विजू माने… मराठी चित्रपटसृष्टीतील प्रस्थापित नाव… जवळची नाती, आपलं काम यांना तो जीवापाड जपतो…
‘शिकारी’ या मराठी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चर्चा काही आठवडय़ापूर्वी पाहायला मिळाली. डबल मिनिंग असलेले संवाद हे या सिनेमाचे वैशिष्टय़ आणि म्हणूनच अडल्ट कॉमेडी असलेल्या या सिनेमाबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. एकीकडे ही सारी चर्चा सुरू असतानाच सिनेमातल्या संवादांवर, त्याच्या एकूण धाटणीकर सिनेमाचे निर्माते ठाम होते. उलटसुलट चर्चांना फाटा देत हा सिनेमा म्हणजे दिवंगत दादा कोंडकेंना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे असं ठाम मत निर्मात्यांचं होतं. या सिनेमाचा विजू दिग्दर्शक!
विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली. पुढे वृतसंकलन, लेखमाला यानंतर अनेक फोटोशूट, चलचित्रण यासाठी आम्ही एकत्र आलो. नाटकांच्या पब्लिसिटीच्या पोस्टर्सचं शूट, सिनेमांची निर्मिती, कंटिन्यूटी शूट, जाहिरातींसाठीचे फोटोशूटस् ते केबसीरिजसाठीचे शूट असा आमचा प्रवास वेगाने सुरू झाला आणि तो कधी थांबलाच नाही. या व्यावसायिक कामांखेरीज अनेक सामाजिक संस्थांमध्येही आम्ही एकत्र काम केलं. ही कामं, त्या कामांची गरज जरी केगळी असली तरी त्यातली एक गोष्ट सारखीच होती ती म्हणजे विजूची भूमिका. विजू आपल्या मतांवर ठाम असतो. त्या ठाम मतांचं कारणही त्याच्याकडे असतं. त्याला नेमकं काय करायचंय हे त्याने मनाशी पक्कं केलेलं असतं. या त्याच्या भूमिकेवर जोवर तो ठाम होत नाही तोवर त्याबाबतचा निर्णय तो घेत नाही, कामाला सुरुवात नाही, हेही तितकच खरं.
विजूने आजवर अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलंय आणि काही सिनेमांचं लिखाणही. ‘डॉटर’, ‘गोजिरी’, ‘ती रात्र’, ‘शर्यत’, ‘खेळ मांडला’, ‘बायोस्कोप’ (एक होता काऊ), ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ (आगामी) आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘शिकारी’ हे सिनेमे तर ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हे मराठी नाटक विजूने मराठी इंडस्ट्रीला दिलं. या सिनेमांपैकी ‘ती रात्र’, ‘शर्यत’, ‘खेळ मांडला’, ‘एक होता काऊ’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे सिनेमे आणि ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हे नाटक प्रत्यक्ष साकारताना मी पाहिलेत. या कलाकृतींच्या शूटसाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरलोय. यातील काही सिनेमांचं फोटोशूट, कंटिन्यूटी स्टील्स, पब्लिसिटी स्टील्स, मेकिंग असं काही ना काही कामं मी केलं आहे. ही कामे करत असतानाच मध्ये ब्रेक मिळाला की विजूचे अनेकदा पोर्ट्रेट मी टिपलेत… काहीवेळा त्याचे काही कँडिड फोटोदेखील मला टिपता आले. विजूचं व्यावसायिक अंग, त्याच्यातील कलाकार मला वेळोवेळी जवळून पाहायला मिळाला आहे. विजू कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय आहे तसाच तो नाती जपण्यातही. कधीही कोणाला न दुखाकता, वेळोवेळी योग्य तो मान राखत विजू नाती जपण्याचं काम सतत करत असतो.
विजूची शालेय वयापासूनच अभिनय क्षेत्रासाठीची धडपड चालू होती. अनेक एकांकिका, हौशी नाटय़ स्पर्धेंतून विजू अभिनेता म्हणून समोर आला. मात्र त्यानंतर त्याची ओढ अभिनेत्यापेक्षा अभिनेता घडवणाऱया कॅमेऱयामागच्या दिग्दर्शकाकडे जास्त निर्माण झाली आणि तो दिग्दर्शक म्हणून व्याव्यसायिक रंगभूमीकडे वळला. कॅमेऱयामागे सतत राहून विजू कलाकार घडवत होता आणि त्याची हीच भूमिका मला कॅमेराबंद करायची होती. याबाबत त्याच्याशी बोलून आम्ही एक शूट प्लान केलं. सकाळी लवकर मी त्याच्या घरी गेलो. कॉश्चुम्स कोणते असतील हे आम्ही ठरवले. त्यानुसार थीमदेखील ठरवली. त्याच्या राहत्या घरानजीक आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक शेत होतं. सहसा शहरात शेतीची जमीन पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच हे ठिकाण आम्ही शूटसाठी निवडलं होतं. या ठिकाणी असलेली हिरवगार शेतं, मोठी झाडं हे सारं शूटसाठी पूरक असंच वातावरण होतं. याच झाडांच्या हिरव्या-नैसर्गिक बॅकग्राऊंडकर विजूचे काही पोर्ट्रेटस् मी टिपले. तर यानंतर कॅमेऱयामागचा दिग्दर्शक टिपण्याचा प्रयत्न मी केला. यानंतर याच जागेजवळ एका नव्या इमारतीचं काम सुरू होतं. इथे लावलेल्या बांबूंमुळे एक चांगलं फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड मला मिळणार होतं. शिवाय हे बांबू आणि त्यांचा तपकिरी रंग हा खडतर प्रवासाचं प्रतीक म्हणून मी वापरायचं ठरवलं. अत्यंत खडतर प्रवासातून नेहमीच यशस्वीपणे मार्ग काढत असलेला विजू या बांबूच्या मध्ये ऐटीत उभा असलेला मी टिपला.
विजूचा आजवरचा प्रवास मी फार जवळून पाहिला आहे. विजूने आजकर पैशांपेक्षा नातीच अधिक जपली आणि म्हणूनच त्याच्या यशाच्या आलेखात त्याने किती संपत्ती आजकर जमा केली यापेक्षा त्याने किती माणसं आजकर जोडली याचीच आकडेवारी अधिक भरल्याचं दिसेल. आपल्या मतांवर नेहमीच ठाम राहून, काय करायचं आहे आणि काय नाही हे नक्की माहीत असलेला आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत नेहमीच नवनवीन करण्याची आकांक्षा उराशी बाळगलेल्या विजूचे आता एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे येऊ पाहत आहेत. त्याच्या या सिनेमाच्या आकडेवारीत उत्तरोत्तर वाढ होत जाईल आणि येणाऱया काळात एका अभ्यासू दिग्दर्शकाचं या इंडस्ट्रीला दरवेळी नव्याने ओळख होत राहील हे नक्की.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
— दैनिक `सामना’ मध्ये पुर्वप्रकाशित
Leave a Reply