आज जागतिक आरोग्य दिन. WHO ने यावर्षीची संकल्पना ठरवली आहे; Depression: Let’s talk. म्हणजेच ‘नैराश्यावर बोलू काही’. डिप्रेशन ही सध्या झपाट्याने वाढणारी जागतिक समस्या झाली आहे. खरंतर आम्हा भारतीयांच्या मनाला नैराश्याने स्पर्शही करायला नको. नैराश्यावर दोन रामबाण उपाय आपल्याकडे आहेत.
१. श्रीमद्भगवद्गीता
२. शिवचरित्र
भगवंत गीतेत म्हणतात;
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ||
तर आचार्य चरक म्हणतात;
आत्ममेव मन्येत कारणं सुखदुःखयो:।
आपण स्वतःच आपले जीवन सावरू शकतो; घडवू शकतो हेच आमच्याकडचं तत्वज्ञान वारंवार सांगत आहे. आमच्या दुर्दैवाने गीता म्हातारपणात वाचायची असते असं आम्हीच ठरवून टाकलं आहे. ‘शिवप्रभूंच्या जीवनातून आम्ही काय घ्यावं?’ याचा विचार आपण करतो का कधी? तुज आहे तुजपाशी अशीच आमची गत आहे. ही मरगळ टाकून द्या. ज्या देशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करून महान कार्य करणारी महाराणा प्रताप ते स्वामी विवेकानंद यांसारखी व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांच्या मनालाही पराभवाने स्पर्श करता नये. आमचं तत्वज्ञान, इतिहास आणि आयुर्वेद यांची एकत्रित सांगड घातल्यास आज हिंदुस्थान हा जगाला नैराश्यातून बाहेर काढणारा गुरू होऊ शकतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय।’ हा संदेश देणारी ही भरतभूमी आहे.
गदिमा म्हणतात;
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या शब्दांत;
महावादळांच्या विरोधात ठाके |
पुढे संकटांच्या कधीही न वाके ||
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
प्रत्येक आयुर्वेदीय वैद्याने मानसिक व्याधींवर सध्या विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे. शरीरासहच मनालादेखील रोगांचे अधिष्ठान मानणारे आयुर्वेद हे सर्वप्रथम शास्त्र आहे हे आपण जनतेपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. सत्वावजय चिकित्सा या आपल्या अविभाज्य चिकित्सा अंगाचा नव्याने विचार करून समाजाच्या मानसिक आरोग्यात आयुर्वेदाने महत्वाची भूमिका बजावण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ – लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
7 April 2017
Leave a Reply