दुसर्याच सामन्यात त्रिशतक १९९६ : वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, आपल्या दुसर्याच प्रथमश्रेणी सामन्यात वसिम जाफरने सौराष्ट्राविरुद्ध राजकोटमध्ये नाबाद ३१४ धावा काढल्या. इतर कुणीही कारकिर्दीत एवढ्या लवकर त्रिशतक काढलेले नाही. मुंबईसाठी त्याने सुलक्षण कुलकर्णीसोबत ४५७ धावांची सलामी दिली. ‘घोडा तगडा आहे’ आणि भारताकडून तो नक्कीच खेळेल अशा भविष्यवाण्या तेव्हाच झाल्या आणि त्याप्रमाणे तो भारताकडून खेळलाही. फेब्रुवारी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण साजरे झाले. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला सातत्य टिकविता आले नाही. अझरुद्दीनच्या शैलीची आठवण करून देणारा फलंदाज अशी त्याची आठवण टिकून आहे. ३१ कसोटी सामन्यांमधून ५ शतकांसह १९४४ धावा त्याने काढल्या, सरासरी ३४.१०.
कांगारूंवर पहिला मालिकाविजय १९७९ : मालिकेतील सहावा सामना जिंकून भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. मुंबईत झालेल्या या सामन्यात कांगारूंना मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी विजय आवश्यक होता. सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांनी १९२ धावांची सलामी दिली. गावसकर आणि सय्यद किरमाणीने शतके काढली. संध्यारक्षक (नाईटवॉचमन) म्हणून खेळावयास येऊन शतक काढणारा किरमानी हा तिसरा खेळाडू ठरला. डावात पुढे क्रमांक नऊच्या करसन घावरीनेही कमाल करीत ८६ धावा काढल्या आणि भारतीयांनी ४५८ धावांचा डोंगर उभारला. त्याच्या पायथ्याशी असलेले कांगारू दबून राहिले. पहिल्या डावात फक्त ग्रॅहम यॅलप पंचविशीपार जाऊ शकला आणि दुसर्या डावात अलन बॉर्डर आणि किम ह्युजेस हे दोघेच दहाच्या भोज्याला शिवू शकले. एक दिवस शिल्लक असतानाच एक डाव आणि १०० धावांनी भारताने विजय मिळविला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply