सत्यदेव दुबे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, नाटकाकडे आकृष्ट झाले. त्यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपले नाव गाजविले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. लहानपणी त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. ते उत्तर आयुष्यातही स्वत:ला संघाचे खंदे समर्थक होते. केवळ रंगभूमीचा ध्यास घेतलेले सत्यदेव दुबे हे कडवा हिंदुत्ववादी होते. ते १९५२ साली मुंबईला आले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे मुंबईतील आणि भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. दुबे यांनी रंगभूमीवरील फार मोठा काळ बघितला. त्यांनी सुरुवातीची वर्षे अल्काझी यांच्या थिएटर युनिटमध्ये काढली. त्यांना या संस्थेत विजय आनंद घेऊन गेला होता.
दुबेंना रंगभूमीवरील जादू आवडली आणि बघता बघता ते नाटय़कर्मी झाले. त्यांनी काही काळ लिंटास या तेव्हाच्या प्रख्यात जाहिरात संस्थेत नोकरी केली होती. हा छोटासा काळ सोडला तर ते नेहमी रंगभूमीशी संबंधित राहिले. धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ हे नभोनाटय़ दुबे यांनी १९६२ साली रंगभूमीवर आणले. या नाटकाने त्यांना भरपूर नाव मिळवून दिले. दुसरे प्रकरण सुरू होते ते दुबे यांनी या नाटकाबद्दल लिहिलेल्या लेखाने. दुबे यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की हे नाटक १९६२ साली रंगभूमीवर येणे याला महत्त्व होते. देशावर चीनचे आक्रमण झालेले होते. दुबेंच्या प्रयत्नांमुळे हे नाटक जगभर गेले. विनोद दोशी या उद्योगपतींनी दुबेंना ताडदेव येथील वालचंद टेरेस या इमारतीचा तळमजला नाटके करण्यासाठी दिला. यामुळे दुबेंच्या आयुष्याची दिशा पक्की झाली. येथे दुबेंनी सुमारे चार वर्षे नाटके केली. १९८० च्या दशकात छबिलदास चळवळ जोरात होती. त्यात दुबेंचा सिंहाचा वाटा होता.
या काळातील दुबेंचे महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘हयवदन’. पौल यांना दिलेल्या मुलाखतीत दुबे नमूद करतात की, त्या काळी स्त्रीच्या भावविश्वाबद्दल लिहिण्याची एक लाट आली होती. ‘हयवदन’च्या आगेमागे ‘आधेअधुरे’ आले, त्याचप्रमाणे सुरेंद्र वर्माचे ‘द्रौपदी’ आले. दुबेंच्या मते ‘हयवदन’मध्ये स्त्रीच्या वासनेबद्दल जी भूमिका घेतली, ती खूप वेगळी होती. दुबेंचे १९९० च्या दशकातील बरेचसे काम पृथ्वी थिएटरमध्ये झाले. सुमारे पन्नास वर्षे दुबे भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. या दरम्यान त्यांनी सुमारे पन्नास नाटके सादर केली. या दरम्यान ते पूर्ण वेळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन केले, नाटकांची भाषांतरे केली, प्रसंगी नाटकात भूमिका केल्या. मुख्य म्हणजे तरुण रंगकर्मीसाठी वेळोवेळी कार्यशाळा घेतल्या. आज भारतीय रंगभूमीवर कदाचित असा एकही महत्त्वाचा नट नसेल, जो कधी ना कधी दुबेंजींच्या सहवासात आला नसेल. ते अविवाहित होते. त्यांचे असंख्य शिष्यगण हेच त्यांचे गणगोत होते. अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, अमरीश पुरी, यांच्यासारखे प्रतिभावान कलावंत त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. मराठीत अमरिश भंडारी, मोहन भंडारी, चेतन दातार, किशोर कदम, सचित पाटील, ऋषिकेश जोशी या अभिनेत्यांबरोबरच महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, राजीव नाईक, शफाअत खान, चेतन दातार, संदेश कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी आदी नाटककारांना त्यांनी घडविले.
त्यांनी मराठी-हिंदी-गुजराती रंगभूमीबरोबरच बंगाली रंगभूमीसाठीही काम केले. श्याम बेनेगल यांच्या ‘भूमिका’,’निशांत’, ‘अंकुर’, ‘कलयुग’ चित्रपटाचे पटकथा व संवादलेखनही त्यांनी केले होते. १९७८ साली सत्यदेव दुबे यांना भूमिका चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, व १९८० साली जुनून चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘अंधा युग’, ‘आधे अधुरे’, ‘ययाती’, ‘संभोग से सन्यास तक’, ‘एवम् इंद्रजित’, ‘अंधारयात्रा’, ‘हयवदन’, ‘पगला घोडा’, ‘रस्ते’, ‘गिधाडे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘तुघलक’, ‘नाणेफेक’ यासारख्या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन केले होते.
निर्मिती करण्याबरोबरच चेतन दातारकडून ‘सावल्या’ हे नाटक लिहून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्यदेव दुबे यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. १९७२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर १९९९ साली कालिदास सन्मान, २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संगीत नाटक अकादमीनेही गौरवले. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आणि योगदानाचा दशकनिहाय आढावा घेणारा ‘सत्यदेव दुबे : ए फिफ्टी इअर्स जर्नी थ्रू थिएटर’ हा ग्रंथ संदर्भग्रंथाच्या पलीकडे जाऊन दुबे माणूस आणि नाटय़कर्मी यांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवण्याचे काम करतो. शांता गोखले यांनी या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिल्या भागात १९६० च्या दशकाची चर्चा आहे. यालाच ‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ुटचा काळ ’असे म्हणतात.
त्यानंतर दुसरा भाग आहे १९७० च्या दशकाबद्दल. याला ‘वालचंद टेरेसचा काळ’ असे म्हणतात. तिसरा भाग ‘छबीलदास चळवळी’चा, जी १९८० च्या दशकात बहरून आली होती. चौथ्या भागात, १९९० च्या दशकात पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंजी केलेल्या कामाची चर्चा आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंच्या कामाचे प्रदर्शन व चर्चासत्रे असा कार्यक्रम आयोजित केला होता. याची चर्चा पाचव्या भागात आहे. या प्रकारे या पुस्तकात दुबेजींच्या पन्नास वर्षाच्या कामाचा आढावा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची चिकित्सा, त्यांच्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल टीका असा भरगच्च मजकूर आणि निवडक छायाचित्रे आहेत. सत्यदेव दुबे यांचे २५ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply