मागू तिला कसे मी ?
वृत्त :- आनंदकंद
लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा
गेली निघून कोठे ,गाठू तिला कसे मी?
घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी?
राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या
ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी ?
घालून पोत काळी,भेटावयास आली
हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी ?
चर्चा नको म्हणाली,गावात भेटल्याची
सोडून गाव जा तू , बोलू तिला कसे मी ?
कोमेजली फुलेही,यात्रेत घेतलेली
वेणीत माळण्याला ,देवू तिला कसे मी ?
रडणार ती उद्याला,माहेर सोडताना
बोलायला तिच्याशी,भेटू तिला कसे मी ?
© जयवंत वानखडे