मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, सुरेश विनायक खरे यांचा जन्म २५ जानेवारी १९३८ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील पेशाने शिक्षक. आई नुसती शिक्षित नव्हती तर त्यांचं वाचन अफ़ाट होतं. दोघंही प्रागतिक विचारांची होती. वडील संगीत नाटकांचे षौकी. बाल गंधर्वांची नाटकं त्यांनी कधी चुकवली नाहीत. सुरेश खरेंच्या रंगभूमीच्या आकर्षणाचं कारण कदाचित हेच असू शकेल.
गंमतीची गोष्ट म्हणजे सुरेश खरेंनी नाटकात पहिली भूमिका केली ती वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आणि तीही स्त्री भूमिका, मामा वरेरकरांच्या सत्तेचे गुलाम या नाटकात. शाळेत असतांना त्यांचे शिक्षक श्री मु.अ. जोशी यांनी त्यांचे कलागुण हेरले. ते जोपासले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. महाविद्यालयात शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं ते कमलाकर सारंग यांच्या संपर्कात आले. सारंगांनी नंदकुमार रावते या प्रतिभावान दिग्दर्शकाशी त्यांची ओळख करुन दिली. आयुष्याला वेगळं वळण देणारी ही घटना.
बी.कॉम, बी.ए., एल.एल.बी. या तीन पदव्या पदरात घेऊन शिक्षण पूर्ण करुन खरेंनी एका विमा कंपनीत नोकरी धरली. पण आपला नाटकाचा छंद चालूच ठेवला. ललित कला साधना या हौशी नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. या संस्थेच्या नाटकात त्यांना छोट्या मोठ्या भूमिका मिळत होत्या. त्यात ते खूष होते. कधी ना कधी आपल्याला मोठी भूमिका मिळेल अशी आशा होती. त्यांना नट व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं. पण तसं व्हायचं नव्हतं.
मधल्या काळात बबन प्रभूंनी, ज्यांच्या नाटकात खरेंनी छोटीशी भूमिका केली होती, योगायोगानं खरेंची एक कथा वाचली. ती संपूर्ण कथा संवादांच्या माध्यमातून लिहीली होती. आकाशवाणीवर निर्माते असलेल्या बबन प्रभूंनी ती उचलली आणि आकाशवाणीवरुन श्रुतिका म्हणून प्रसारित केली. त्यानंतर खरे सातत्यानं आकाशवाणीसाठी लिहू लागले. १९६६ साली ललित कला साधनेनं महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत नवीन नाटक घेऊन उतरायचं ठरवलं. परंतु कोणताच प्रस्थापित नाटककार त्यांना नवीन नाटक देईना. अखेरीस नंदकुमार रावतेंनी खरेंनाच नाटक लिहायला सुचवलं. अशा रीतीनं खरेंचं पहिलं नाटक ‘सागर माझा प्राण’ १९६६ मध्ये रंगभूमीवर आलं. त्या पाठोपाठ १९६७ मध्ये ‘स्वर जुळता गीत तुटे’ आणि १९६९ मध्ये ‘काचेचा चंद्र’ रंगभूमीवर आलं. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही ‘काचेचा चंद्र’ हे नाटक आवडलं. त्यानंतर खरेंनी आपलं संपूर्ण लक्ष नाटकावर केंद्रित करायचं ठरवलं. आज त्यांच्या खात्यावर २९ नाटकं जमा आहेत. त्यातली काही नाटकं हिंदी, गुजराती, तामिळ, सिंधी, इंग्लीश या भाषांत रुपांतरित होऊन रंगमंचावर आली.
दिग्दर्शनाचे पहिले धडे खरेंनी नंदकुमार रावते यांच्याकडून घेतले. त्यांनी काही एकांकिका दिग्दर्शित केल्या तसंच व्यावसायिक रंगभूमीसाठीही काही नाटकं दिग्दर्शित केली.
१९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. “जानकी” या चित्रपटाचं ‘चित्रावलोकन’ हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. ‘गजरा’ आणि ‘नाट्यावलोकन’ हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या कार्यक्रमांवर उमटवला.
रंगमंचावरती कलवंतांची ‘लाइव्ह’ मुलाखत घेणं याचं एक वेगळ तंत्र आहे. खरे यांचं कौशल्य यातही दिसून आलं. अभ्यासपूर्ण आणि खोचक प्रश्न आणि मधून मधून नर्मविनोद यामुळे या मुलाखती अतिशय रंजक होत.
आपलं नाटक रंगभूमीवर येण्याआधीच खरेंनी चित्रपट क्षेत्रात लेखक म्हणून प्रवेश केला होता. आकाशवाणीवरील श्रुतिकांमुळे त्यांच्या चटपटीत आणि समर्थ संवादांचा परिचय झालाच होता. ‘धनंजय’ या चित्रपटाचे संवाद खरे यांचे होते. चित्रपट क्षेत्रात ‘करीअर’ त्यांना करायचे नव्हते. काही चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद त्यांच्या नावावर आहेत. परंतु यात त्यांनी फारसा रस घेतला नाही.
१९८१ मध्ये नोकरी सोडल्यावर खरे यांनी व्हिडिओ फिल्मच्या निर्मिती क्षेत्रात उतरायचं ठरवलं. या माध्यमातला अनुभव आणि ज्ञान यांच्या बळावर त्यांनी काही महत्वाच्या लघुपटांची निर्मिती केली. लेखन, दिग्दर्शन संकलन या महत्वाच्या तांत्रिक बाजू स्वतः हाताळून अत्यंत दर्जेदार अशा लघुपटांची निर्मिती त्यांनी केली. दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही क्षेत्रातला प्रत्यक्ष अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांनी या क्षेत्राशी संबंधित अशा विषयांवर कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सूत्रसंचालानाच्या कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद सतत मिळतो.
चाळीस वर्षाचा रंगभूमीवरील अनुभवाचा फ़ायदा इतरांना देण्यासाठी या संबंधात अनेक विषयांवर त्यांची व्याख्यानं होत असतात.
पंचवीस वर्ष लेखनावर सारं लक्ष केंद्रित केल्यानंतर खरे यांच्यातल्या ‘नटानं’ पुन्हा उचल खाल्ली. त्याचा परिणाम म्हणून ‘मिश्किली’ या प्रयोगाची निर्मिती झाली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तिन्ही आघाड्या सांभाळून आणखी तीन कलाकारांना मदतीला घेऊन त्यांनी या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग केले. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. एकट्या अमेरिकेत पंचवीस वेगवेगळ्या शहरांत मिश्किलीचे प्रयोग झाले. असे नवीन कार्यक्रम ते सातत्यानं करीत असतात. संगीत प्रेमी असल्यामुळे नवनवीन संकल्पनांचे अनेक संगीत कार्यक्रम त्यांनी निर्मिती करुन सादर केले.
सुरेश खरे यांनी रंगभूमीसाठी केलेल्या योगदानाची अणि त्यांच्या कर्तृत्वाची सर्व स्तरांवर दखल घेतली गेली. अनेक मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले. सुरेश खरे यांना १९९९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी यांच्या नावाचा गडकरी पुरस्कार मिळाला आहे. सुरेश खरे हे २००५ साली भरलेल्या ८५ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ सुरेश खरे यांची वेब साईट.
काचेचा चंद्र नाटक
https://www.youtube.com/watch?v=k9Ky18ZS88w
Leave a Reply