नुकतीच देशात काही पुतळे उखडायची किंवा पुतळ्यांची नासधूस करायच्या काही लहान-मोठ्या घटना घडून गेल्या. जगभरात कधी ना कधी हे होतंच असतं. आता हे चुक की बरोबर, यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही आणि माझी ती पात्रताही नाही आणि या लेखाचा तो विषयही नाही. मला आपला आणि पुतळ्यांचा संबंध नेमका काय आहे, हे या लेखातून दाखवायचं आहे.
नुकत्याच घडलेल्या पुतळे प्रकरणांवरून मला सन १९४७ साली आपल्याला ब्रिटींशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काही घटना वाचलेल्या आठवल्या. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काही काळात तीव्र देशप्रेमाने भारलेल्या त्यावेळच्या देशभक्तांनी, जागोजागी बसवलेले इंग्रजांच पुतळे उखडून गोदामात हलवल्याची घटना आठवली. शिल्पकृतींचे उत्तम नमुने म्हणावेत असे पुतळे, प्रसंगी त्यांची विटंबना करून, लोकांच्या नजरेसमोरून नाहीसे केले गेले. ताज्या ताज्या मिळालेल्या स्वातंत्त्र्याच्या कैफातून त्या काळात व्यक्त झालेली लोकभावना समजण्यासारखी होती. आता त्याची चिकित्सा करण्यात काहीच हशील नाही. कारण ह्या गोष्टी परिस्थितीसापेक्ष असतात..
पण तरीही एक सत्य पुन्हा सिद्ध होते, ते म्हणजे कोणत्याही काळच्या भावना लोकभावना शहाण्या नसतात. ब्रिटीशांचे पुतळे उखडताना त्यावेळच्या लोकांनी, ‘आम्हाला गुलामगिरीत ठेवणाऱ्या ब्रिटीशांचे पुतळे आमच्या नजरेसमोर नकोत’ अशी ठाम भुमिका घेऊन पुतळे उखडण्याच्या आपल्या कार्याचं समर्थन केलं होतं. पुतळे हटवणं सोयीचं होतं आणि लोकभावनांना हात घालणारं होतं. पण असं करताना ज्या व्हिक्टोरीया राणीचा पुतळा व्हि.टी.(आता सीएसटीएम) स्थानकावरून हलवला गेला, त्या देखण्या दगडी इमारतीचं काय करायचं किंवा ज्या डलहौसीचा पुतळा हलवला गेला, त्या डलहौसीने मुंबईत देशातली पहिली रेल्वे सुरू केली त्या रेल्वेचं काय करायचं, ब्रिटीशांनी सुरु केलेल्या टपाल-तार खात्याचं काय करायचं, असे अनेक प्रश्न सोयिस्करपणे आपल्याला पडले नाहीत. का सीएसटीएम स्थानक, रेल्वे, टपाल या ब्रिटीशांच्या, म्हणून गुलामगिरीच्या निशाण्या नाहीत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आज ज्या भाषेशिवाय आपलं पान हलत नाही, जी भाषा आज अघोषित राजभाषा आहे, त्या इंग्रजी भाषेचं काय करायचं, हा प्रश्न आपल्याला पडला नाही. का, तर आपल्या ‘सोयीसाठी’ असंच उत्तर मिळतं.
पुतळे उखडून टाकणं त्यामानाने सोपं आणि सोयीचं असतं आणि सुखावणारंही असतं. पुतळे हटवले तरी त्यांचा वारसा कसा हटवणार, हा प्रश्न तेव्हा कोणालाच पडला नव्हता, आताही पडला नसावा..कटू असला, तरी तो आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, असतो, हे ही कुणाच्या लक्षात आलं नव्हतं..इतिहास विपर्यस्त करता येतो पण पुसता येत नाही, हे विसरून कसं चालेल?
आता सध्याच्या काळात आपले नि पुतळ्यांचे संबंध कसे आहेत, या विषयी. आपण महापुरुषांचे किंवा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचे पुतळे उभारण्याची कल्पना बहुतेक युरेपियनांकडनं घेतली असावी असं मला वाटत. पण युरोपियनांची पुतळे उभारण्यामागचा हेतू आणि आपला हेतू यात फरक असावा, असं मला आताशा वाटू लागलंय.
पुढे जाण्यापूर्वी आपल्याला मी एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो. तो किस्सा खरा, की खोटा, की रचलेला, याची मला कल्पना नाही, परंतू तो आपल्या समाजाच्या सध्याच्या विचारसरणीला तंतोतंत जुळणारा आहे हे मात्र नक्की. दादरचं शिवाजी पार्क सर्वांना माहित आहे. शिवाजी पार्कच्या सभोवताली राहाणाऱ्या लोकांना काही वर्षांपूर्वी एक प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर चटकन द्यायचं होतं. प्रश्न होता, शिवाजी पार्कात असणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या हाताची रचना कशी आहे, हा. म्हणजे पूर्व दिशेला बोट दाखवणारा नुसता हात आहे, की त्या हातात तलवार आहे. या प्रश्नाचं म्हणे ९० टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलं, तर उरलेल्या १० टक्क्यांना नक्की आठवत नव्हतं..!
हा किस्सा खरा असो वा खोटा, पण हे आजचं आपल्या देशातल्या सगळ्याच ठिकाणचं वास्तव आहे. पुतळा उभारायचा, तो लोकांना त्याचं नित्य दर्शन व्हावं, पाहाणाराला त्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या दर्शनातून त्याच्यासारखं समाजाच्या भल्यातं एखादं कार्य करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून. पुतळे उभारण्याचं प्रयोजनच मुळी ते असतं. परंतू आपण भारतीय भावना प्रधान लोक. एखाद्याचा पुतळा उभारणे हा आपल्या खऱ्या-खोट्या भावनांचा प्रश्न असतो. एकदा का एखाद्याचा पुतळा उभारला आणि आपल्या भावनांची पूर्ती झाली, की मग महापुरुषाच्या त्या पुतळ्यांकडे, त्याची जयंती-पुण्यतिथी वगळता, एरवी कुणी पाहात नाही. नाही म्हणायला कावळे-कबुतरं त्या पुतळ्याकडे नित्य नेमाने येतात. नाहीतर एखाद्याला किंवा एखादीला भेटण्यासाठीची ‘खुण’ म्हणून, ‘वहीं, जहां कोई आता जाता नही..’ अशा ठिकाणी त्या पुतळ्याचा उपयोग होतो..अर्थात, तेवढ्यासाठी का होईना, पण लोकांना त्या पुतळ्याची आठवण होते, हे ही काही कमी नव्हे..आपला हेतू फक्त ‘पुतळा उभारणे’, तो ही सोयीसाठी नि सोयीनुसार येवढाच असतो, असं म्हणायला जागा आहे.
ज्याचा पुतळा उभारलाय, त्या महापुरुषांची शिकवण लक्षात ठेवून त्यानुसार वागणं सर्वांनाच अडचणींचं असतं, त्या मानाने त्यांचा पुतळा उभारून उदो उदो करणं जास्त सोसीचं असतं. अचेतन पुतळ्याला भावना नसतात, डोळे दिसतात पण त्या डोळ्यांना दिसत नसतं आणि दगडी कानांना ऐकूही येत नसतं, त्यामुळे त्या पुतळ्याच्या अंगभूत दगडी मुक-बधीरपणाचा आपल्याला सोयीचा अर्थ काढता येतो. जे काही चाललंय, ते त्या महापुरुषाच्या संमतीनेच, असा देखावाही उभा करता येतो.
हल्ली हल्ली आपल्याला महापुरुषांचे पुतळे त्यांच्या मागे लपण्यासाठी लागतात. इथे मग वेगवेगळ्या महापुरूषांच्या पुतळ्यांचं वर्गीकरण होतं. कोणाला लपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात, तर कुणाला संभाजी महाराज, कुणाला फुले, टिळक, आंबेडकरांचे पुतळे लागतात, तर आणखी कुणाला शाहू महाराजांचा पुतळा लागतो. आपापल्या सोयी-गरजेनुसार त्या त्या महापुरूषांच्या पुतळ्याचा आडोसा एकदा का घेतला, की मग त्या पुतळ्याच्या आडोश्याने काही बर कमी-वाईट जास्त केलं तरी चालतं. मग काय बिशाद आहे कोणाची कोणावर बोट रोखायची? आणि कुणी रोखलंच बोट, तर मग ते बोट पुतळ्याच्या आड लपलेल्या त्या ‘कर्मयो(भो)ग्या’वर नसून, तो ज्या पुतळ्याच्या मागे लपलाय, त्या ‘कर्मयोगी’ महापुरुषावर रोखलेलं आहे, असं समजून ते बोट मुळापासून उखडून टाकलं जाईल हे याद राखा..आपल्या इथे पुतळे उभारण्यामागे हा ही हेतू असतो अलीकडे..
आपल्याकडे पुतळे यायच्या पूर्वी प्रतिमांची चलती होती. ब्रिटीशांकडून आपण पुतळ्यांची कल्पना घेतली. पुतळ्यांची उपयुक्तता लक्षात आल्यावर जोमाने पुतळे उभारले जाऊ लागले आणि मग त्याच वेगाने ज्या महापुरुषाचा तो पुतळा आहे, त्याचे विचार लयाला जाऊ लागले. आता तर प्रत्येक युगपुरुषाच्या तथाकथीत अनुयायांची स्वत:चीच प्रतिमा येवढी मोठी होऊ लागलीय, की पुतळ्याची सहा-सात फुटाची उंची त्यांना लपण्यासाठी कमी वाटू लागलीय आणि पुतळ्यांची उंची त्या प्रमाणात वाढू लागलीय. पुन्हा त्याच प्रमाणात त्या महापुरुषाचे विचार जमिनीत पाताळाच्या दिशेने निघालेत..मुंबईसारख्या जमिनिंच्या किंमती भलत्याच वाढल्यामुळे, अनुयायांना आता त्यांच्या श्रद्धास्थानांच्या पुतळ्यांना जमिन देणं परवडत नाही (त्याजागी एखादा टाॅवर किंवा एसी बॅक्वे हाॅल बांधता येतो) आणि आणि म्हणून पुतळ्यांना आता समुद्राच्या दिशेने ढकललं जातंय..
सर्व समाजाला आयुष्यभर उन्नतीच्या मार्गाने नेऊ पाहाणाऱ्या महापुरुषांचे पुतळे, अलीकडे मात्र सामाजिक असंतोषाला आणि फुटीला कारणीभूत होऊ लागलेत..महापुरुषांच्या पुतळ्यांची उंची आभाळाला भिडू पाहातेय आणि त्या महापुरषांचे विचार मात्र त्याच्याच पुतळ्याच्या साक्षीने राजरोस पायदळी तुडवले जाऊ लागलेत..
तोंड-कान-डोळे दगडी असलेले पुतळे मात्र दगडाच्याच निश्चलतेने, येणाऱ्या पुढच्या एखाद्या जयंतीच्या मिरवणुकीत किंवा विटंबनेच्या वादात आपली गरज कधी लागणार, याची घाबरून वाट पाहात बसले आहेत.
— ©️ नितीन साळुंखे
9321811091
विचार करण्यास भाग पाडणारा लेख आहे. आवडला.