वारली चित्रशैली हे ठाणे जिल्ह्याचे वैभव. त्रिकोण, चौकोन, वर्तुळे आणि रेषा वापरून आदिवासी महिलांनी घरातल्या भिंतीवर ही चित्रे रेखाटली आणि आज या कलेला समाजमान्यता मिळाली. तांदळाचे पिठ पाण्यात कालवून तयार केलेला रंग व वेताच्या काडीला दाताने चावून केलेला ब्रश हिच या चित्रकलेची साधने. अशा या पारंपरिक कलेला बचत गटाने हातभार दिला आहे. त्यामुळे या कलेला नवसंजीवनी मिळाली आहे.
सिंधु संस्कृतीप्रमाणेच प्राचीन असणार्या वारली संस्कृतीत या कलेचा उगम इ.स.पूर्व २५०० ते ३००० या काळात झाला असल्याचे सांगितले जाते. आदिवासी वारली जमातीतील त्यांच्या चालीरीत, तारफा नृत्य, शिकारीचे दृश्य, मासेमारी, शेती मशागत, भात लागवड, भात कापणी, सण, उत्सव, झाडे, पाणी इत्यादींचा समावेश या चित्रात केला जातो.
मागील ४० वर्षापासून ही कला कागदावरच रेखाटण्यास सुरुवात झाली असली तरी ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रशैली कलाकार मात्र उपेक्षितच. यामुळे या चित्रशैलीचा उपयोग करून इथल्या मूळ कलाकारांना वाव देऊन वारली चित्रकला अधारित व्यवसायिक उत्पादने तयार करून या कलेची जोपासना करणे व या माध्यमातून आदिवासींना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पाच्या वतीने बचत गटाच्या माध्यमातून वारली चित्रशैली अभिवृध्दी कार्यक्रम हाती घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोराड येथील यंगस्टार बचतगट, नांदणी (ता.वाडा) येथील आदिवासी कलासागर बचतगट, खडखड (ता.जव्हार) येथील श्रीराम बचतगट या तीन बचत गटातील ३७ सदस्यांना जलस्वराज्य प्रकल्पाच्या वतीने पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे प्रशिक्षित करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी, यशदाचे सुमेध गुर्जर, सुमंत पांडे, मॅनेजमेंट कन्सल्टंट आनंद देसाई, डिझाईन एक्सपर्ट नचिकेत ठाकूर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, आगाखान
पॅलेस येथील शोभा सुपेकर, स्वंयसिध्दाच्या कौशल्या ठिगळे यांनी वारली चित्रशैली अभिवृध्दी या कलेच्या
व्यावसायिक वापर, वेगवेगळी उत्पादने या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
गावपातळीवर स्वत:चा छंद म्हणून कॅनव्हॉस कागद यावर वारली चित्रशैली रेखाटणार्या बचत गटातील सदस्यांना या कलेचा वापर करून आर्थिक लाभ मिळवणे शक्य आहे, हा आत्मविश्वास या माध्यमातून निर्माण झाला.
पुणे, मुंबई, ठाणे सारख्या महानगरातील शॉपिंग मॉलच्या सहकार्यातून या वस्तूंची विक्री होण्यासाठी प्रकल्पाच्या वतीने कार्यक्रम हाती घेतला असून राज्यभरातील वेगवेगळ्या मॉलमध्ये वारली चित्रशैली आधारित उत्पादने विक्रीला ठेवण्यात येणार आहेत.
बचत गटाच्या या सदस्यांच्या माध्यमातून या कलेला मिळालेला हातभार हा मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे सिमित ठरलेल्या या कलेला उभारी मिळेल, यात शंकाच नाही.
Mahanews
— बातमीदार
Leave a Reply