प्रमोद माझा चुलत भाऊ. गांवाकडेच राहिलेला, शिकलेला. लहानपणी माझं गांवाकडे फारसं जाणं झालं नसल्यानं, मला माझा गांव आणि गावातले नातेवाईक तसे फारसे समजले नाहीत. परतु मी जरी गांवी जात नसलो तरी माझ्या गांववाल्यांचं मुंबईतल्यी माझ्या घरी येणं होत असायचं, म्हणून मला त्यातले काही माहित. प्रमोद, त्याचा थोरला भाऊ अरुण आणि या दोघांचे वडील बाळाप्पा त्यांच्यापैकीच एक. हे सर्व बोलके आणि माझ्या आई-वडीलांशी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध, म्हणून मलाही हे जास्त माहिती. पण तेवढंच. त्यांच्या वैयक्तिक जीवनात ते काय करतात, हे मात्र मला फारसं माहित नव्हतं.
मी हे का सांगतोय, तर माझ्या लेखाचा विषय असलेला प्रमोद आज टुरीझमच्या क्षेत्रातलं एक ठळक नांव होऊ पाहातंय. जे काही चांगलं दिसेल आणि तो जो काणी हे चांगलं काम करत असेल, तर त्याला आणि त्याच्या कामाला चार लोकांसमोर आणणं माझं कर्तव्य आहे म्हणून मला हे तुम्हाला सांगावसं वाटतं, माझा भाऊ म्हणून नव्हे..!
प्रमोदची कथा रोजगार नाही म्हणून रडणाऱ्यांना अतिशय उद्बोधक आहे. प्रमोदचा जन्म, शिक्षण सर्व गांवाकडेच. इयत्ता १०वी नंतर गांवातल्या लहानश्या भुसारी दुकानात काम करुन, तिथेच राहून प्रथम १२ वी व नंतर दूर शिक्षण पद्धतीने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. हे सर्व करेपर्यंत वयाची २२शी गाठली आणि नंतर कोकणच्या प्रथेप्रमाणे मुंबईला नोकरी. परंतू फिरण्याची अतोनात आवड. नोकरी सांभाळून जमेल तसं फिरायचं. अर्थातच हे फिरणं स्वान्त सुखाय असं होतं. स्वत:च्या आनंदासाठी फिरणं, पुढे भरभरून देणारा, कष्ट आणि नंतर यश असं दोन्ही देणारा व्यवसाय बनेल याची मात्र त्याला त्यावेळी यत्किंचितही कल्पना नव्हती.
प्रमोदला देवा-धर्माचीही आवड. त्यातून गांवातील इतर मंडळीच्या सहाय्याने लहानपणापासूनच गांवच्या देवळाच्या कामात रस घे, पुढे थोडं वय वाढल्यावर गांवात धार्मिक कार्यक्रम आोजित कर, तरुणपणी धार्मिक कार्यात पुढाकार घेणं सुरू झालं. यातून त्याच्यात बहुतेक उपजतच असलेल्या नेतृत्वगुणांना नकळत पैलू पडले असावेत, हे आताच्या प्रमोदकडे पाहून लक्षात येतं. अशातूनच एके दिवशी आपल्या नोकरीतून काही दिवस रजा घेऊन गांवातील ज्येष्ठ मंडळींना देवदर्शन करून आणावं म्हणून पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, अष्टविनायक, ११ मारुती अशा धार्मिक सहली काढण्यास सुरुवात केली..सुरुवातीला गांवातील लोकं, नंतर या लोकांची मित्रमंडळी, नंतर त्यांची मित्रमंडळी आणि मग यातूनच नोकरी सोडून लोकांना फिरवून आणण्याचा व्यवसाय सुरु करावा, अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि आजची ‘साळुंखे टूर्स अॅन्ड ट्राव्हेल्स’ ही कोट-दोनकोट रुपयांचा टर्नओव्हर असलेली संस्था उभी कधी राहिली, हे प्रमोदलाही समजलं नाही..
हे सर्व सहज घडलेलं नाही. त्यामागे आहे त्याची प्रचंड जिद्द, डोंगराएवढे कष्ट आणि हल्ली कुठेही न आढळणारा प्रामाणिकपणा. स्वत:च्या आनंदासोबतच सहलींचा व्यवसाय करायचं ठरवल्यावर काय काय होऊ शकतं हे माहित होण्यासाठी, स्वत: काही वर्ष अनेक कंपन्यांसोबत सहली केल्या. नंतर ज्या ठिकाणी सहल घेऊन जायचंय, त्या ठिकाणी स्वत: जाऊन आपल्यासोबत येणाऱ्यांना आपण आणखी चांगली सेवा देण्यासाठी आणखी काय काय करु शकतो, काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्यावर मात कशी केली जाऊ शकेल, याची चाचपणी केली. कमीत कमी पैशात दर्जेदार सेवा कशी देऊ शकतो याची आखणी केली आणि या सर्वांचं सार म्हणजे प्रमोदची आजची ‘साळुंखे टूर्स अॅन्ड ट्राव्हेल्स’ ही संस्था..
गांवाकडचं शिक्षण, अर्ध आयुष्य गांवाकडे गेलेलं, शुद्धतेच्या कोणत्याही निकषांत न बसणारं त्याचं ग्पामिण छाप असलेलं मराठी बोलणं, इंग्रजीचा आमच्या एवढाच गंध असणं, हिन्दीही कोणत्याही मराठी माणसासारखंच ‘पवार’फुल्ल, वागण्या-बोलण्यात कोणताही प्रोफशनल टच नसणं, हे काही काही प्रमोदच्या यशाच्या आड आलेलं नाही. याच कारण एकच, प्रमोदच्या सहलीत येणारा कुंटुबात असल्याचा येणारा फिल. अक्षरक्ष: आपण आपले आई-वडील, भाऊ-बहिणी, काका-मामा-आत्या वैगेरेसोबतच सहलीला जातोय असं वाटणं. पैसे मोजून आपण सहलीत आलोय असं चुकूनही कुणाच्या मनात येत नाही, हेच प्रमोदचं यश. कुटुंबात कुठे आपण प्रोफेशनल वागतो, अगदी तसंच. बरं या कुटुंबात गुरव, सावंत, दांडेकर, जोशी असे अस्सल मराठी असतात तसंच, चक्रवर्ती, गुप्ता, अगरवाल, स्वामीनाथन आणि पटेलही असतात. प्रमोदचं हे कुटुंब खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम’चा अनुभव देणारं असतं. प्रोफेशनलीझमचं नसणं म्हणतो, ते हेच. मी पैसे मोजलेत, मला हे मिळायलाच हवं असा आग्रह, क्वचित प्रसंगी दुराग्रह व्यवसायिक सहलीत असतो. थोडंही वावगं खपवून घेतलं जात नाही. प्रमोदच्या ट्रिपांत तसं होत नाही, कारण इथे प्रत्येकाची काळजी घेतली जाते. तक्रारीला जागाच नसते. एखादवेळी एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तुची उपलब्धता नाही होऊ शकत, हे या कुटुंबातले आपल्याच कुटुबात असल्यासारखं समजून घेतात. कुटुंबात कसं आपण प्रत्येकाला हवं नको त्याची काळजी घेतली जाते, समजून घतलं जातं, अगदी तसंच..! या उलट एखादी कबूल न केलेली गोष्टही सहल सदस्यांच्या चेहेऱ्यावर आनंद फुलावा म्हणून प्रसंगी खिशाला खार लावूनही केली जाते. हे ही कुटुंबासारखंच.
घरातल्या ७०-८० वर्षांच्या आजी-आजोबांच्यापासून ते ८-१० वर्षांच्या सदस्यांपर्संतच्या मधल्या सर्व वयाच्या सदस्यांच्या किमान गरजा वेगळ्या असतात, याचं भान ‘साळुंखे टूर्स अॅन्ड ट्राव्हेल्स’मधे आवर्जून ठेवलं जातं. प्रमोदचं यश आहे ते यातच..! बोलण्या-वागण्यातला आर्जवी प्रामाणिकपणा, लहानपणीच अनेक धार्मिक प्रवचनं-किर्तनं ऐकल्यामुळे अंगात बिंबलेला हजरजबाबीपणा, ग्रामिण भागात कळतं वय सरल्यामुळे प्रसंग निभावून नेण्याची आलेली क्षमता, विनोदाची अंगभुत देणगी हे त्याच्यातले जास्तीचे गुण…
प्रमोदला हा व्यवसाय सुरू करून आता१८ वर्ष झाली. मी ऐकून होतो, की प्रमोदने या क्षेत्रात उत्तम यश मिळवलंय म्हणून. पण असेल कुठेतरी लोकांना घेऊन जात असेल, असा लिचार करून ‘घर की मुर्गी दाल बराबर’ या न्यायाने मी काही फार लक्ष दिलं नव्हतं. याचं एक छोटसं उदाहरण थोडं विषयांतराचं पाप पत्करून देतो. मी नुकताच प्रमोसोबत द्वारका, सोमनाथची सहल करून आलो. या दोन्ही तिर्थक्षेत्री अलम देशातीन लोक येतात. त्या पैकी मला जे लोक भेटले, त्यांच्या बहुतेक तरुणांच्या मोबाईलच्या कव्हरवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र दिसलं. मी त्यांना असं का, म्हणून विचारलं. त्यावर त्यातील बहुतेकांनी ‘शिवाजी न होते, तो यह देश इस्लाम धर्मियोंका दुनिया कासबसे बडा धर्म होता और महराज के कारण वैसा हो न सका, इसलीये हम महराजजी को सदा याद करते है’ ह्या अर्थाचं वाक्य ऐकवून दाखवलं. महाराज आपल्यापेक्षा बाहेरच्यांनाच जास्त समजले. म्हणून तर आंध्रतल्या श्री शैलम येथे महाराजांचं देशातलं एकमेंव भव्य मंदिर आहे. आपण महाराजांकडे फक्त अस्मिता म्हणूनच पाहिलं आणि त्यांच्या स्मारकाच्या उंचीचं राजकारणच केलं. महाराजांविषयी आपल्यापेक्षा जास्त प्रेम मला महाराष्ट्राच्या बाहेरच दिसलं. असो, विषयांतर समाप्त. माझं प्रमोदबद्दल काहीसं असंच झालं होतं. प्रमोदसोबत सौराष्ट्रच्या सहलीसाठी मी गेलो, तेंव्हा मला प्रमोदने या क्षेत्रात केवढी उंची गाठलीय ते समजलं. आपल्या लाघवी वागण्याने, चोख व्यवहाराने आणि कौटुंबिक स्पर्शाने किती लोकं त्याने जोडलेत, ते स्वत: पाहिलं. नेहेमीचे लोक सोबत असुनही, ‘जाऊ दे, आपलेच आहेत’ असं न म्हणता, ते जणुकाही पहिल्यांदाच सहलीला आलेत, अशा पद्धतीने त्यांची सेवा करणारा प्रमोद मी पाहिला आणि मग प्रमोदकडे पाहाण्याची माझी दृष्टी बदलली. मी ज्याला घर की मुर्गी समजत होतो, तो खरंतर मोरापेक्षा कमी नव्हता. मला कोंबड्याची आरु आणि मोराच्या तुऱ्यातला फरक लक्षात नाही आला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, हे खरं..!
या सहलीतली बहुतांश लोकांची त्याच्यासोबत येण्याची ही किमान आठवी ते दहावी वेळ होती आणि ती पुढेही कायम राहाणार आहेत. हे उगाच होत नाही. सहल सदस्यांकडे ‘गिऱ्हाईक’ म्हणून न बघता, ‘फॅमिली मेंबर’ म्हणून पाहिलं, की मग अशी नाती घट्ट होत जातात आणि या कुटूंबात नवनविन सदस्य दाखल होऊ पाहातात..
एक गांवाकडे शिकलेला, वागण्यात गांवरान छाप असलेला माणूस आवड, जिद्द, चांगुलपणा आणि माणुसकीच्या जपणुकीच्या जोरावर काय करू शकतो, याचं प्रमोद हे जिवंत उदाहरण. नोकरी नाही, फारसं शिक्षण नाही, पाॅलिश्ड बोलणं नाही, देखणं व्यक्तिमत्व नाही की देखण्या कचाकड्या चेहेऱ्यांचे सहाय्यक/सहाय्यीका नाहीत, पाॅश वातानुकुलीत आॅफिस नाहीत, सफाईदार इंग्रजी नाही यासाठी रडत न बसता, आपल्याकडे जे आहे त्याचा उत्तम उपयोग करत प्रमोदने जे साम्राज्य उभारलंय , त्याला तोड नाही. धार्मिक सहलीनी सुरुवात केलेल्या प्रमोदने संपूर्ण देश पादाक्रांत करून आता पार परदेशातही पाऊल ठेवलंय. कौतुक म्हणजे या सहलींच्या कोणत्याही भडक, महागड्या जाहिराती न करता त्याच्या पुढच्या दोनेक वर्षांच्या सहली, त्याही सर्व सिझन्समधल्या, फुल्ल झाल्यायत, असं प्रमोद अभिमानाने सांगतो तेंव्हा मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही..
ही प्रमोदची जाहिरात नाही, कौतुक आहे. जाहिरातीची प्रमोदला गरज नाही. गेल्या २८ वर्षांत त्याच्यासोबत देश-परदेश पाहिलेले शेकडो ब्रान्ड ॲम्बॅसिडर्स ते काम स्वत:हून ते काम घरचं कार्य असल्यासारखं करताहेत..!!
-©नितीन साळुंखे
9321811091
Salunkhe Tours & travels
9869406514,9324559383
Email- salunkhetravels1@gmail.com
Leave a Reply