सुमती टिकेकर या जयपूर घराण्याच्या शास्त्रात्य गायिका होत्या. संस्कृत आणि मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री व गायिका अशी सुमती टिकेकर यांची ख्याती होती. बालगंधर्वांची नाटय़पदे त्या अतिशय उत्तम पणे सादर करत. पूर्वाश्रमीच्या सुमती लघाटे विवाहानंतर सुमती टिकेकर झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची गोडी होती. शालेय जीवनात मालती पांडे, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा यांना त्या आदर्श मानत. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर लता मंगेशकर व आशा भोसले यांनी त्यांना भुरळ घातली. त्यामुळे देवधर स्कूल आणि गांधर्व महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शाळा-कॉलेजमध्ये त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली होती. बाळासाहेब टिकेकर यांच्याशी सुमतीबाईंचा विवाह झाला.
व्यवसायाने वकील असलेले बाळासाहेब टिकेकर हेही आग्रा घराण्याचे गायक. अभिनय ही त्यांचीही आवड. त्यामुळे त्यांनीही सुमतीबाईंच्या गाण्याला प्रोत्साहनच दिल्याने लग्नानंतर त्यांचे संगीत शिक्षण सुरू राहिले. सुमतीबाईंनी कमल पांडे, कृष्णराव चोणकर, अनंत दामले यांच्याकडे नाट्यसंगीताचे धडे गिरवले. ‘संगीत शारदम्’, ‘मृच्छकटिकम्’, ‘सौभद्रम्’ अशा संस्कृत नाटकांबरोबरच ‘संगीत वरदान’, ‘संगीत मानापमान’, ‘संशयकल्लोळ’, ‘एकच प्याला’ अशा मराठी संगीत नाटकातील भूमिकाही त्यांनी दमदारपणे वठवल्या होत्या. अभिनेत्री म्हणून त्यांनी रंगभूमीवर केलेली कामगिरी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. पुत्र उदय आणि कन्या उषा यांच्या जन्मानंतर सुमतीबाईंनी ‘संगीत विशारद’ची पदवी संपादन केली होती. त्यांच्या ‘आठवणी दाटतात’, ‘अनामिक नाद उठे गगनी’, ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ या गाण्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. नाटय़संगीतामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
‘संगीत वरदान’, ‘संगीत मान-अपमान’,‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’ यासह अनेक गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी भूमिका बजावल्या. अनामिक नाद उठे गगनी, आठवणी दाटतात, श्रीरामाचे दर्शन घडले ही त्यांची विशेष गीते आहेत. ‘आठवणी दाटतात..’ गाणे गायलेल्या सुमती टिकेकर यांची हे गाणे म्हणजे ओळखच बनले होते. शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत आणि सुगम संगीतातील टिकेकर जाणकार होत्या. जयपूर घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम घेऊन त्यांनी नाट्य संगीत आणि सुगम संगीतातही आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले होते. सुमती टिकेकर या अभिनेते उदय टिकेकर व गायिका उषा देशपांडे यांच्या आई व आरती अंकलीकर टिकेकर यांच्या त्या सासूबाई होत. सुमती टिकेकर यांचे १२ ऑक्टोबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply