नवीन लेखन...

सुरक्षित, प्रागतिक चैतन्योत्सवासाठी



गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर त्यासाठी इच्छाशक्तीची, सद्सद्विवेकबुद्धीची गरज असते. गणेशोत्सव मंडळांनी समाजाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन उत्सव विधायक पद्धतीने साजरा करायला हवा. उत्सवाच्या निमित्ताने गणेशासमोर नतमस्तक होऊन केवळ प्रार्थना करून चालणार नाही तर प्रयत्न,

निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या साहाय्याने ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे.

पाहता पाहता गणेशोत्सव उजाडला. लोकांमध्ये स्वातंत्र्याप्रती अस्मिता जागृत करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राने ही परंपरा अखंड सुरू ठेवली. मात्र, जागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उत्सवाचे स्वरुप काळाच्या ओघात पूर्णपणे बदलले. लोकांना हा उत्सव गणेशाचा वाटण्यापेक्षा स्वत:च्या मजेसाठी असल्यासारखे वाटते. मोठमोठ्या मूर्त्या, भव्य-दिव्य देखावे, डोळे दिपवणारी रोषणाई म्हणजेच गणेशोत्सव असे जणू समीकरणच तयार झाले आहे. समाजाचा दृष्टीकोन बदलल्याचे आणि असुरक्षितता वाढल्याचे चित्र गणेशोत्सवातून स्पष्टपणे पहायला मिळते. लोकमान्य टिळक आपली परंपरा पाहण्याच्या इच्छेने पृथ्वीवर अवतरले तर उत्सवाचे सध्याचे स्वरूप पाहून त्यांना काय वाटेल याची कल्पना न करणेच चांगले.

गणेशोत्सव हा सर्व लोकांचा, समाजाचा उत्सव असतो. गणपतीचे आगमन झाल्यानंतर दहा दिवस वातावरणात प्रसन्नता आणि उत्साह दिसून येतो. ही प्रसन्नता टिकवून ठेवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनीच पुढाकार घेतला पाहिजे. ज्या भागात सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते तिथला परिसर स्वच्छ ठेवला तर उत्सव साजरा केल्याचे मनोमन समाधान लाभते. त्यामुळे माझ्या गणेशासमोर अस्वच्छता, कचरा, घाण नसेल असे प्रत्येक कार्यकर्त्याने मनाशी ठरवायला हवे. गणपतीच्या पुढे पत्ते, मद्यपान, मांसाहार अशा गोष्टी घडणार नाहीत याचीही काळजी घेणे आवश्यक असते. गणेशोत्सव सामान्यांसाठी सुसह्य व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गणेशोत्सव मंडळांना उत्सवाबाबत, ध्वनी यंत्रणेबाबत काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. या नियमांकडे कानाडोळा न करता मंडळांनी कायद्याचे पालन करायला हवे. हे कायदे सामान्यांच्या हितासाठी

केलेले असतात आणि सामान्यांच्या हितातच मंडळांचे हीत लपलेले असते. त्यामुळे रुग्णांना आणि वृद्धांना त्रास होऊ नये याची काळजी घेऊन मंडळांनी उत्सवाचा आनंद घ्यायला हवा.


गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांतर्फे भरपूर वर्गणी गोळा केली जाते. या पैशांचा विनियोग समाजोपयोगी कामासाठी व्हावा अशी सामान्यांची अपेक्षा असते. त्यामुळे मंडळांनी जमलेल्या पैशांचा काही भाग सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पैशांमधून गरिबांच्या शिक्षणाची सोय करता आली तर त्यातून खरे पुण्य लाभेल. या पैशातून गरीब मुलांना अत्यंत कमी दरात किवा मोफत संगणकाचे प्रशिक्षण देता येऊ शकते. भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील बरीचशी जनता आजही अशिक्षित आहे. शहरी भागातील गरीब विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या शिक्षणाची सोय करता आली तर आपल्या पदरात पुण्य पडू शकते आणि इतरांना मदत केल्याचे समाधान मिळू शकते. प्रत्येकाने समाजाशी असलेली बांधिलकी जपण्याचागणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रयत्न केला पाहिजे. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना सतत जपायला हवी.

