ध्यान ? कुणाचे ? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे यालाच ‘ध्यान’ म्हणतात. (objectless awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीना पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतु जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत चेतनामय असते, कार्य करीत असते त्यांचे कार्य थांबवणे हे फार कठीण. त्यांचे कार्य हे नैसर्गिक जिवंतपणाचेच लक्षण असते.
‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे असते, तसेच त्या मार्गाने एक शोध घेतला जातो. ज्यांना खऱ्या अर्थाने ध्यान लागते, त्यालाच त्या शोधाचे आकलन होते. येथे अनुभव निराळे, प्रचिती निराळी, फलश्रुती देखील भिन्न असू शकते. फक्त एक मात्र सत्य सर्व साधकांना सारखेच जाणवते आणि तो म्हणजे ‘नितांत आनंद, ब्रम्हानंद (Ecstasy of joy) संपूर्ण शांतता’ आणि हाच सत्याचा तो शोध असतो.
‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे हे जरी असले, तरी आम्हाला आमच्याच शरीर – मनाच्या प्रक्रिया कराव्याच लागतील. साधनाला साध्याकडे नेण्यासाठी ज्यामुळे आम्हीच आमच्या अंतरंगात अर्थात् देहाच्या आत प्रवेश करून अवयवांशी संवाद साधून आणि त्या सूक्ष्म मूळ घटक ज्या भागात सेल्स आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येऊन प्रत्येक विश्लेशनाची एक सूक्ष्म पायरी असते. ज्यावर भव्यदिव्यतेचा डोलरा उभा रहात असतो, त्या मूळ घटकांपर्यत आम्ही जाणीवेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न ‘ध्यानातून’ करणार आहोत. डोळे मिटून (वा उघडे – हे सवयीनंतर शक्य असते.) ध्यान धारणेसाठी आसनस्थ झाल्यावर जाणीव होऊ लागते की तुम्ही शरीराने स्थिर, अचल होत आहात. शरिराच्या अस्तित्वाची जाणीव कमी कमी होत जाते. फार प्रयत्नानंतर देहहीनतेचा भास होऊ लागतो. परंतु हे सारे असत्य आहे. कारण देहहीन झाल्याचा भास ही तुमची कल्पना असते. विचार असतो आणि विचाराचे अस्तित्त्व मन चंचल असल्याचे दाखवितो.
बैठक – माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी. मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धूत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले जाई. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपेपूर्वी. ध्यान बैठक लावण्यापूर्वी शक्य तेवढे शुचिर्भूत अर्थात शरीराने स्वच्छ होवून बसत असे. २० मिनीटांच्या बैठकीसाठी अलार्म लावून घड्याळ ठेवण्याचा सराव प्रथम केला गेला. नंतर सवय होत गेली व शेवटी वेळेचे बंधन गळून पडले. साधी मांडी घालून सहज अशा आसनांत बसत असे. पाठीचा कणा शक्यतो सरळ, त्याला उशीचा आधार होताच. दोन्ही हात समोर व मांडीवर घडी घातलेले असे. मान, दात (जबडे) थोडेसे अलग,जीभ कसलाही स्पर्श रहीत. न दाताला, न ओठाला, न गालाला स्पर्श केलेली अर्थात मला जी सुलभ, सहज व सरळ वाटली तीच बैठक मी अंगीकारत गेलो. प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या देहाच्या ठेवणी प्रमाणे, सवयीनुसार तो योग्य अशा बैठकीचा आसन म्हणून उपयोग करू शकतो. नियम हे मार्गदर्शक असले तरी स्वानुभव हेच अंतिम असावे.
संकल्प: हे ईश्वरी अनुष्ठान आहे. तो कृपा करेल का हे माहित नाही. परंतु त्याची कृपा व्हावी, दया व्हावी ही अपेक्षा करणे म्हणजेच एक विश्वास, श्रध्दा, भक्ती वा प्रेम व्यक्त केल्याप्रमाणे असेल. करू घातलेल्या कार्याच्या यशाबद्दल मनाची ती निश्चितता असेल. It shall be uplift of mind. मिळणाऱ्या आनंदाचे, समाधानाचे व शांततेचे स्वागत करण्याची ती मनाची तयारी असेल. तर करू या तसा संकल्प.
“ हे परमेश्वरा, आई, श्री जगदंबे, परमपूज्य श्री. गुरूदेव सर्वाना प्रणाम “
प्रार्थना – १) ओम् गं गणपतये नमः ……
२) सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते
३)गुरूः ब्रह्मा गुरुः विष्णू गुरूः देवो महेश्वरा, गुरूः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
तुम्हा सर्वाच्या कृपेची, दयेची व आशिर्वादाची मी अपेक्षा करतो. माझं मन शांत होण्यास मदत करा. माझ ध्यान लागू द्या. चित्त एकाग्र होऊ द्या. मला ईश्वरी सहवासाचा आनंद मिळू द्या. मनाची शांती प्रदान करा.
ओम् । ओम् । ओम् ।
नेहमीच्या सवयीप्रमाणे मन हे शरीराच्या बाह्यांगामध्ये रममाण असते. सभोवताल आणि देहाचा बाह्य स्पर्शेद्रिंय ह्याच्यामध्ये गुंतून असते. त्यामुळे सभोवतालच्या होणाऱ्या हालचाली, त्यांचे आवाज ह्याची जाणीव होत राहते. शरीराला काही भागात, पाठीला, पायाजवळ, मानेजवळ वा इतर ठिकाणी कळ लागते. अवघडल्याप्रमाणे वाटते, बधीरपणा वा मुंग्या आल्याचा भास होतो. काही भागात खाज येते, तेथील हालचाली जाणवू लागतात. ह्या सर्वाचे कारण चंचल मन त्या त्या अंगाजवळ संपर्क करते व सौम्य वेदनांची (uncomfortable feeling) जाणीव होते. मनाच्या शांत करण्याच्या प्रयत्नामधली ही बाधा असते. आपल्या सहनशीलतेमध्ये मनाच्या निग्रहाने वाढ करणे गरजेचे असते. रोजच्या संवयीने हे हलके साध्य होते. बाहेरच्या मिळत जाणाऱ्या चेतना तुम्ही प्रयत्नाने घालवू शकतात. तुमची बैठक यशस्वी होते. २० मिनीटे वा अर्धातास तुम्ही केलेल्या बैठकीचा संकल्प यशस्वी होवू लागतो. ह्या सर्व वेळेमध्ये तुम्ही स्थिर बसू शकता व तुमची बाह्यांगाची जाणीव कमी होवून जाते. ही तुमची स्थिर बैठकच ध्यानाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल असते. मनाला तुम्ही एकप्रकारे बाह्यांगातून अंतरंगात घेवून जाण्याचा यशस्वी प्रयोग असतो. मनाचा एक चांगला गुणधर्म म्हणजे मन जरी चंचल असले तरी ते तुमच्या इच्छेला साथ देते, विरोध करीत नसते. तुमच्या ‘मन शांत’ करण्याच्या प्रयत्नाना बाधा करीत नाही.
प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादात्म पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनाने एकदम परिपूर्ण. त्याच्या सांघिक कार्यप्रणालीची माहिती कळताच कुणीही आश्चर्यचकीत व्हावे इतके यात भव्य आणि दिव्य आहे. देहामधले अनेक अवयव (इंद्रिये) ही कोट्यावधी सेल्सनी बनलेली असतात. सेल्स अतिशय सूक्ष्म व देहाचा सर्वात लहान घटक भाग आहे आणि आश्चर्य म्हणजे जे कार्य संपूर्ण देहाकडून होत असते. तेच आणि तसेच कार्य त्या प्रत्येक सेल्सकडून केले जाते. जसे जगणे, वाढणे,मरणे,नष्ट होणे, उर्जा निर्माण करणे, तिचा उपयोग करणे इत्यादी. देह हा जशा ह्या बाबी पूर्ण करीत जीवन चक्र चालू ठेवतो, त्याच पध्दतीने ती एक स्वतंत्र सेल (Cell) देखील अशीच चक्रमय जीवन जगते. उर्जा निर्माण करणे व जीवन चक्रासाठी देणे हाच प्रमुख जीवन उद्देश.
आता मनला स्थिर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना, द्रव्य, समाधान, हालचाली,भावनिक आविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गिक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मतः मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होऊन शरिरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.
आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहित स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोखावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येऊ देऊ नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तित्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तिचे कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतु इतर विचारांना सारून चित्त एका दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे, केव्हां जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेऊन जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता. मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.
आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाश पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येऊ देऊ नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वाहत जाऊन एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल.
कॅलिडोस्कोपमधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा होते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी. हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वतःचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त डुबण्याचा असतो. येथपर्यत सीमित. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.
हवा नाकांमधून छातीत फुफ्फुसात जाते. निरनिराळ्या नलिकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो. एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करता. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होऊ लागते. मग ते फुफ्फुस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असो वा इतर कोणते इंद्रिय असो. सर्वांशी तुमची जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.
हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेषणात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतु जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हां हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलिकेतून रक्तपेशीपर्यत व पुढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चित नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहात आणि चेतनारूपी जिवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजिना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.
मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो.
— डॉ. भगवान नागापूरकर
bknagapurkar@gmail.com
९००४०७९८५०
Leave a Reply