नवीन लेखन...

जंगलचा राजा !

एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.

जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.

अस्वलाला वाटलं…

‘आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.’

अस्वलानं ठरवलं… आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं.

तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.

सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.

पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं.

अस्वलाला वाटलं…

खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे. माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!

पण…

मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही!मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!

बस्स!! आता ठरलं तर… आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं.

त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं.आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.

‘मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..ठअसं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.

पण…

तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या

पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे.शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.

अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.

अस्वलाने ठरवलं…

‘आजच काय तो फैसला करू. जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!!

अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं.

सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं.

सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.

अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.

आता…

‘हा कोण नवीन रुबाबदार राजा?’ असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा… आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.

पण….

सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही!त्याला काही किंमतच दिली नाही.सिंह आपल्याच मस्तीत होता.सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता.

आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं.

त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली.

अस्वलाने ठरवलं…आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच.

राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे.पण आपण आता..मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं.

अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं.राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!

– राजीव तांबे.

Email rajivcopper@yahoo.co.in

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..