आजचा समाज असुरक्षिततेच्या गर्तेत सापडला आहे. प्रत्येक माणूस चंगळवादी आणि स्वार्थी झाला आहे. विविध प्रकारे घडणारे गुन्हे पाहिल्यावर लोकांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही याची वारंवार प्रचिती येते. समाजाचे बेशिस्त वर्तनही वेगवेगळ्या घटनांमधून पुढे येत असते. या सर्व गोष्टी पाहिल्या की सांस्कृतिक वैभव संपत चालल्याची जाणीव होते. या सर्व प्रकि’येला कुठे तरी थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याथृष्टीने यंदाच्या गणेशोत्सवापासूनच नवीन संकल्प करता येतील. गणेशोत्सव श्रद्धेने, निष्ठेने साजरा केला जाईल याबाबत प्रत्येकाने ठाम भूमिका घेतली पाहिजे. गणपती आरास स्पर्धा, भव्यदिव्य देखावे यामुळे पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांना आवडणारा हा उत्सव सश्रद्धरितीने साजरा करून बंधूभाव निर्माण करता आला तर चांगल्या कामाला आपल्यापासून सुरूवात झाल्याचे समाधान मिळू शकते.

गोवा, ब्राझील, स्पेन अशा ठिकाणी वेगवेगळे उत्सव थाटामाटात आणि धूमधडाक्यात साजरे केले जातात. पण त्यामध्येही शिस्तबद्धता पाहायला मिळते. उत्सव साजरा करताना वातावरणातील मांगल्य आणि पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच तेथील उत्सव पाहण्यासाठी लोक आवर्जून जातात. तीच बाब आपल्याकडेही आवश्यक आहे. गणेशाचे पूजन करताना पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. गणेशासमोर नतमस्तक होऊन गरुडासारखं सामर्थ्य आणि इंद्रासारखं वैभव मिळवण्यासाठी प्रार्थना करता येईल. सर्व अवयव शाबूत राहून गणपतीची पूजा करता यावी असा अर्थ अथर्वशीर्षातून प्रकट होतो. पण अथर्वशीर्षामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण वागत नाही. आपण सर्वजण समाजाचे वेगवेगळे अवयव आहोत. आपलेच डोके शाबूत नसेल तर समाजरूपी शरीर कसे निरोगी राहणार याचा

विचार करायला हवा. अथर्वशीर्षामध्ये ‘त्वमेव केवलम् कर्तासि’ असे म्हटले आहे. मला उत्तम शिष्य कर, व्याधी आणि संकटातून सोडव, उन्नतीकडे आणि समृद्धीकडे घेऊन चल अशी प्रार्थना त्यातून

केली जाते. आज केवळ व्यक्तीनेच नव्हे तर समाजाने उन्नतीच्या मार्गाने जाण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात सुधारणा घडवून आणायच्या असतील तर त्याची सुरुवात व्यक्तीपासून होत असते. महात्मा फुलेंची स्त्रीक्रांती, आगरकरांची समाजक्रांती ही अशाच सुधारणांची उदाहरणे आहेत. त्यामुळे गणपतीकडे केवळ हात जोडून प्रार्थना न करता थोरांचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत.

गणेशोत्सव मंडळांनी निधीचा योग्य विनियोग करण्याची गरज असते. त्यांनी या पैशांचा पारदर्शक व्यवहार करायला हवा. कारण तो समाजाचा पैसा असतो. पैसे सत्कारणी लागावेत यादृष्टीने समाज मदत करतो आणि वर्गणी देतो. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी मंडळांची असते. मंडळांच्या प्रयत्नांनी सामाजिक कामात प्रामाणिकपणा येऊ शकतो. गणपती केवळ विद्येचीच नव्हे तर कार्याचीही देवता आहे. गणपती नेहमी कामाला हातभार लावतो. हे दैवत आशीर्वाद देण्यासाठी सतत आतूर असते पण प्रयत्न केल्याशिवाय आशीर्वाद मिळू शकत नाहीत. भगवद्गीतेमध्ये ‘अधिस्थानम्… दैवम चैवात्र पंचमम्’ असे सुंदर वाक्य आहे. प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्ती असेल तर ध्येयप्राप्ती होतेच असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे गणेशाचा वरदहस्त मिळवायचा असेल तर प्रत्येकाने ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे असे माझे मत आहे.

(अद्वैत फीचर्स)

— अरविंद इनामदार, (माजी पोलीस महासंचालक)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..