नवीन लेखन...

असे चालते फिक्सिंग



बेटिंग आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाने संपूर्ण क्रिकेटविश्व ढवळून निघाले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भात रोज नवनवीन माहिती प्रसिध्द होत आहे. अशा परिस्थितीत बेटिग कसे चालते, फिक्सिंग म्हणजे काय याची भरपूर उत्सुकता पहायला मिळत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीबरोबरच एकूणच क्रिकेटविश्वाबद्दल शंकास्पद परिस्थिती निर्माण करणार्‍या बेटिंगविश्वाचा खास वेध.

‘आयपीएलमध्ये मुंबई, हैद्राबाद, चैन्नई, दिल्ली, पंजाब, बंगळुरु, राजस्थान, कोलकाता असे देशाच्या विविध शहरे आणि राज्याचे संघ आहेत. आता पुणे आणि कोची या शहरांच्या संघाचाही त्यात समावेश होत आहे. मग नेमका गुजरातचाच संघ कसा नाही? सगळेच क्रिकेट खेळले तर सट्टा कोण लावणार? असा गुजराथी एसएमएस मध्यंतरी चर्चेत होता. क्रिकेटवर सट्टा लावला जातो ही बाब अगदी सामान्य झाल्याचेच हे निदर्शक आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावण्याची ‘प्रथा’ फार पूर्वीपासून प्रचलित आहे. पण पूर्वी हे सट्टेबाज इनामदारीने व्यवसाय करत. म्हणजे दोन संघांपैकी कमकुवत संघावर पैसे लावले तर ‘परतावा’ अधिक मिळे. (अजूनही मिळतो) आणि बलाढ्य संघावर पैसे लावले तर कमी ‘परतावा’ मिळे. कोणता संघ जिकतो त्यावरुन काहना नफा होई तर काहींचे पैसे बुडत. ग्राहकांनी केलेल्या बेटिगनुसार सट्टेबाजांना (बुकी) नफा किवा तोटा होई. पण, तोटा सहन करायचा तर असा समाजाच्या दृष्टीने बेकायदेशीर असणारा व्यवसाय करायचाच कशाला ?

मग बुकींनी त्यावर उपाय शोधून काढला. आधी लोकांना सट्टा द्यायचा. सट्ट्यानुसार कोणता संघ जिकला तर त्यांना नफा होईल याची आकडेमोड करायची आणि नंतर तो संघ जिंकावा म्हणून पडद्यामागून आर्थिक हालचाली करायच्या आणि त्या संघाला जिंकून आणायचं. ही पध्दत फारच फायदेशीर होती. बुकींचा तोटा होत नाही. हरणार्‍या संघातील (काही) खेळाडूंना अमाप पैसा मिळतो. जिंकणार्‍या संघाला

बक्षीसं मिळतात. एकूण काय तर सगळीकडेच ‘विन-विन’ सिच्युएशन’! म्हणजे बुकींच्या ‘स्वच्छ पारदर्शी’ व्यवसायातही बेईमानी आणि

भ्रष्टाचार आला. तोपर्यंत सर्व यंत्रणा स्वस्थ होत्या. ‘फिक्सिंग’ मात्र त्यांना सहन होणे शक्य नाही. हॅन्सी क्रोनिए, अझरुद्दीन, अजय जडेजा, नयन मोंगिया, मनोज प्रभाकर या खेळाडूंचा या प्रकरणांमध्ये बळी गेला. (बिचारा हॅन्सी तर जिवालाही मुकला) हर्शेल गिब्ज, निकी बोए या खेळाडूंनाही शिक्षा झाली. हे खेळाडू पाकिस्तानचे नव्हते. अन्यथा ते त्वरित उजळ माथ्याने क्रिकेट खेळताना दिसले असते.

बेटिंग आणि मॅच फिक्सिंगचे विश्व सामान्य नागरिकांपासून फार दूर असते. या बदनाम विश्वातही ‘इमानदारी’ने व्यवसाय करणारे बुकी आहेत. (म्हणजे ते फिक्सिंग करत नाहीत केवळ बेटिंगच करतात) काही बुकींच्या मते मॅच फिक्सिंगवर प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द होणार्‍या बातम्या चुकीच्या असतात.देशातला प्रत्येक बुकी मॅच फिक्सिंग करतो हा समज चुकीचा आहे. प्रत्येक बुकी तसा असता तर ‘पंटर्स’नी आपले पैसे बुकींकडे का दिले असते? मॅच फिक्सिंग केले तर सर्वसामान्य लोक आमच्याकडे कसे पैसे लावतील असा त्यांचा रोखठोक सवाल आहे. या (स्वच्छ) बुकींच्या मते दोन वर्षांपूर्वी देशातील बेटिंग व्यवसायात मुंबईमुळे पूर्ण बदल झाला. तिथे दाऊदचे हस्तक हा व्यवसाय सांभाळतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची हिमत कोणीच दाखवत नाही. एका सामन्यानंतर त्यांनी 750कोटी रूपयांचे पेमेंट देण्यास साफ नकार दिला. सौदा रद्द (डील डेड) झाल्याचे सांगून त्यांनी ही रक्कम हडप केली. त्यांच्याशी वाद कोण घालणार? त्यानंतर या बुकींनी मुंबईतील लॉबींशी व्यवसाय न करण्याचा निर्णय घेतला. हे स्वच्छ बुकी म्हणतात, ‘आम्ही अंडरवर्ल्डशी संबंधित नाही. अर्थात आम्ही बेकायदेशीर काम करतो, पण कोणी पैसे दिले नाही तर आम्ही त्यांच्यामागे बंदुका आणि सुरे घेऊन जात नाही. आम्ही केवळ त्यांच्याशी पुन्हा सौदा करणार नाही. पण दाऊदच्या हस्तकांचे पैसे बुडवले की ती व्यक्ती संपलीच म्हणून समजा’

जबलपूरहून 100 किलोमीटर अंतरावर बेटिंग करणारा एक बुकी म्हणतो ‘आम्ही मॅचेस फिक्स करत नाही. मी केवळ 10-12 मुले, दोन लॅपटॉप्स आणि पाच मोबाईल फोन्स यांच्या सहाय्याने हा व्यवसाय चालवतो. पोलिसांना त्यांचा हप्ता देऊन आणि कामावरच्या मुलांचा पगार देऊनही मी दिवसाला दोन ते तीन लाख रूपये कमावतो. त्यामुळे मला मॅच फिक्स करायची गरजच काय?

गेल्या वर्षीचा भारत-श्रीलंका एकदिवसीय सामना आठवतो. या सामन्यात भारताने समोर ठेवलेले साडेतीनशे धावांचे लक्ष्य श्रीलंकेने जवळजवळ गाठले होते. शेवटच्या दोन षटकांमध्ये श्रीलंकेला विजयासाठी केवळ 15 धावा हव्या होत्या. दिलशान चांगला खेळत होता. त्यामुळे श्रीलंका सहज विजय मिळवेल असे सर्वांना वाटत होते. सामना अटीतटीचा बनल्याने त्यात रंगत निर्माण झाली होती. सामन्याच्या सुरूवातीला श्रीलंकेवर एक रूपया दहा पैशांनी सट्टा लावला जात होता. विजय आवाक्यात आल्यावर हा दर केवळ 22 पैशांवर आला. त्यावेळी या बुकीला राजस्थानातील एका मुलाने एसएमएस पाठवला. हा मुलगा केवळ 20 वर्षाचा असून त्या बुकीच्या ऑफिसमध्ये साफसफाईचे काम करत होता. त्याच्या एसएमएसमध्ये ‘श्रीलंका के भाव काट दो। बेटिंग मत लेना। घरका मुर्गा जितेगा।’ असे लिहिले होते. खरोखरच हातातून निसटलेला सामना भारताने एक चेंडू राखून जिंकला. त्यासाठी राजस्थानमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने 28 कोटी रूपये (7.5 मिलियन डॉलर्स) मोजले होते म्हणे.

सट्टेबाजीच्या या व्यवसायात नेटवर्क, आर्ट ऑफ फिक्सिंग आणि खेळाडू-बुकी संबंध हे तीन महत्त्वाचे पैलू असतात. त्यातील प्रत्येकाचा नेमका अर्थ पाहू या.

नेटवर्क : यात देशातील या व्यवसायातील सर्वांच्या नावाची यादी असते. या यादीला ‘द ग्रेट इंडिया बुक’ असे म्हणतात. सर्व बुकी एकमेकांना ओळखत असतात. पण ते एकत्र

काम करत नाहीत. ते एकमेकांशी संपर्कही ठेवत नाहीत. भारतात जयपूर, हैद्राबाद, नागपूर, दिल्ली आणि मुंबई या पाच मोठ्या केंद्रांद्वारे ‘लाईन्स’ चालवल्या जातात.

जयपूरमधील दोन भाऊ सर्वात मोठी ‘लाईन’ चालवतात. त्यानंतर हैद्राबाद येथील बुकीचा क्रमांक लागतो. नागपूर केंद्रातून संपूर्ण मध्य भारतावर नियंत्रण ठेवले जाते. दिल्लीतील बुकी खूप जुना आणि अनुभवी आहे तर मुंबईतील व्यवसाय दाऊदचे हस्तक पाहतात. या व्यवसायात केवळ सीडीएमए तंत्रज्ञानावर चालणारे मोबाईल फोन्सच वापरले जातात. सर्व बुकीज डेटाबेस जपण्यासाठी ‘जावा’ प्लॅटफॉर्मवर चालणारे सॉफ्टवेअर्स वापरतात. व्यवहारातील साक्षी-पुरावे जपण्यासाठी आवाज रॅर्कार्ड केला जातो आणि संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत गुप्तता राखली जाते.

‘आर्ट’ ऑफ फिक्सिंग : सामान्य बुकीजनंतरच्या श्रेणीत सामने फिक्स करणारे असतात. या व्यवसायात बरेच वाईट लोक आहेत. खेळाडूंशी संपर्क साधण्यात व्यवसाय गमवण्याचा धोका असतो. पण काही लोक हा धोका पत्करतात. हा धोका पत्करल्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू शकतो. खेळाच्या फॅन्सी, सेशन आणि कलर या तीन विभागांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी खेळाडूंशी संपर्क साधला जातो. फॅन्सी म्हणजे प्रत्येक चेंडूवर बेटिंग करणे. अमूक एका चेंडूवर चौकार मारला जाईल की षटकार हे सांगण्यासाठी हे बेटिंग चालते. अशा वेळी स्पॉट फिक्सिंगची संधी असते.

खेळाडू-बुकी संबंध : आमीर आणि आसिफ यांनी इंग्लंडविरुध्द टाकलेला नो बॉल म्हणजे फिक्सिंग नव्हते. यात बुकी त्याच्यासमोर बसलेल्यांना आपण खेळाडूंची कामगिरी कशी नियंत्रित करू शकतो हे पटवून देत होता. पण यात संबंधित खेळाडू आणि बुकी यांचे घनिष्ट संबंध दिसून येतात. हे बुकी खेळाडूंद्वारे खेळातल्या बारीकसारीक घटनांवरही नियंत्रण ठेवू शकतात. बुकींच्या मते भारतीय खेळाडू बुकींपासून दूर राहणेच पसंत करतात. पाकिस्तानपेक्षाही श्रीलंकेचे खेळाडू अधिक हापापलेले आहेत, असे बुकींचे मत आहे.

बुकींचे मत काहीही असले, सरकारने बेटिंगवर कितीही निर्बंध घातले तरी ते सुरूच राहणार. कारण ते व्यसन आहे. एखादा खेळाडू बुकींच्या जाळयात अडकला की कायम त्यांच्या संपर्कात राहतो. कारण एकदा चोरी केली की तो कायमचाच चोर बनतो. या व्यवसायात बुकी कधीच तोट्यात जात नाही. केवळ पंटर्सनाच कधी कधी तोटा सहन करावा लागतो.

(अद्वैत फीचर्स)

— मनोज मनोहर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..