पॅनकार्ड काढून बरीच वर्षे लोटली होती. मला पॅनकार्ड मिळाले त्याकाळात सरकार एका कोर्या पेपरवर ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो, त्यावर आपले, आपल्या बाबांचे नाव आणि बराच मजकूर छापून तो कागद लॅमिनेट करून द्यायचे. तो जीवापेक्षाही जपून ठेवावा लागत असे. त्या कार्डावरचा माझा फोटो साधारण तस्करीच्या धंद्यात नवीनच पडलेल्या माणसासारखा दिसत होता. शिवाय सुरवातीला पांढरे असणारे ते कार्ड वापरून वापरून तपकिरी रंगाचे झाले होते. त्याच्या तुलनेत नवीन येणारे कार्ड क्रेडिट कार्डसारखे चकचकीत दिसत होते, म्हणून नवीन कार्ड काढून घ्यायचे ठरवले.
सरकारी कामे करायचे आपण फक्त ठरवतो. सरकारी दरबारात सगळी कामे व्यवस्थित पार पाडायला एजंट शोधावा लागतो. एका ओळखीच्या मित्राकडून एजंटचा नंबर घेऊन त्याला भरपूर बोलवून झाले. तो काही केल्या यायला मागत नव्हता. मग त्याच्यावर भयंकर वैतागल्यावर एकदाचा तो आला. आल्या आल्या खुर्चीवरही न बसता गडबडीने उभ्यानेच त्याने मला एक फॉर्म दिला आणि भरून दुसर्या दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये जमा करायला सांगितला. खूप बिझी असल्याने मलाच कामाला लावून तो लागलीच सटकला. मी फॉर्म भरला आणि दुसर्यादिवशी सकाळसकाळी त्याच्या ऑफिसमध्ये जमा करून आलो.
दोन महिने उलटून गेले तरी एजंटचा फोन किंवा पॅनकार्ड यापैकी काहीच आले नाही. एजंटला फोन केला तर त्याचे भलतीच बातमी दिली. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन दिलेला माझा फॉर्मच त्याला सापडत नव्हता. उद्या सकाळी ऑफिसमध्ये या आणि शोधा असे सांगण्यात आले. पुन्हा दुसर्यादिवशी सकाळ सकाळी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. मी भेटलेल्या एजंटचा पत्ता नव्हता. बाजूलाच दोघेजण खाली मान घालून आपापले काम करत बसले होते, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणे बरोबर नव्हते.
त्यांच्या बाजूच्या टेबलावर एक नेहरु शर्ट घातलेला माणूस फोनवर काहीतरी खाजगी बोलत बसला होता. एवढया सकाळी लोक फोनवर निवांत गप्पा कशा मारतात देव जाणे! जरा दुपारचे जेवण झाले, ऑफिसमधल्या कामाचा भार हलका झाला, काही मोठे काम हातावेगळे केले किंवा साहेब कुठेतरी बाहेर गेले की केलेला फोन कारणी तरी लागतो. फोनवर त्याचे पाल्हाळीक बोलणे चालूच होते. मी त्याचा फोन संपण्याची वाट बघतोय हे लक्षात आल्यानंतर त्याने फोनवर “तुला नंतर फोन करतो, आता थोडी कटकट आली आहे.” हे बोललेले मला स्पष्ट ऐकू आले.
“नाव काय?” फोन ठेऊन त्याने आपला मोर्चा माझ्याकडे वळवला.
मी नाव सांगताच त्याने मला पटकन ओळखले. एजंटने बहुतेक मी येणार आहे म्हणून त्याला सांगून ठेवले असावे. मी कथा वगैरे लिहीतो ही आगाऊ माहितीही एजंटने त्याला पुरवली होती. त्याने मी लिहीतो याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. समोरून असे कुणी विचारले की साहित्याला बरे दिवस आले आहेत याचे समाधान वाटते. मी हो म्हणताच त्याला कमालीचा आनंद झाला.
