पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील विजेता महिला बचत गटाने नावाप्रमाणे विजयी घोडदौड सुरु केली आहे. लेडीज पर्स व प्रवासी बॅगा बनविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे. यातून सुमारे तीन लाखांची वार्षिक उलाढाल होत आहे. विविध रंग व डिझाइनमध्ये तयार केलेल्या पर्सना या महिलांची पसंती अधिक आहे. दहा हजार रुपये भागभांडवलावर सुरु झालेल्या या व्यवसायातून वार्षिक तीन लाख रुपये आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे. हक्काचा रोजगार मिळत असल्याने महिलांचा आत्मविश्वासही वाढला आहे. या व्यवसायाचा लवकरच विस्तार करण्याचा निर्णय बचत गटातील महिलांनी घेतला आहे.
आंबेगाव तालुक्यात या वस्तूंचे उत्पादन नसल्यामुळे दुकानदारांना व ग्राहकांना खरेदीसाठी पुण्याला जावे लागत होते. लेडीज पर्स व प्रवासी बॅगांना असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन हा उद्योग सुरु करण्याचा निर्णय महिलांनी घेतला. बचत गटाच्या सौ. वंदना संजय शेवाळे व सौ. वनिता भाउसाहेब भेके यांनी पुण्यात याचे प्रशिक्षण घेतले. कच्चा माल, उत्पादन व विक्री व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यानंतर दोन वर्षापूर्वी व्यवसाय सुरु केला. त्यासाठी दोन शिवणयंत्रे, लेदर, कापड, चेन, रेक्झीन, बेल्ट, शो पीस, कुंदन, टिकल्या, मोती, पॅच आदी कच्चा माल मुंबईहून खरेदी केला. सुरवातीला उत्पादनाला विलंब लागत होता. आता सराव झाल्यामुळे रोज दहा ते बारा वस्तू तयार केल्या जातात.
सौ. शेवाळे म्हणाल्या, लेदर फॅन्सी टिफीन, बेबी, साडी किट, ज्वेलरी पाउच आदी वस्तू, लहान बाळांसाठी झुले, प्रवाशांसाठी लागणार्या विविध प्रकारच्या बॅगा येथे तयार केल्या जातात. पर्सचा बाजारभाव १०० ते २५० रुपये व बॅगांचा १५० ते ३०० रुपये आहे. नक्षीकाम असलेल्या पर्सला मागणी अधिक आहे. अत्यंत सुबक व आकर्षक वस्तू तयार केल्या जातात.
कलाकुसरीने सजलेल्या पर्स कोणाचेही लक्ष वेधून घेतात. पाच महिलांना यामुळे रोजगार मिळाला आहे.
कळंब येथे १५० चौरस फूट जागेत आम्ही व्यवसाय सुरु केला आहे. उत्पादित वस्तूंना मंचर, नारायणगाव, राजगुरुनगर भागातून चांगली मागणी आहे. बुकिंग केल्यानंतरच दुकानदारांना वस्तूंचा पुरवठा केला जातो. वाढती मागणी लक्षात घेऊन एक हजार २०० चौरस फूट जागेत या व्यवसायाचा विस्तार करण्यात येणार आहे.त्यासाठी बंकेकडून अर्थसहाय घेतले जाणार आहे. या उद्योगातून दहा महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी पुणे येथे भीमथडी जत्रेत पर्स विक्री स्टॉल उभारला होता. या स्टॉलला हस्तकला उद्योगात दुसर्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
(महान्यूजच्या सौजन्याने)
— बातमीदार
Leave a Reply