदी कायदा स्वातंत्र्यापासून अस्तित्वात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोरारजी देसाई यांच्या प्रयत्नाने संपूर्ण देशात दारूबंदीचा कायदा करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या वेळी हा कायदा एकमताने संमत झाला होता. 1952 मध्ये अस्ति:त्वात आलेल्या या कायद्यामध्ये विनापरवाना दारू पिणार्‍यास शिक्षेची तरतूद असली तरी या कायद्याची कडक अंमलबजावणी कधीच झाली नाही. या कायद्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे पोलिसांचे बरेचसे लक्ष इतर गुन्ह्यांकडून या कायद्याच्या अंमलबजावणीकडे वळले आणि त्यातूनच भ्रष्टाचार वाढला. मद्य प्राशन करण्यासाठी

लोकांना एक परवाना देण्यात येतो. दोन रुपये देऊन हा परवाना मिळू शकतो. म्हणजे हा परवाना नसलेल्यांना

मद्य प्राशन करण्यास बंदी आहे. परंतु, याची अंमलबजावणीही झाली नाही. सर्वत्र ढिसाळपणाचा कारभार असल्याने व्यसनांचे प्रमाण वाढले. देशात ठिकठिकाणी बार निघाले आणि आता तर मद्य प्राशनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

येऊरच्या पार्टीबद्दल बोलायचे झाले तर या पार्टीत बहुतांश विद्यार्थी परराज्यातील असल्याने अशी पार्टी आयोजित करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते, हे त्यांना माहीत नसणे शक्य आहे. अशा बाबतीत समाजानेच धोरण ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. दारुबंदी असावी की नसावी याचाही विचार व्हायला हवा. दारुमुळे समाजाचे मोठे नुकसान होते. विशेषत: गरीब वर्गाला दारूचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात. दारूमुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाल्याची उदाहरणेही कमी नाहीत. दारूचे व्यसन लागल्यावर कालांतराने ही नशा पुरेशी ठरत नाही तेव्हा अनेकजण अमली पदार्थांकडे वळतात. अशा परिस्थितीत केवळ मद्य प्राशन किवा अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला शिक्षा करून उपयोग नाही. त्यासाठीच अशा गुन्ह्यांसंदर्भात कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बदल करायला हवा. आपल्याकडे चोर्‍यामार्‍यांच्या आणि व्यसनासंबंधीच्या गुन्ह्यांना एकाच तराजूत तोलले जाते. व्यसनांच्या गुन्ह्यात अटक झालेल्या व्यक्ती शक्यतो त्यांना मद्य किवा अमली पदार्थ कोणी पुरवले याची माहिती देत नाहीत कारण त्यांना पुढील पुरवठाही सुरू ठेवायचा असतो. अशा प्रकारे ठोक विक्रेत्याला किरकोळ विक्रेता संरक्षण देत असतो तर किरकोळ विक्रेत्याला ग्राहकाकडून संरक्षण मिळत असते. त्यामुळे विना परवाना मद्य पुरवठा करणार्‍या व्यक्ती पडद्याआडच राहतात. पुण्यातील मुक्तांगण या संस्थेने या संदर्भात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेत व्यसनी व्यक्तीला गुन्हेगार म्हणून नव्हे तर व्यसनी म्हणून उपचार दिले जात. उपचारांनंतर रुग्ण व्यसनमुक्त झाल्यावर त्याच्याकडून या (विशेषत: अमली पदार्थाच्या) व्यवसायातील व्यक्तींची (पेडलर्स) माहिती काढून घेऊन पोलिसांना दिली जात असे. त्यामुळे व्यसनी व्यक्तीला शिक्षा होण्यापेक्षा त्याला अमली पदार्थ पुरवणार्

यांना शिक्षा होत असे. सुनंदाताई अवचट यांच्यानंतर हे काम काहीसे मागे पडले. पण मुक्तांगणचा आदर्श इतर संस्थांबरोबरच पोलिसांनीही ठेवायला हवा. अशा गुन्ह्यांसदर्भात त्यांनी तपासाची वेगळी पद्धत अवलंबायला हवी.

येऊर गावात झालेल्या पार्टीसार्‍या प्रसंगांमध्ये बहुतेक वेळा तरुण मुलामुलींना पकडले जाते, खळबळजनक बातमी म्हणून प्रसारमाध्यमेही अशा घटनांना प्रसिद्धी देतात. या मुलांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, जामीनावर त्यांना सोडले जाते आणि वर्षानुवर्षे कसेस सुरू राहतात. परंतु यात मद्य पुरवणार्‍या व्यक्तीचे किवा साखळीचे नाव कुठेही येत नाही. मुलांनी विना परवाना मद्य प्राशन आणि मद्यसाठा केल्याचा गुन्हा केला तर त्यांना मद्य पुरवणारेही तेवढेच जबाबदार ठरतात. परंतु, त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. शिवाय, अशा पार्ट्या म्हणजे मोठे इव्हेंट्स ठरू लागल्याने त्यांचे इव्हेंट मॅनेजरचीही नावे समोर यायला हवीत. म्हणूनच अशा गुन्ह्यांच्या तपासपद्धतीत बदल करायला हवेत. या गुन्ह्यांसंदर्भात ताब्यात घेतलेल्या मुला-मुलींना विश्वासात घ्यायला हवे. त्यांच्याशी वाटाघाटी करून काही वर्षांचे बॉण्ड्स लिहून घ्यायला हवेत. या बॉण्ड्समध्ये यापुढे आपण मद्यप्राशन करणार नाही असा उल्लेख असायला हवा. यानंतर त्यांना माफीचे साक्षीदार करून घ्यायला हवे. दरम्यान, त्यांना समुपदेशन करून गरज भासल्यास त्यांच्यावर व्यसनमुक्तीचे उपचारही करावेत. यामुळे त्यांच्या मनात तपासयंत्रणेबद्दल विश्वास निर्माण होऊन ते या यंत्रणेला सहकार्य करतील. यातून अनेक बडे मासे सापडू शकतील आणि हेच अपेक्षित आहे.

परप्रांतीय मुलांना इतर राजांचे कायदे माहीत नसल्याने त्यांच्या हातून अनावधानाने काही गुन्हे घडू शकतात. त्यांच्याशी सहानुभूतीने वागायला हवे. अमेरिकेत आणि काही युरोपीय देशांमध्ये विशेष ‘ड्रंक कोड’ अस्तित्वात असून मद्य प्राशनाच्या गुन्हेगारांवरील केसेस दहा ते बारा वर्षे तशाच ठेवल्या जातात. दरम्यान, त्यांच्यावर

व्यसनमुक्तीचे उपचार केले जातात आणि नंतर या केसेस मागे घेतल्या जातात. काहीसे असेच धोरण आपण अवलंबायला हवे. विशेष म्हणजे बिअरबार किवा परमीट रूमध्ये बेकायदा दारूविक्रीला

आळा घालण्यासाठी त्यांची नियमित तपासणी करायला हवी. मद्य प्राशनामुळे संसार उद्ध्वस्त होतात हे तर खरेच आहे पण मद्य पिऊन गाडी चालवताना होणारे अपघात, पार्ट्यांमध्ये घडणारे अनैतिक प्रकार असे दुष्परिणामही दिसून येतात. त्यामुळे यावर दारुबंदी हेच उत्तर आहे. आपल्या कायद्यात दारुबंदीची तरतूद असूनही प्रभावी अंमलबजावणी नसल्याने हा कायदा कुचकामी ठरत आहे. दारुमुळेच पार्टीला रंग चढतो असे नव्हे हे युवकांना पटवून द्यायला हवे. अशा पार्ट्यांचा केंद्रबिंदू विद्यार्थी असल्याने त्यांना वाचवणे हे आद्यकर्तव्य मानले पाहिजे. अर्थात, मद्याला समाजमान्यता मिळाल्याने संपूर्ण दारूबंदी करणे अवघड असले तरी आपले ध्येय तेच असायला हवे. दारूबंदीला वेळ लागेल; पण ते अशक्य नाही.

पार्टी करा पण…

तरुणाई म्हणजे जल्लोष. आजकालच्या तरुणाईच्या जल्लोषामध्ये पार्ट्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पण, अनेकदा काही कायदेशीर बाबी माहित नसल्याने पार्टीचा बेरंग होतो. त्यामुळे पार्टी करण्यापूर्वी त्यासंदर्भातील कायद्याची थोडी फार माहिती हवी.40 व्या कलमामध्ये मद्याच्या परवान्याविषयीची माहिती आहे.

*अर्जदार सज्ञान असेल, तो भारताव्यतिरिक्त इतर देशात जन्मला असेल, मोठा झाला असेल किवा त्या देशाचा रहिवासी असेल तर सरकार त्याला विदेशी मद्याचा वापर करण्याचा किवा प्राशन करण्याचा परवाना देते.

*कायद्याने ठरवून दिलेल्या मद्याच्या प्रमाणानुसारच परवाना मिळेल.

*या संदर्भात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास राज्य सरकारचा निर्णय अंतिम असेल.43 व्या कलमामध्ये मद्यप्राशनाविषयीचे नियम दिले आहेत.

* कलम 40 बीनुसार परवानाधारक असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणत्याही परवानाधारकाला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करता येणार नाही.

* 40, 41, 46, 46ए किवा 47 व्या कलमानुसार परवानाधारक असलेली व्यक्ती या कलमांनुसार परवानाधारक असलेल्या इतर व्यक्तींना स्वत:जवळील विदेशी मद्य पिण्याची परवानगी देऊ शकते.

* 40, 41, 46, 46ए किवा 47 व्या कलमानुसार परवानाधारक असलेली व्यक्ती कोणत्याही समारंभप्रसंगी असा परवाना नसलेल्या व्यक्तींना परदेशी मद्य देऊ शकत नाही.

* 66 व्या कलमामध्ये अशा गुन्ह्यांसाठीच्या शिक्षांची माहिती आहे. 66 2 (1) या कलमानुसार वरील नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.

* नियमांचा प्रथमच भंग करणार्‍या व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड.

* दुसर्‍यांदा नियमभंग केल्यास दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 20 हजार रुपयांपर्यंतचा दंड.

* तिसर्‍यांदा नियमभंग केल्यास दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 20 हजार रुपयांपर्यंतचा दंड. शरीरातील मद्याचे प्रमाण-मद्यपान

केलेल्या व्यक्तीच्या रक्तात 0.05 टक्क्यांपेक्षा अधिक अल्कोहोल असेल तर मद्याचा वापर उपचारांसाठी, टॉयलेट प्रीपरेशन, निर्जंतुकीकरण, स्वादासाठी, इसेन्स किवा सिरप या कारणांसाठी करण्यात आला होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर राहील.

— भास्करराव मिसर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..