मग पॅनकार्डचे बाजूलाच राहिले आणि त्याने त्याची ओळख करून दिली. तो एजंटचा मित्र होता यापेक्षा नवकवी आहे हे ऐकल्यावर मी खिशातला रुमाल काढून घाम पुसला. त्याने लगेच बसायचा खुर्ची दिली. बोलता बोलता नुकत्याच झालेल्या वुमन्स डे ला त्याने कुठली कविता म्हटली इथपासून तो चालू झाला. मध्येच पॅनकार्डची आठवण होताच एजंटला फोन करून पहा वगैरे मी माझी झुंज चालू ठेवली. एकंदरीत माझा उतरलेला मूड बघून मला चिअरअप करण्यासाठी त्यांने एजंटला कॉल लावला. त्यानेही फोनवरून माझा भरलेला फॉर्म टेबलावरच्या ट्रेमध्ये आहे का ते चेक करायला सांगितले. नवकवीने तो संदेश मला पास केला आणि स्वत: एजंटच्या खुर्चीत ऐसपैस बसला. अडल्या नारायणासारखा मीच माझा फॉर्म शोधायला लागलो. पेपर ना पेपर चाळून झाला पण फॉर्म मिळाला नाही. बहुतेक त्याने तो डबा खायला वापरला असावा! (डबा खाताना टेबल खराब होऊ नये म्हणून खाली कागद ठेवला जातो हे माहित नसणार्यांसाठी.) उद्या पुन्हा एकदा येऊन चेक करा असे मला सांगण्यात आले आणि नवीन कवितेचे पुराण सुरु झाले. शब्दांचे बाण नको असतानाही कानात घुसू लागले. बाजूची रिकामी खुर्ची उचलून डबल्यू डबल्यू एफ मध्ये घालतात तशी त्याच्या डोक्यात घालावी असे वाटू लागले.
आजुबाजूचे त्यांच्या टॉर्चरला सरावले असावेत. ते बिचारे खाली मान घालून त्यांची कामे करत होते. कवितेचे एक कडवे झाल्यावर मी वाह वाह करतोय की नाही ते बघायला तो मध्ये मध्ये थांबत होता. त्यामुळे थोडा वेळ गेला किंवा तो थांबला की “वाह वाह, क्या बात है!” वगैरे जलसाच्या बैठकीला बसल्यावर म्हणतात तसे म्हणावे लागत होते. चेहर्यावरून मला लवकर निघायचे आहे याची बाजूवाल्याला चाहुल लागली असावी. तो त्या नवकवीला म्हणाला, “अरे साहेबांना काय पाहिजे ते तर बघ पहिल्यांदा.”
“पाहिजे ते मिळाले नाही म्हणून तर त्यांना थांबवून घेतलंय. काय साहेब?”
मी गप्प बसलो.
“इफ यू डोंट माइंड…” म्हणून माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहू लागल्यावर मला गलबलून आले. कवी आपल्या कवितांचे जाडे बंडल सोडण्याआधी समोरच्या माणसाकडे असे पहातात असा माझा एक अनुभव आहे. पण हे लोक कविता ऐकवण्यासाठी ओळखीचा गैरफायदा घेतात ते मला बिलकुल आवडत नाही.
त्याने अजून एक अफलातून कविता ऐकवतो म्हटल्यावर मी ऑफिसमधल्या लोकांकडे पाहिले. लगेच तो म्हणाला, “या माणसांचे काही नाही. हा केरळचा जॉनी. जाम भारी माणूस आहे. काय जॉनी?” दोघांनी काय मारायची आहे ती झक मारा अशा विचाराने जॉनी हां हां म्हणाला.
“हा जांगो साहेबही आपलाच माणूस आहे.”
जांगोही मी आयताच कवीच्या तावडीत सापडलो म्हणून खुश झाल्यासारखा दिसत होता. आजचा दिवस तरी त्याला आराम मिळणार होता याचे समाधान त्याच्या चेहर्यावरून ओसंडून वहात होते. रोज त्या दोघांना काय झेलावे लागत असेल या विचाराने मला त्यांची दया आली.
“मग ऐकताय ना कविता?”
मी हो हो म्हणून भानावर आलो. लगेच फटकारणे आपल्या रक्तात नाही. फॉर्म मिळाला असता तर कविता ऐकायलाही काही हरकत नव्हती. पण तो मिळाला नव्हता आणि ह्याला कविता ऐकवायला जोर आला होता, त्यामुळे अस्वस्थ वाटत होते.
“माझा एक कवितासंग्रह काढणार आहे.”
“वा! कोण प्रकाशक पाहिला का?”
“मला पैसे देऊन कविता छापायच्या नाहीत. तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यावेळी कुठे होते प्रकाशक ? पण झालेच ना त्यांचे साहित्य प्रकाशित? आणि चारशे वर्षानंतरही आहे ना अजून त्यांचे साहित्य? वाचतातच ना लोक?”
मी त्या काळात का जन्माला आलो नाही याचे मला वाईट वाटले. पण एका अर्थाने बरे झाले! त्यावेळी विनोदी साहित्य एवढे डिमांडमध्ये नव्हते. उलट रामेश्वरशास्त्रींसारख्या लोकांनी -ज्यांच्यावर काही विनोदी लिहीले की, माझ्या वह्या नदीत वगैरे बुडवून टाकल्या असत्या.
एक कविता संपली की लगेच दुसरी चालू होत होती. घडयाळाचा काटा पुढे सरकत होता. ऑफिसमध्ये कविता ऐकायला कमी आणि मी बकरा झालोय हे बघायला बरीच गर्दी झाली होती. लोक त्याच्या कवितेला हसत होते की मला ते कळायला मार्ग नव्हता.
“आपण एक मंडळ काढूया आणि स्टेज प्रोग्रॅम करूया.” म्हटल्यावर मला रहावेना. हे लोक खूप धाडसी असतात यात वादच नाही. त्यांच्या मनात कधी काय येईल ते सांगता येत नाही, झटक्यात कार्यक्रमही करून टाकतील.
“मी म्हणजे कोरडे ओढतो समाजाच्या परिस्थितीवर. काय?” मला विचारण्यात आले.
हा माणूस पॅनकार्ड एजंटच्या ऑफिसमध्ये कसा या विचाराने मी हैराण होऊन त्याच्याकडे पहात राहिलो.
“काय ओढतो?”
“कोरडे.” मी.
“कोरडे म्हणजे काय?”
एकतर माझा घसा कोरडा पडला होता. आजबाजूला पाण्याची बाटलीही दिसत नव्हती, म्हणून त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मी तसाच बसलो.
“कोरडे म्हणजे … कोरडे! कमाल आहे, माहित नाही तुम्हांला?”
त्यालाही कोरडे म्हणजे काय ते सांगता आले नाही. आमच्या वर्गात कोरडे आडनावाचा एक मुलगा होता.
मग त्याने आई या विषयावर कविता म्हणून दाखवली. बिचार्या माऊलीने किती कष्ट करून त्याला शिकवला होता आणि हा लेकाचा त्या माऊलीला लांब कुठल्यातरी गावात सोडून मुंबईतल्या थंडगार एसी ऑफिसमध्ये कविता ऐकवत बसला होता. नंतर तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा काहीतरी करणार होता, पण ते नीटसे कळले नाही. प्लान छान होता. नंतर स्त्रीभु्रणहत्या या विषयावर तो चालू झाला. ते ऐकल्यावर सुटकेचा नि:श्वास टाकणार इतक्यात राधेच्या (कृष्णाच्या) मनाची व्यथा! हा स्त्रियांविषयीच्या कविता मला का ऐकवत होता देव जाणे!
“तुम्हांला सांगतो साहेब कवी, लेखक या लोकांना मागणी तसा पुरवठा असून चालत नाही. मनात आलं की ते लिहीलं पाहिजे. मग समाजाला घाबरून उपयोग नाही. आपल्यात ती धमक आहे. असे वास्तव लिहायला त्या माणसात घुसावे लागते.” असे म्हणत दोन खुर्च्यांमधून तो माझ्याकडे घुसला.
“मी राधेची व्यथा समजू शकतो, मी स्त्रीभु्रणहत्येच्या विरोधात दंड थोपटून उभा राहू शकतो, मी समाजावर कोरडे ओढू शकतो.” मला आमच्या शाळेतल्या कोरडेची पुन्हा आठवण झाली.
“तुम्ही कविता लिहीत नाही का?”
“नाही.”
“का?”
“मी गद्य लिहीतो.”
“मला कविता आवडते. कमीतकमी शब्दांत जास्ती जास्त अर्थ सांगण्याची किमया फक्त कवितेतच असते.”
“हो.” मी सपशेल हार पत्करली. पण तेवढयावर थांबेल तो नवकवी कसला?
“पटलं ना तुम्हांला?”
“हो हो. आमचे म्हणजे खूप स्पष्टीकरण द्यावे लागते.” चारी बाजूंनी पोलीसांनी घेरल्यावर डाकूलोक आपली हत्यारे जमिनीवर टाकतात तसे मी केले.
“अलिकडे मला लिहायला जाम मूड येतोय.”
“छान!”
“एक कवितासंग्रह काढायला किती कविता लागतात?”
काही अंदाज नसल्याने मी संभ्रमात पडलो.
“माझ्या पस्तीस लिहून झाल्या आहेत.” हे ऐकल्यावर मी खरोखर घाबरलो. त्याच्या आतापर्यंत सातआठच ऐकवून झाल्या होत्या.
“हो आरामात संग्रह निघेल.”
“बघा ना मग तुमच्या ओळखीचा कोण प्रकाशक मिळतो का ते!”
“बरं नक्की बघेन.”
“पण आपल्याला पैसे देऊन अजिबात संग्रह काढायचा नाही. नाही प्रकाशित झाला तरी चालेल. पण आपलेच पैसे देऊन पुस्तक काढलेले मला आवडणार नाही.”
मी गप्प बसलो. असा बाणेदार कवी माझ्या पहाण्यात नव्हता. पैसे न घेता पुस्तक काढणारा प्रकाशकही माझ्या ओळखीत नव्हता. मुळात एक प्रकाशक सोडला तर माझे पुस्तक छापायलाही तयार होणारा कोणी प्रकाशक नव्हता. बर्याचजणांच्या मागे “अहो माझे पुस्तक चांगले आहे, छापा की …” म्हणून लागत होतो पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता.
“आपला स्वभावच असा आहे. आपण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. लोकांना फटकळ वाटतो, पण त्याची आपल्याला पर्वा नाही.”
“अच्छा.” मी जाम बोअर होत होतो पण याचीही त्याला पर्वा नव्हती.
“सुरवासुरवातीला इथेही भांडणे झाली. पण आपण मागे हटणारे नाही. मिलीटरीतल्या सुभेदाराला नाकीनऊ आणले होते आणि इथल्यांची काय कथा!”
“मग?”
“मग काय…त्यांना कळून चुकले या माणसाच्या नादी लागून उपयोग नाही. हे रसायनच असे बनले आहे की काही विचारू नका. काय?” माझी केमेस्ट्रीही कच्ची असल्याने अजून काही विचारायच्या भानगडीत मी पडलो नाही. मिलीटरीतल्या सुभेदाराचा आणि ह्याचा संबंध कसा काय ते एकदा क्लीअर करायचे डोक्यात आले होते, पण मी माझा उत्साह आवरता घेतला.
“मी असे स्पेशल प्रोग्रॅम कुठे असतील, तिथे जातो. पहिल्यांदा थोडे भाषण करतो आणि मग आपल्या कविता काढतो.”
“अच्छा.”
“तुम्हांला सांगतो… वुमन्स डे ला हजार बाराशे बायका होत्या, ढसाढसा रडायला लागल्या कविता ऐकून.”
“ही खरी दाद…” काहीच्या काहीच! अशा बिकट परिस्थितीतून सुटका करून घ्यायला कधी कधी असे बोलावे लागते हे त्यात पडल्याशिवाय कळत नाही.
“मनातलं बोललात…” म्हणून त्याने दिलेली टाळी खूपच जोराने लागली. त्या न भेटलेल्या राधेचे मन ओळखणारा हा माणूस माझे मन का ओळखत नव्हता, काही कळत नव्हते.
विषय आवरता घ्यावा म्हणून मी निरोपाचे वाक्य बोललो, “भेटून खूप बरे वाटले.”
“मलाही खूप बरे वाटले.”
खरोखर त्याच्या चेहर्यावर आज आपल्याला कोणतरी खरा रसिक मिळाला हा तृप्तीचा भाव होता, केवळ ढेकर यायची तेवढी बाकी होती.
“चला तुम्हांला बाईकने सोडू का बसस्टॉपवर?”
त्याने असे विचारल्यावर मी घाबरलो, “नको. मीही बाईक घेऊन आलो आहे.” म्हणून हळूच त्याच्या ऑफिसमधून निसटलो आणि त्याचे लक्ष नाही बघून चालत बसस्टॉपच्या रस्त्याला लागलो.…
©विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog
Leave a Reply