ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलिया या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचा १ डिसेंबर १९४८ हा तिसरा दिवस होता. या दिवशी ८ बाद ३८२ धावांवर कांगारूंनी आपला पहिला डाव घोषित केला. पहिल्याच दिवशी डॉन ब्रॅडमनने १८५ धावा काढल्या होत्या. भारताचा पहिला डाव अवघ्या ५८ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार लाला अमरनाथ यांच्या २२ धावा डावात सर्वोच्च ठरल्या. अर्नी तोशॅकने अवघ्या अडीच ‘अष्टकांमध्ये’ (त्यातही १ निर्धाव) २ धावा देऊन पाच गडी बाद केले! भारताला फॉलोऑन मिळाला.
भारताचा दुसरा डाव सहाव्या दिवशी ९८ धावांवर संपुष्टात आला. २८ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या कसोटीत ३० नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस होता. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. तोशॅकने या खेपेला सहा गडी बाद केले पण त्यासाठी त्याला तब्बल १७ अष्टके गोलंदाजी करावी लागली आणि २९ धावा मोजाव्या लागल्या. कसोटीवीर असा सन्मान त्यावेळी नव्हता, असता तर तोशॅकलाच तो मिळाला असता.
भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्याच कसोटीत अशा रीतीने भारताला डावाने पराभव स्वीकारावा लागला. जामठ्यात संपलेला सामना जमेस धरता भारतीय संघाने आजवर ४४५ अधिकृत कसोट्या खेळलेल्या आहेत. यापैकी अवघा एकच सामना बरोबरीत सुटलेला आहे. उरलेल्या ४४४ पैकी १०८ सामने भारताने जिंकलेले आहेत तर १३८ सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झालेला आहे. विजयाची आणि पराभवांची टक्केवारी अनुक्रमे २४% आणि ३१% एवढी भरते. सुमारे साडेचव्वेचाळीस टक्के सामने अनिर्णित राहिले आहेत (१९८).
भारताकडून आजवर २६३ खेळाडू कसोटीवीर झालेले आहेत. वीरेंद्र सेहवागच्या ३१९ धावा ही एका डावातील भारतीयाची सर्वोत्तम कामगिरी आहे. सचिन तेंडुलकरच्या १४,३६६ धावा ही कारकिर्दीतील एकूण धावांमध्ये भारतातीलच काय, जगातील कोणत्याही कसोटीवीराची सर्वोत्तम कामगिरी आहे.
७४ धावांमध्ये १० बळी ही अनिल कुंबळेची
पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ही कुण्या भारतीय
गोलंदाजाची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी मात्र नरेंद्र हिरवानीच्या नावावर आहे- १३६ धाअवंमध्ये १६ बळी. कारकिर्दीत सर्वाधिक बळी अनिल कुंबळेने (६१९) मिळविले आहेत.
कारकिर्दीतील सर्वाधिक झेल राहुल द्रविडच्या नावे आहेत- १९९. यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक बळी सय्यद किरमाणीने मिळविलेले आहेत- १६० झेल + ३८ यष्टीचित मिळून १९८.
डिसेंबर २००९ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडिअमवर श्रीलंकेविरुद्ध उभारलेली ९ बाद ७२६ धावांची कामगिरी ही एका डावातील भारतीय संघाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. बेचाळीस धावा- लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध जून १९७४ मध्ये ही भारताची नीचांकी सांघिक कामगिरी.
परदेशातील कामगिरीचा विचार करता लक्षणीय गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला कधीही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या महिन्यात सुरू होणारी भारत-द. आफ्रिका मालिका या कारणामुळेच ‘इंडियाज् फायनल फ्रंटिअर’ अशी संबोधली जाते आहे. या मालिकेसाठी पूर्वाभ्यास चांगला व्हावा म्हणून काही प्रमुख खेळाडूंना द. आफ्रिकेमध्ये लवकर पाठविले जावे अशी सूचना प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केली होती आणि भारतीय मंडळाने ती मानली आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply