MENU
नवीन लेखन...

आत्म्यास शांती लाभो

वांझ आसवांच्या श्रद्धांजली आत्म्याच्या शांतीसाठी..
वाहण्याची चढाओढ पाहताना अंगावरला एक एक कपडा उतरला जातो.
रोज रोज मरणयातना भोगणारी माणसे ..
मरण येत नाही म्हणून जगत असतात.
आणि त्यांच्या उजाड आयुष्याच्या कॅनव्हास वर
आपल्या आयुष्याची मानपत्रे लिहून घेणारी
बेगडी जात आपली शेज सजवीत असते..
आपल्या आयुष्याचा ऱ्हस्व_दीर्घ विसरलेल्या माणसांच्या
पिढ्यान_पिढ्या जिवंत ठेवण्याचा कुटील डाव
खेळण्यात धूर्त कावेबाज प्रेषित कायमच सफल ठरत आलेत.
जेव्हा जेव्हा माणसे एकमेकाशी माणसासारखी वागतील याची
पुसटशी शंका आली की ..
हे प्रेषित आपापल्या रंगांच्या पेटंटवर मालकीहक्काचा
दावा करून गरळ ओकून जातात..नि तो झेलून
स्वत:च्या खांदयावर यांचे मुखवटे मिरवीत
नंतर कितीक बापुडे सती जातात याची गणती नाही…
यांचे रंग जरी वरून वेगळे दिसत असले तरी
त्यांची DNA चाचणी एकाच श्वापदाच्या पिलावळीची साक्ष देते..
या सगळ्याच मार्तंडाच्या हाताना लाल रक्ताची चटक लागलेली असते..
त्यांना जेव्हा कोणी कधी काळी हटकले ..
तर गलका एवढाच कि समोरच्यापेक्षा
माझी दोन बोटे कमी रंगलीत..
या अल्याडल्या नि पल्याडल्या दोघांनीही
त्यांनी आखून दिलेल्या लक्ष्मणरेषा त्यांच्यासाठी अपवाद
आहेत असे फतवे काढून आधीच सामान्य माणसांना
नि:शस्त्र केलेले असते…
आणि मग कमरेखाली वार करताना
त्याला धर्माचा कोण टिळा लावून ..तर कोण फतवा काढून
पावित्य्र बहाल करीत जातो..
व्यभिचार ज्यांचा श्वास आहे
त्यांनीच स्वत:ला कुणाच्या पावनतेच दाखला देण्यास
अधिकृत केल्यावर ..
इथे बलात्काराच्या राती नोंदीविना दफन होणे अनिर्वार्य…
इथल्या देवादिकांचे पावित्र्य
कुणा मर्त्य माणसांच्या एखाद्या अतिरेकी कृतीतून बाटले जाते ..
अशी हाकाटी देणाऱ्या तथाकथित रखवालदारांचा
हा पोरकटपणा नसून त्यामागे दूरगामी वाताहत
होण्यासाठीचा कुटील डाव असतो..
यातच त्यांच्या अस्तित्वाला बळकटी देणारी बीजे दडलेली असतात..
जिथे एकाच धर्माची वस्ती आहे त्या गावात रामराज्य
आहे असाही काही गाव नव्हता आणि असणार नाही..
मग या धर्माच्या नावावर माणसांना एक होण्याची
तरफदारी फिजूल आहे हे कुणाला का कळत नाही..
ते फतवे..ते नारे..ते जय हो
याना नकार देण्याचा पर्याय कोणीच का स्वीकारीत नाही…
इतिहासाच्या पानावर आपली imprint उतरावी म्हणून ..
माणसे स्वत:चं माणूसपण पणाला लावतात .
हा माणसांचा उन्माद ..
माणसाची माणूस म्हणून ओळख पुसून टाकणारा आहे..
हजारो वर्षाच्या संस्कृतीचा (?) वारसा मिरविताना ..
लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना संमोहित करून
कधी बळी देऊन ..तर कधी आत्मघात करावयास प्रवृत्त
करून कुरुक्षेत्रावर मुडद्यांची रास रचली जाते ..
आज वर्तमान सगळ्या बांधवाना मुलभूत गरजा पुरवत नाही..
याबद्दल खरंतर सगळ्या धर्माच्या ..जातीच्या
ठेकेदारांना लाज वाटावयास हवी..
पण तसे न होता ..
त्यांच्या सोयीनुसार निती_अनीतीच्या व्याख्या बदलल्या जातात..
भूतकाळाला कवटाळून बसण्याची सक्ती करून
वर्तमान उपभोगू देत नाहीत..भविष्याला हाकही मारू देत नाहीत..
इथे जो तो दुसऱ्याला देशप्रेमाची ओळख पटवायला सांगत आहे..
जणू आपल्या नावावर या देशाचा सातबारा
निघाल्यासारखा …
यांना “ देश ” आणि “ प्रेम ” या दोन्हीच्या व्याख्या नि
त्यात दडलेला भावार्थ याचा ठावठिकाणा माहित नाही…
देश म्हणजे नुसत्या अक्षांश आणि रेखांश यामधला
जमिनीचा तुकडा नसून ..
त्यात राहणाऱ्या आपल्यासारख्या
हाडामांसाच्या माणसाच्या काळीजांचा थवा असतो ..
हे यांना कुणीतरी सांगायला हवं ..
अन्यथा देशप्रेमाचे धिंडोरे पेटविणारे
तथाकथित देशप्रेमींचे हात..
आपल्याच देशवासीयांचे ..गळे कापताना..
त्यांच्याकडून लाच घेताना ..त्यांना देताना ..
त्यांच्या आब्रू लुटताना..
त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेताना..सावकारी करताना ..
नक्कीच कापले असते..
स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षांनी..
आपण नागरिकांच्या मुलभूत गरजा भागवू शकलो नाही..
अन्न..पाणी..निवारा..आरोग्य..
हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज चालूच आहेत..
इतक्या ठार आंधळ्या..बहिऱ्या..आणि असंवेदनशील
माणसांचा हा देश आपण कुठल्या तोंडाने
जागतिक महासत्ता बनवू पाहत आहोत ..
आणि ती महासत्ता बनण्याचे आपण काय निकष ठरविलेत..
काय मापदंड आखलेत..
भाबड्या माणसांच्या डोळ्यातील आश्रू पुसायचे सोडून ..
त्यांना कुठल्या ना कुठल्या अफूचा डोस पाजून
सावध होऊ द्यायचे नाही..
त्याच्या वर्तमानावर काहीही उत्तर नसल्याने ..
किंबहुना जाणूनबुजून न काढून आपल्या खुर्च्या उबवित राहणे
हीच या सगळ्या रंगांच्या लोकसेवकांची देशप्रेमाची व्याख्या आहे..
आणि सगळा दोष त्यांचा मुळीच नाही..
We get the Rulers we deserve..
या अगाध विश्वाच्या लाखो वर्षापासून असणाऱ्या अस्तित्वाला ..
आपल्या तुटपुंज्या आयुष्याच्या कालखंडात
झाकळून टाकण्याची राक्षशी महत्वाकांक्षा नि
त्यासाठीची अघोरी वाटचाल रोखण्यासाठी आपला प्यादे म्हणून होणारा वापर
आपण स्वत:च रोखला पाहिजे..
त्यासाठी आणखी कुणा प्रेषिताची वाट पाहणे ही आत्महत्या ठरेल..

— रजनीकान्त

Avatar
About रजनीकान्त महादेव शेंबडे 11 Articles
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..