परवा खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. शृंगार रस सुद्धा इतका विभोर करणारा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे गाणं. किती हळुवार प्रेमाचे एकएक पदर उलगडत जातात ह्या गाण्यात. लताबाईंचा आवाज आणि हृदयनाथांचे स्वर्गीय संगीत केवळ वर्णनातीत. शृंगार रसाचे हे गाणे आपण अगदी चार चौघात बसून ऐकू शकतो. मी तर हे गाणे माझ्या मुलीबरोबर पण ऐकले आहे. आम्ही बोललो आहे ह्या गाण्यावर. कधीच लाज नाही वाटली ह्या वर बोलतांना.
हल्ली सगळेच खुल्लमखुल्ला जगण्याचे पुरस्कर्ते झाले आहेत. त्यात काय एवढं? म्हणत हि पिढी आपल्यालाच नाकं मुरडते. पण प्रेम खरच चार लोकांना दाखवण्यासाठी आहे का हो? का चार लोकात करण्यासाठी? अगदी दुसऱ्याच्या भानगडीत आपण कशाला नाक खुपसा म्हंटल तरी मग चार लोकात नसते उद्योग करू नका ना, असं म्हणायची वेळ येते. आमच्या घराच्या मागे नदी आहे, नदी पलीकडे एक छान रस्ता आहे, दुपारी कधीतरी चुकून त्या रस्त्यावर गेलं तर खरंच सांगते तुम्हीच लाजाल इतके प्रेमाचे थेरं चालतात तिथे. थेरच… ते प्रेम नाहीच मुळी. घरा मागेच नदी असल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला जरा टेंशन असतं पाण्याची पातळी वाढली की. मग काय पाण्याची पातळी किती झाली हे पाहण्यासाठी आम्ही दोघे गेलो त्या रस्त्यावर, दोन मिनिटंसुद्धा तिकडे उभे राहता आले नाही. ‘कामातुराणां न भयं न लज्जा’. भर रस्त्यावर, अगदी दिवसा-ढवळ्या मिठ्या काय, चुंबन काय आणि काय काय? मला खरंच असं झालं की दोन मिनिटं थांबून त्या प्रेमवीरांना विचारावे, काय करताय बाबांनो? शिकता ? प्रेम म्हणजे काय हे तरी कळतंय का? असे किती दिवस एकमेकांना ओळखता? आणि तुमच्या प्रेमाची ओळख पटायला काय केलंत तुम्ही? का तुम्हला असा एकटा रस्ता निवडावासा वाटला? का एखाद्या कॅफेत गेल्यावर जे परिवार बरोबर येतात त्यांना तिथे बसवत सुद्धा नाही? इतकी कसली घाई आहे तुम्हाला ? प्रेम म्हणजे फक्त असे स्पर्श? बाकी काहीच नाही ? तो स्पर्श सुद्धा इतका वासनेने बरबटलेला? त्या स्पर्शाची सगळी गम्मतच घालवूं बसलात रे तुम्ही, असं ओरडून सांगावस वाटत होतं, पण ह्यातलं काहीच न बोलता आम्ही दोघेही मान खाली घालून तिथून माघारी फिरलो.
पण डोकं शांत बसे ना. असं वाटलं काय करून आपण ह्या नव्या पिढीशी संवाद साधू शकू? मग लक्षात आलं हा संवाद फक्त नव्या पिढीशीच नाही तर अगदी माझ्या वयाच्या पिढीशी पण तेवढाच गरजेचा आहे. आमच्या पिढीतही हे अनेक प्रकाराने दिसून येतं, विवाह बाह्य संबंध ह्याचेच परिणाम आहेत. आम्ही जसे मोठे होतं गेलो त्यावेळी आमच्या आई-वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, जी गोष्ट करतांना तुम्हाला चार-चौघात सांगायची लाज वाटेल, भीती वाटेल, आमच्या समोर आमच्या नजरेत नजर मिळवून तुम्ही त्या गोष्टीची चर्चा करू शकणार नाही ती गोष्ट नक्कीच वाईट/चुकीची असणार.
मला सिनेमा बघायला फारच आवडतं. पण सिनेमा बघतांना सुद्धा आपली विवेक बुद्धी जागृत असावी असा माझा अट्टाहास आहे. हल्लीच प्रदर्शित झालेला मुंबई पुणे मुंबई २ बघतांना मला जाणवलं का हा सिनेमा प्री मॅरेज कॉन्सेलिंग साठी एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. नातं हळू हळू उलगडण्यात जी मजा आहे , ती ओरबाडून घेतलेल्या क्षणिक स्पर्शात नक्कीच नाही. ओरबाडून घेतलेल्या म्हणतेय मी कारण अगदी दोघेही समजदार असले आणि समजून घडलेलं असलं तरी ते ओरबाडलेलं एवढ्या साठी की वेळेची गरज नव्हती, ती फक्त शरीराची गरज होती. आणि प्रेम शरीराच्या फार वर आहे.
स्पर्श किती हिम्मत देतो आपल्या जगण्याला. अगदी मायेने ओथंबलेला आईचा स्पर्श, शाबासकी म्हणून बाबांची पाठीवर थाप, भावा बहिणींचा एकमेकांना होणार मारामारीच्या वेळेचा स्पर्श, मित्रत्वाने भरलेला आश्वासक स्पर्श, बाळाचा आईला होणार गोड स्पर्श आणिकही कितीतरी. प्रत्येक स्पर्श भावानेच परिमाण घेऊन येतात आणि आपलं नातं अणिकच घट्ट विणत जातात. मग ह्या स्पर्शातले बदल आपली नवी पिढी समजू शकली नाही, की आपण पालक म्हणून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकलो नाही, हा प्रश्न उरतोच.
प्रियकर-प्रियसी, पती-पत्नी ह्या नात्यातले काही स्पर्श तर फार फार सुंदर असतात. प्रेमाची ग्वाही देणारे असतात. त्या स्पर्शात केवढी तरी ताकद असते, येणारे कितीतरी कठीण क्षण पचवण्याची, नात्यात आलेले चढ-उतार सहज पार करण्याची. त्या पहिल्या स्पर्शाच्या आठवणी किती तरल असतात, त्यात एकाच वेळी किती तरी भावना दडलेल्या असतात, ही स्पर्शची एकरूपता आपल्या अध्यात्मातल्या समाधी इतकी खोल आहे. त्याचा असा बाजार मांडून काय मिळणार?
“काय हा तुझा श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग”
आपल्या बोलण्याने, जे फक्त आपल्या दोघांचेच आहे, ज्याची दखल त्या चांदण्यांनी सुद्धा घेता कामा नये, इतकं हे पर्सनल आहे. इतकं हे त्या दोघांचेच आहे. मी नवीन पिढीला दोष देण्या आधी पालक म्हणून स्वतःला तपासून बघते. आम्ही आमच्या पुढच्या पिढी पर्यंत ह्या स्पर्शाची ताकद पोचवू शकण्यात कुठेतरी कमी पडलो म्हणून आमची मुलं तो स्पर्श आणि त्याचे न समजलेले अर्थ घेऊन वाहवत जातांना दिसतात.
मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग
© सोनाली तेलंग
२४/०७/२०१८
Leave a Reply