बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं
काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी…१,
तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे
परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे….२,
शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला
मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला…३,
बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें
समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे…४,
मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे
मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये…५
शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा
पक्षावरती वर्चस्व गाजविण्या येईल तुज नशा…६,
जें जें कांहीं तुज नूतन दिसते ह्या जगते
धडपड करूनी सारे मिळवी प्रयत्न करूनी ते…७
मोठेपण मिळाले तुजला आपल्या बुद्धीने
दुरपयोग केलास त्याचा तूं आखूनी योजने…८,
तुला वाटते यश मिळविले आपल्या परिने
असहाय्य केलेस इतर जीवनां ह्या जगी जगणे…९,
पक्षी भाषा अवगत करणे साह्यासाठी नसे
भांडणे जुंपूनी आमच्यामध्ये गंमत बघत बसे….१०,
फसवे बोलत जवळीं घेवून आम्हा बंदी करी
विश्वासघात हा सहज स्वभाव दिसे तुझ्यापरी…११
कसा टाकूं मी दगड स्वत: माझ्या पायावरी
पक्षी होवूनी जर आलास तूं भाषा शिकवील सारी….१२,
भटकते पिल्लू तिच्या जवळीं दिसले मजला
शांत होवूनी चिमणी उडाली त्याच वेळेला….१३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply