मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही !
सकाळीच नरसूच्या ‘ हाटेलात ‘ चहाची वाट पहात मंचकराव बसले होते . चहा येईपर्यंत ते आपल्या मिशांवरून मूठ फिरवत होते . निरश्या दुधाचा गरमागरम चहाचा अख्खा कप त्यांनी बशीत ओतला , मग कसरत करत बशी तोंडापर्यंत नेली , मिश्या आडून एकदाचा चहा संपवला . पुन्हा एकदा मिश्या मायेने कुरवाळल्या . मिशा कुर्वाळताना त्यांना साक्षात्कार झाला कि आपले लग्नाचे वय झालंय ,आणि आता आपण लग्न करायला पाहिजे !
तिकडे बार्शी कडे सुंदर मुली मिळतात असे त्यांनी ऐकले होते . ते खरेही असावे . कारण मागे गावच्या जत्रेत बार्शीचा तमाशा अल्ता त्यात चिकण्या पोरी त्यांनी पहिल्याच होत्या .
विचार पक्का झाल्यावर त्यांनी तडक विसुभाऊचा वाडा गाठला . लग्न म्हणजे चार पैसे हवेत . अन पैसे सावकार कडे असतात . विसुभाऊ गावचे सावकार .
“इशु ,मला एक लाख रुपय दे !” मंचकरावनी गेल्या गेल्या तडक आपली मागणी नोंदवली . ताकाला जाऊन गाडगं लपवणे हा त्यांचा स्वभाव नव्हताच ! मुळात ताकाला जाताना ते स्वतःच गाडगं नेतच नसत ,ते ताकवाल्यालाच द्यावे लागे !
“कशाला एव्हडे पैशे पायजेत ?”कपाळावर आठ्या पाडत विसूभाऊंनी विचारले .
” कशाला ? हत्ती विकत घ्यायचाय !”
” मायला , दोनपाच एकर जमील ,एक गाढव आहे ते नीट सांभाळणं होईना ! म्हन हत्ती घेतो ! त्या पेक्षा एखादी जुनी ‘लुना ‘ नायतर सायकल घे ! ”
” ईशा , मी तुला फक्त पैशे मागितलेत , सल्ला मागितला नाही !आता त्या पैशाचं काय करायचं ते आमचं अमी बगु ! तुला काय करायच्यात बांड्या पंचायती ? पैशे द्यायचे तर दे , नाहीतर बस त्याच्यावर नागोबा होऊन !”
याला काय उत्तर देणार ?
मंचकरावांनी शेतातल्या गोठ्यातून आपलं लाडकं गाढव काढलं आणि बार्शी कडे निघाले . अर्थात गाढवावर बसून !
यथा अवकाश त्यांना हवीतशी मुलगी मिळाली . तिचे नाव गिरीजा . गिरीजा एक चांगली बायको होऊ शकते याची खात्री पटल्यावर त्यांनी तिच्याशी भगवंताच्या देवळात लग्न केले .
लग्न कार्य उरकल्यावर , गिरिजेला गाढवावर बसवले , आपणही बसला आणि गावाकडचा रस्ता धरला . थोडे अंतर चालल्यावर गाढव मधेच थांबले . बसल्या जागेवरून मंचकरावांनी गाढवाला थोडे ढोसून पहिले . पण छे गाढवाने जागचे हलण्यास नकार दिला ! मंचकराव गाढवावरून खाली उतरले , डाव्या हाताची पालथी मूठ उजव्या मिशीवरून सावकाश फिरवली . किंचित विचारात पडले . मग निर्णय झाला असावा . एक भरीव टीकूर घेतलं ,आणि गाढवाला ,ते चालू लागेपर्यंत , रट्टे दिले !
” हि पहिली वेळ !” मंचकराव म्हणाले . आणि पुन्हा गाढवावर बसले .
चार दोन मैल चालल्यावर गाढव पुन्हा थांबले ! मंचकराव पुन्हा गाढवावरून उतरले , पुन्हा त्या भरीव टिकुऱ्याने , पुन्हा चालूलागे पर्यंत गाढवाला रट्टे दिले .
” हि दुसरी वेळ !” आपल्या भरघोस मिश्यावरून पालथी मूठ फिरवत मंचकराव म्हणाले .
पण गाढवते गाढवच ! चार सहा मैलावर पुन्हा त्याने थांबून असहकार पुकारला ! मंचकराव गाढवावरून खाली उतरले . या वेळेस त्यांनी गिरिजेला पण खाली उतरवले . पिशवीतून पिस्तूल काढले आणि गाढवाच्या डोक्यात गोळी घातली ! गाढव जागच्याजागी गतप्राण झाले . गिरीजा मंचकरावांचा प्रताप पाहून हबकली !
” मूर्ख माणसा ! हे काय केलंस ? अरे हे चांगलं दणकट जनावर होत . आपल्याला शेतीत उपयोगी पडलं असत ! अन तू रागाच्या भरात मारून टाकलास ? तू इतका दुष्ट आणि पाषाणहृदयी आहेस हे मला आधीच माहित असते तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसत ! ” असे साधारण दहा मिनिटे चालू होते . मंचकराव शांतपणे तिचा आरडा -ओरडा ती दम खायला थांबे पर्यंत ऐकत होते .
” हि पहिली वेळ ! ” आपल्या भरघोस मिश्यावरून पालथी मूठ फिरवत मंचकराव म्हणाले !
मग , मग ,—-
ते दोघे सुखात नांदले ! नेहमी साठी !
ते जसे नांदले तसे तुम्ही पण नांदा !
प्रथमोध्याय ,END-M !
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय . पुन्हा भेटूच . Bye .