भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन.
१८ दिशा विचार
मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत.
पण पाश्चात्य पद्धतीच्या कमोडमधे मात्र अशी उताराची व्यवस्था नसते. त्यामुळे मलाचे पाणी पुनः अंगावर उडते, हा मोठा दोष आहे, असे मला वाटते. “ये टाॅयलेट के अंदर की बात है” असे समजून सोडून देऊन चालणार नाही, जिथे शुद्धतेचा, शुचितेचा, स्वच्छतेचा विचार करायचा असतो, तिथे या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ?
कमरेची परिधान केलेली वस्त्रे नीट गुंडाळून, शाल, उपरणे आदि उपवस्त्रे डोक्याला गुंडाळून, गळ्यातील जानवे खांद्यावर टाकून अथवा कानाला गुंडाळून, ( जेणेकरून या वस्त्रांचा, जानव्याचा स्पर्श मलाला होणार नाही. ) नाकावरून वस्त्र घेऊन, ( म्हणजे नाकावाटे होणारा जंतुसंसर्ग टाळला जावा.) दिवसा आणि संधीकाली उत्तराभिमुख होऊन,तर रात्रौ दक्षिणाभिमुख होऊन (वाऱ्याची बदलती दिशा लक्षात घेऊन हे सांगितले असावे. ) मलोत्सर्ग करावा.
पायात चप्पल न घालता भल विसर्जन करावे, असाही उल्लेख दिसतो, तो नेहेमीच्या वापरातील चप्पल मलविसर्जनावेळी वापरू नये, असा आहे.
बाथरूममधील चप्पल चामड्याची नसावी. सहजपणे धुता यावी. सहजपणे वाळली जावी अशी उभी करून ठेवावी. ही चप्पल अन्य कोणत्याही कामासाठी वापरली जाऊ नये.
आजच्या काळाचा विचार करता जेवढे शक्य आहे, तेवढे पाळण्याचा प्रयत्न करावा.
रस्ता, नदी, जलाशय, देवालय अथवा पवित्र जागेकडे संमुख होऊन, उभे राहून मल मूत्र विसर्जन कधीही करू नये.
परकी ठिकाणी गेल्यास जलाशयापासून किमान बारा ते सोळा हात अंतर सोडून मलमूत्र विसर्जन करावे, असे आदेश ग्रंथात वर्णन केलेले आढळतात.
एवढे विस्तृत लिहिण्यामागचं कारणं काय ? तर सार्वजनिक आणि वैयक्तिक आरोग्य सांभाळण्यासाठी ही योजना केलेली होती, हे लक्षात यावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply