चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी | प्रवेश भीतरी केला देवें ||१||
देव आला घरा नंदाचिया गांवा | धन्य त्याच्या दैवा देव आले ||२||
आले अविनाशी धरुनी आकार | दैत्यांचा संहार करावया ||३||
करावया भक्तजनांचें पाळण | आले रामकृष्ण गोकुळासी ||४||
गोकुळी आनंद प्रगटलें सुख | निर्भर ते लोक घरोघरी ||५||
घरोघरी झाला लक्षुमीचा वास | दैन्य दारिद्र्यास त्रास आला ||६||
आला नारायण तयांच्या अंतरा | दया क्षमा नरा नारीलोकां ||७||
लोकां गोकुळींच्या झाले ब्रम्हज्ञान | केलियावांचून जपतप ||८||
जपतप काय करावी साधनें | जे त्या नारायणें कृपा केली ||९||
केली नारायणे आपुली अंकित | तोचि त्यांचे हित सर्व जाणे ||१०||
सर्व जाणे एक विष्णू साच खरा | आणिक दुसरा नाहीं नाहीं ||११||
नाहीं भक्ता दुजे तिहीं त्रिभुवनी | एका चक्रपाणिवांचुनी त्यां ||१२||
त्याच्या सुखासंगे घेती गर्भवास | तुका म्हणे आस त्यजुनियां ||१३||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply