लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा.
गावात एकुलतं एक सलून असल्यामुळे नारुला बराच भाव होता. हा माणूस आधी रस्त्यावर बसून दाढया करायचा. दुसर्यांची डोकी कातरायचा. हे करून त्यानं पैसा मिळवला आणि मोठंच्या मोठं दुकान टाकलं. गिर्हाईकाला बसायला खुर्च्या आणल्या. कंगवे, स्नो, पावडर, आरसे कशाची कमी ठेवली नाही. तालुक्याला जाणारं गिर्हाईक नारुशेट म्हणत दुकानात यायला लागलं. सगळं व्यवस्थित होतं पण त्याला एक वाईट खोड होती. गिर्हाईकाच्या पिशव्या उघडून बघायची! गिर्हाईक खुर्चीत बसल्यावर त्याने ठेवलेल्या पिशवीत डोकावून बघणे हा त्याला छंदच जडला होता. माणूस पिशवीतलं काय घेणार नाही, पण पिशवी बघितल्याशिवाय सोडणार नाही. पहिल्यापासून त्याच्या हाताला वळणच पडलं होतं. त्यात त्याला काय आनंद मिळायचा देव जाणे! सगळेजण सांगून कंटाळले होते पण हा कुणाचेच ऐकत नव्हता.
एकदिवशी नारु दुकान बंद करायच्या घाईत होता तेवढयात “पटदिशी दाढी कर बाबा.” म्हणून गजा दुकानात घुसला. गिर्हाईकाला नाराज करणं नारुच्या नियमात बसत नव्हतं. गजानं गळयातली शबनम बॅग काढून कपाटाच्या दांडयाला अडकवली आणि दाढीसाठी तो खुर्चीत बसला. नारुनेही खुर्ची नीट करून गजाच्या गळयाभोवती नॅपकिन गुंडाळला. ब्रशवर क्रीम टाकली आणि नवीन पाण्याची वाटी भरून घेतली तेवढयात पंख्याच्या वार्याने पिशवी उगाच जराशी हलल्यासारखी झाली. नारुचे डोेळे चकाकले. आपण ह्याची पिशवी तपासायला कसे काय विसरलो याचे त्याला आश्चर्य वाटले. तो लगेच त्या पिशवीकडे सरकला. गजाला त्याची खोड माहित होतीच.
“नारबा, लेका लोकांच्या पिशव्या बघू नयेत.”
“एवढं काय सोनं असतं का त्यात?”
“सोनं असल्यावर तुझ्या दुकानात कशाला येईन मी? आणि काय असतं रे माझ्या पिशवीत? मागच्या वेळेलाही सगळयांच्या सोडून माझ्याच पिशवीमागे लागला होतास. लवकर सटकलो म्हणून बरं. नाहीतर…”
“मला एक कळत नाही, तुझ्या पिशवीकडं चालल्यावर तू का म्हणून घाबरतोस? काय गांजाबिंजाचे स्मगलिंग करतोस का काय तू?माझी उत्सुकता चाळवते ना अशामुळं!”
“उगंच पाल्हाळ लावत बसू नकोस. आधीच उशिर झालाय मला. दाढी कर लवकर.”
गजा खवळल्यावर नारु गुपचूप दाढीच्या मागे लागला. पिशवी तपासायला ही वेळ योग्य नाही हे त्याने बरोबर ओळखले. मग चांगला दम लागेपर्यंत गजाच्या दाढीला फेस काढला. बाजूला ठेवलेल्या पाकिटातलं ब्लेड मोडून वस्तर्यात घातलं. गडबडीनं एका बाजूनं दाढी ओढली आणि वस्तरा बाजूला ठेउुन तो गालातल्या गालात हसू लागला.
“आता आणि काय?”
“आता पिशवी बघतो की!”
“का?”
“आता आणून ठेवलीया एवढी तर बघायला नको?”
“नको.”
“वा वा! असं कधी होईल का?”
गजा काही बोलायच्या आत नारुनं ती बॅग हातात घेतली आणि जशी त्या झोळण्यासारख्या पिशवीची चेन ओढली तशी आतनं नागाची फडी बाहेर आली. तो भीतीनं ततपप करायला लागला. फणा उघडलेला नागोबा पुंगी वाजवल्यासारखा पिशवीतनंच डुलायला लागल्यावर नारु त्याच्यापुढं गारुडयासारखा घुमायला लागला. पिशवी टाकून द्यावी तर ही नसती बलामत दुकानात कुठल्यातरी अडचणीत घुसून बसेल ही भीती होती. बराचवेळ नागोबा आणि त्याची जुगलबंदी झाल्यावर मग गजाच अर्ध्या दाढीवरून उठला. त्यानं त्या खर्याखुर्या नागाची गुंडाळी केली, त्याच्यावर टॉवेल टाकला, बॅगेची चेन बंद करून ती पुन्हा होती तशी कपाटाच्या दांडयाला अडकवली आणि जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात तो पुन्हा येउुन खुर्चीवर बसला. नारु थंडी भरल्यासारखा कापत होता.
“माझ्या पिशवीला हात लावू नको म्हणून का सांगत होतो कळलं का? आणि आता नीट दाढी कर नाहीतर कापचील माझं मुंडकं!”
थरथरत्या हातानेच नारुने पटापट दाढी आवरली आणि गजाला कोपरापासून रामराम केला, “आता या राजं.”
“अन् काखेतले केस?”
टारकन काखेतनं वस्तरा फिरला.
“अरे बाबा, जरा बेतानं घे की. का करतोस इथंच आप्रेशन?”
“चल उठ उठ. झालं सगळं. आवर लवकर. निघ आता.”
“हो हो जातो. तुझे पैसे किती झालेत ते तर सांग.”
“पैसे नकोत बाबा तुझं. पण पुन्हा या नागोबाला घेउुन माज्या दुकानात येउु नकोस.”
“बरं झालं अद्दल तर घडली तुला. उगीच कुणाच्याही पिशव्या उचकटत बसायचास.”
“नाही बाबा बघत आता. तू निघ लवकर!” गजाला त्याच्या हलणार्या पिशवीसकट कधी एकदा दुकानाबाहेर काढतोय असे त्याला झाले होते.
गजा गेल्यावर तिथंच हे सगळं बघत बसलेला दामा म्हणाला, “नार्या लेका, गजा काय शहाणा माणूस आहे का? सगळया घरात साप खेळवतोय आणि तू त्याच्या नादाला लागलायस होय?”
“पण त्याला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? पिशवीतून कासरा नेल्यासारखा साप नेतोय ते. नेतोय ते नेईना का, दुसर्याच्या घरात तर ही पीडा सुटली तर काशी होईल का नाही सगळ्यांची?”
“सर्पमित्र का काहीतरी आहे म्हणे. सगळया घरात सापच साप आहेत. लोकं त्याच्या आजुबाजूला फिरकत नाहीत. सरपंच आणि पाटीलही या सापावरून त्याला टरकून असतात आणि तू चांगलं बाजारातनं कांदाभजी आणल्यासारखी त्याची पिशवी बघायला लागलायस.”
“मला काय माहित हा माणूस पिशवीतनं साप घेउुन हिंडतोय ते! आता कानाला खडा. आजपासून कुणाची पिशवी चुकूनही बघायची नाही बाबा. अद्दलच घडली म्हणायची आज!”
“शाबास भाद्दरा! यासाठी होउुन जाउुदे एक स्पेशल चहा.” असे म्हणत दामाने स्वत:च्या पैशाने चहाची आॅर्डर सोडली.
© विजय माने, ठाणे.
http://vijaymane.blog