आज महानायक मा.अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. त्यांचा जन्म. ११ ऑक्टोबर १९४२. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात.
‘शतकातला श्रेष्ठ कलावंत’ हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं. इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत. हे पाहिलं की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आठवतं :’हे सर्व कोठून येतं?’
मा.अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महा विद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महा विद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले.
मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची “अंग्री यंग मॅन” ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच ‘सुपरस्टार’ पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले.
आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमकहलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
मा. अमिताभ बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी याच्याशी १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. त्यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली.
२००० मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या पंचाहत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते केबीसी साठी सूत्रसंचालन करत आहेत.
फक्त काम करत नाही तर वेगळ्या भूमिकांच्या शोधात ते असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वात ‘तरूण’ आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या अभिनय प्रवासबद्दल….
अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली असली तरी त्यांचा पहिला सिनेमा १९६९ साली आलेला ‘भूवा शोमे’ हा होता. या सिनेमात त्यांनी व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट म्हणून काम केले होते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमितजींना खरी लोकप्रिय आणि ओळख मिळाली ती १९७३ साली आलेल्या ‘जंजीर’ या सिनेमातून. या सिनेमापासून तयार झालेली त्यांची अॅंग्री यंग मॅन इमेज आजतागायत कायम आहे.
पहिला पगार ८०० रूपये –
करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात अमिताभ बच्चन यांनी आकाशवाणीमध्ये अनाऊंसर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यांना त्यांच्या आवाजामुळे नकार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांना महिन्याला ८०० रूपये पगार होता. त्यावेळी दिलीप कुमार आणि आशा पारेख या हे त्यांचे आवडते कलाकार होते.
७ फ्लॉपनंतर पहिला हिट सिनेमा –
१९६९ ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमात त्यांना पहिली संधी मिळाली. हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २० सिनेमांमध्ये काम केले. पण तेही फ्लॉप झाले. पण ‘जंजीर’ सिनेमाने त्यांचं नशीब बदललं.
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार –
१९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांना एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
राजकारणात अपयश –
अमिताभ बच्चन यांनी राजकारणातही नशीब आजमावलं. पण त्यांना तिथे यश आलं नाही. नंतर ते इलाहाबादचे खासदारही राहिले होते. पुढच्या तीन वर्षात त्यांनी राजीनामा दिला होता.
रेखा-जया नव्हत्या पहिलं प्रेम –
अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राने खुलासा केला होता की, जया किंवा रेखा त्यांचं पहिलं प्रेम नव्हत्या. त्यांचा एका महाराष्ट्रीय मुलीवर जीव जडला होता. एका ब्रिटीश कंपनीत ही मुलगी काम करत होती. अमिताभ आणि ती मराठी मुलगी एकाच कंपनीच काम करत होते. अमिताभ यांना तिच्याही लग्नही करायचं होतं. मात्र तिने त्यांना नकार दिला. त्यानंतर अमिताभ हे मुंबईत आले.
रोज ओढायचे सिगारेट –
अमिताभ बच्चन तरूणपणी सिगारेट ओढायचे. त्यासोबतच ते मद्यही प्यायचे. पण त्यानंतर त्यांनी सगळं बंद केलं. आता ते शुद्ध शाकाहारी आहेत.
पेन आणि घडाळ्यांचे शौकीन –
अमिताभ बच्चन यांना पेन गोळा करण्याचा हौस आहे. त्यांच्याकडे वेगवेगळे १००० पेक्षा जास्त पेन आहेत. त्यासोबतच त्यांना घडाळ्यांचीही आवड आहे. एकदा घातलेली घड्याळ ते पुन्हा घालत नाहीत.
दोन्ही हाताने लिहितात –
अमिताभ बच्चन यांना इंजिनिअर व्हायचं होत. त्यासोबतच त्यांना इंडियन एअरफोर्समध्ये भरती व्हायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यांची खासियत म्हणजे ते दोन्ही हाताने लेखन करू शकतात.
२४०० कोटींची संपत्ती –
मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकदे तब्बल २४०० कोटींची संपत्ती आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे ११ लक्झरी कार्स आहेत.
संदर्भ:- इंटरनेट
– गणेश उर्फ अभिजित कदम
Leave a Reply