आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले
येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले ।
कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला
पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला ।
तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला
ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला ।
तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला
अती आनंदे त्यास पाहता मम जीव सुखावला ।
ऊन पावसाचा खेळ हे लक्षण श्रावण मासाचे
त्यास जोडून येती दिवस किती गोड आनंदाचे ।
माहेरवाशीण कुणी वाट पाहते या श्रावणमासाची
मंगळागौर अन् नागपंचमी ही पर्वणी माहेरपणाची ।
असाच श्रावण सदा बहरु दे माझीया हो अंगणी
पियासंगे मग गाईन सखे मी मंजुळ गोड गाणी ।
सुरेश काळे
सातारा
मो. 9860307752
दि. २ सप्टेंबर २०१८