योग याचा शाब्दिक अर्थ आहे – एकत्र येणे किंवा एकत्र जुंपणे. त्यामुळे ज्यावेळेस आपण ‘योग’ हा शब्द उच्चारत असतो, त्यावेळेस त्याचा अर्थ आपले शरीर आणि मन एकत्र येणे असा घेतला जातो. योग हा प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी अंगिकारला त्याला आज ५००० हजार पेक्षाही जास्त वर्षे होवून गेली आहेत. त्या काळापासून ते आजपर्यंत योग अभ्यासला जातो, यातच याचे मोठेपण सिद्ध होते.
भगवत गीतेमध्येसुध्दा याचा श्रीकृष्णांनी उल्लेख केलेला आढळून येतो. योग पध्दती, या वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित आहेत. योगीराज पतंजलीनी यावर विशेष असे संशोधन करून आपल्या “योग सूत्रे” या पुस्तकातून त्या जगासमोर मांडल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार योगाभ्यासामध्ये आठ प्रकार दिसून येतात, ते पुढीलप्रमाणे होत – १) यम – आत्मसंयमन किंवा आत्मनियमन २) नियम – नियमावली ३) आसन – शारीरिक व्यायाम प्रकार ४) प्राणायाम – श्वसन पद्धती ५) प्रत्याहार – ध्यानाची तयारी ६) धारणा – मनाची एकाग्रता ७) ध्यान – मनाचे केंद्रीकरण ८) समाधी – निमग्नता किंवा तल्लीनता.
योगासनांमुळे आपल्या शरीरातील स्नायू उठावदार होत असतात. तसेच ग्रंथींचे कार्य देखील सुधारते. त्याचप्रमाणे प्राणायामांमुळे श्वासोच्छवासावर नियंत्रण केल्यामुळे शरीरातील प्राणवायूचे कार्य सुधारते. मोठ्या प्रमाणात प्राणवायू शरीरात घेतला जातो व त्यामुळे संपूर्ण शरीराचे कार्य देखील सुधारू लागते. इतकेच नव्हे, तर शरीरातील अनुकम्पित चेतासंस्थांचे देखील कार्य नीट होवू लागते. अशाप्रकारे एकंदरीतच संपूर्ण शरीराचे व श्वसन संस्थेचे कार्य नीट होवू लागल्यामुळे आपले शरीर तर निरोगी होतेच, परंतू मन देखील निरोगी होवून त्याचा लाभ मनाची एकाग्रता वाढविण्याकडे होवून समाधी स्थिती गाठणे सहज शक्य होत असते. याचाच अर्थ असा कि आपण शारीरिक आणि मानसिक स्थितीने निरोगी होतो इ आध्यात्मिक दृष्ट्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग अवलम्बितो.
योगाचे अनेक प्रकार असून हठ योगामध्ये शारीरिक हालचाली, शरीराची ठेवण आणि श्वासोच्छवासाच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. हठ योग, यामधील हठ हा संस्कृत शब्द असून, या शब्दाचा अर्थ ‘ह’ म्हणजे सूर्य व ठ म्हणजे चंद्र असा आहे. सूर्य आणि चंद्र हे आपल्या जीवनातील परस्पर विरोधी घटक आहेत. आणि हेच परस्पर विरोधी घटक आपल्या शरीरात असणा-या इडा आणि पिंगळा या नाडीने ओळखले जातात. इडा नाडी ही चंद्राचे प्रतिनिधित्व करीत असते, तर पिंगळा हि नाडी सूर्याचे प्रतिनिधित्व करीत असते.
……….पुढे चालू ………
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply