भारत ही आयटी क्षेत्रातली महासत्ता आहे असं म्हणतात आणि ते कायमच रहाणार आहे. आमच्याकडे टॅलेंट आहे त्यामुळेच सर्वात मोठा आयटी फोर्स आहे. आयटी शिक्षणाच्या फॅक्टर्याच आहेत. जो उठतोय तो आयटीमध्ये जायची स्वप्न बघतोय. नोकर्यांना तोटा नाही. पगारसुद्धा भरपुर आहेत.
एकविसाव्या शतकात आयटी हा परवलीचा शब्द बनला आणि सगळं जग त्याच्याकडे आकर्षित झालं. आम्हीही झालो नसतो तरच नवल. धडाधड आयटी कंपन्या सुरु झाल्या. “आयटीत”ली कामगार भरती “ऐटीत” सुरु झाली. पॉश ऑफिस.. ऐटबाज कपड्यातले साथी-सवंगडी.. “कडक” कपड्यातल्या को-वर्कर्स… चकचकीत कॅंन्टीन्समधले पिझ्झा-बर्गर.. चकाचक बसमधून ऑफिसचा प्रवास.. “फाईव्ह डे विक”… विकएंडच्या पार्ट्या.. महिन्यामहिन्याला थेट बॅंकेत जाउन पडणारा भरगच्च पगार… खर्च करायला हातात क्रेडिट कार्ड… कधीमधी कामासाठी परदेशाची वारी… हे सगळं भुरळ पाडणारच ना?
पण मग प्रॉब्लम काय? प्रॉब्लेम एवढाच आहे की या सगळ्या मायावी जगात आपण खर्याखुर्या आयटी क्षेत्रात नेमकं काय करतोय हे कोणीच समजून घेत नाहीय. या सगळ्या चकचकीत बिल्डिंगमधल्या पॉश आफिसेसमध्ये नेमकं काय काम चालतं…त्यात आपल्याकडच्या टॅलेन्टचा वाटा किती हे बघितलंच जात नाही.
भारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये बहुसंख्य कंपन्या “सर्व्हिस सेक्टर” म्हणजेच “सेवा क्षेत्रा”त आहेत. म्हणजेच त्या जगातल्या वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या सेवा देतात. ठिक आहे… या सेवांपैकी बहुतांश सेवा “बीपीओ” म्हणजचे “बॅक ऑफिस प्रोसेसिंग” प्रकारच्या असतात. म्हणजे काय… तर जी कामं युरोप – अमेरिकेतल्या कंपन्यांना तिकडे करायला प्रचंड खर्च येतो तो कमी करण्यासाठी ती कामं आपल्याकडे दिली जातात. आपल्याकडे श्रमाची किंमत अत्यल्प असल्याने या कंपन्या कमीतकमी खर्चात ती कामं करुन देतात… हेसुद्धा ठिक आहे…. तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. “कोणी बोलायचं काम नाय!”
प्रश्न वेगळाच आहे.. एकच नाही तर अनेक आहेत.. आपण दररोज आपल्या संगणकावर जी काही अनेक सॉफ्टवेअर वापरतो त्यातली किती भारतात बनलेली असतात? अगदी “मायक्रोसॉफ्ट”च्या विंडोज पासून सुरुवात करुया. “मायक्रोसॉफ्ट”च्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये भारतीयांचा मोठा वाटा असल्याचं खुद्द बिल गेटसनेदेखील एकेकाळी मान्य केलंय. मायक्रोसॉफ्टने त्यांची बरीचशी कामं आता भारतात करायला सुरुवात केलेय. आणि हे करण्यात मोटा वाटा आहे भारतातल्या तंत्रज्ञांचा. आता प्रश्न असा आहे की “मायक्रोसॉफ्ट विंडोज”च्या अगदी तोडिस तोड नाही तरी किमान सुविधा देणारी एकादी “ऑपरेटिंग सिस्टिम” बनवण्याची तयारी भारतातल्या आयटी जायंटसनी दाखवायला काही हरकत आहे का?
“विंडोज”चे एकवेळ सोडून द्या. पण ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही?
तेही सोडून देऊ. बरं आता आपण दररोज इंटरनेटवर फिरण्यासाठी जो “क्रोम” वगैरेसारखा ब्राऊजर वापरतो तसा एखादा ब्राऊजर एखाद्या भारतीय “जायंट”ने बनवलेला बघितलाय ?
“गुगल”सारख्या सर्च इंजिनला टक्कर देण्यासाठी चीनने स्वत:चं सर्च इंजिन बनवलं. तशी धमक तर सोडाच.. साधी इच्छातरी आपल्या “आयटी जायंटस”ना कधी झालेय?
कोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे !!!
सध्या “मेक इन इंडिया”, “स्वदेशी” वगैरे शब्दांची चलती आहे. अशावेळी सॉफ्टवेअर क्षेत्रात स्वदेशीचे वारे वाहू लागले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात परदेशी चलनाची बचत होईल.
“इन्फोसिस”, “विप्रो”, “टीसीएस” वगैरे जायंट कंपन्यांची नावं भारतात आदराने घेतली जातात. त्यांचं कामंही तसंच मोठं आहे. हजारो भारतीयांना त्यांनी नोकर्या मिळवून दिल्या. परदेशवारी करवली, भरपूर परदेशी चलन भारतात आणलं. निदान यांच्याकडूनतरी असं एखादं प्रॉडक्ट बनवलं जाईल अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे का?
मात्र याचा भल्याभल्या आंतरराष्ट्रीय जायंटसना मोठा फटका बसेल आणि तिथेच खरी “गोची” आहे हे लक्षात येईल.
खर्या अर्थाने भारतीय सॉफ्टवेअर्सची निर्मिती झाली तर कोणाची आर्थिक गणितं किती आणि कशी बिघडतील हे बघूया येणार्या काळात…
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply