मलेरिया परोपजीवांचा इतिहास
मलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत. हळूहळू या किड्यात परिवर्तन होत डासासारखा कीटक जन्माला आला. त्या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात डासांमार्फत हे परोपजीवी शिरले असावेत. यानंतर या परोपजीवी ना आपले जीवन चक्र चालू ठेवण्यासाठी दोन सजीव प्राण्यांची, माध्यमे म्हणून वापरण्यासाठी गरज भासू लागली.
जसजशी नवीन प्राण्यांची उत्क्रांती होत गेली तसे डासांच्या मदतीने नवीन, अधिक नवीन प्राण्यात मलेरियाचे परोपजीवी पसरू लागले. यापुढील प्रगती म्हणजे मनुष्य सदृश माकडांच्या जाती, विशेषतः ओरॅंगडटॅंग, चिंपांसी व गोरिला यांच्यामध्ये मलेरिया परोपजीवीना आपले ठाण मांडण्यास सुरुवात केली.
नंतरच्या काळात मलेरिया परोपजीवात उत्क्रांती होत त्यांचे उपगट अस्तित्वात आले तेव्हापासून सस्तन प्राणी व पक्षी यामधील परोपजीवी निरनिराळ्या जातींच्या डासांमार्फत पसरण्यास सुरुवात झाली.
आदिमानवाला मलेरियाची लागण झाली असावी का नाही याबाबतचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मादी ॲनॉफेलीस डासाची व मलेरियाच्या परोपजीवांची उत्क्रांती जसजशी चढत्या क्रमाने होत गेली तसतसा माणूस हा मुख्य बळी ठरण्याची प्रमाण वाढत गेले आजमितीला त्यामध्ये कोणताही उतार पडण्याची चिन्हे दिसत नाहीत.
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply