२१ वर्षांपूर्वी या तारखेला ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज हा एदिसा खेळविला गेला. बेन्सन अँड हेजेस विश्वमालिकेतील हा दुसरा सामना होता. विंडीज कर्णधार क्लाईव लॉईडने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी कर्णधार माईक ब्रिअर्लीला फलंदाजीचे आमंत्रण दिले. निर्धारित ५० षटकांमध्ये इंग्लिश संघाने ८ बाद २११ धावा काढल्या. पावसामुळे विंडीजच्या फलंदाजीची ३ षटके कमी झाली आणि विंडीजला ४७ षटकांमध्ये विजयासाठी १९९ धावांचे आव्हान देण्यात आले.
शेवटच्या चेंडूवर विंडीजला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती आणि क्रमांक अकराचा फलंदाज कोलिन क्राफ्ट टोल्या टोकाला उभा होता. गोलंदाज होता इअन बोथम. गोलंदाज बोथम आणि समोर क्र. ११ चा फलंदाज असूनही माईक ब्रिअर्लीने एक अजब चाल या सामन्यात केली. डेविड बेअरस्टॉ या यष्टीरक्षकासह दहाच्या दहा खेळाडूंना (गोलंदाज वगळता) त्याने सीमारेषेवर उभे केले, चौकाराची शक्यता मोडीत काढण्यासाठी ! त्या अखेरच्या चेंडूवर क्राफ्ट सरळसरळ त्रिफळाबाद झाला आणि दोन धावांनी इंग्लंड विजयी झाले.
माईक ब्रिअर्लीचे कृत्य नियमांमध्ये बसणारे असूनही त्याच्यावर सडकून टीका झाली. इंग्लिश संघाचे हे कृत्य अखिलाडू असल्याचेही म्हटले गेले. त्यानंतर थोड्याच कालावधीत क्षेत्ररचनेबाबत काही नियम घालून देण्याबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आणि आज अस्तित्वात असलेल्या क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधांचा (फिल्डींग रिस्ट्रिक्शन्स) जन्म झाला.
१९९६ च्या विश्वचषकामुळे या निर्बंधांना तुफान लोकप्रियता लाभली. तिकडे वळण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानातील काही वर्तुळाकार रेषा समजून घेणे आवश्यक आहे. फलंदाज जिथून खेळतात त्या जागेला केंद्रबिंदू मानून ३० यार्ड एवढ्या त्रिज्येचे एक वर्तुळ आखले जाते. हे वर्तुळ अंतःक्षेत्र (इन्फील्ड) आणि बाह्यक्षेत्र (आउटफील्ड) यांना अलग करते. अंतःक्षेत्राचाही खेळपट्टीच्या लगतचा १५ यार्ड त्रिज्येचा भाग हा ‘निकट अंतःक्षेत्र’ (क्लोज इन्फील्ड) म्हणून
ओळखला जातो.
डावाच्या पहिल्या १५ षटकांमध्ये ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक
असावेत आणि दोन क्षेत्ररक्षण झेलघेऊ स्थानी (कॅचिंग पझिशन्स) असावेत असा नियम सर्वप्रथम करण्यात आला. झेलबाद होण्याचे भय कमी होऊन फलंदाजांना जास्त चौकार-षटकार मारण्यास प्रोत्साहन देणे आणि जास्त प्रेक्षकांना खेळाकडे वळविणे हा या निर्बंधांमागील उद्देश होता.
जुलै २००५ पासून पावरप्ले नावाचा प्रकार अस्तित्वात आला. क्षेत्रनिर्बंध आता २० षटकांपर्यंत वाढविण्यात आले आणि त्या षटकांची १, २, ३ अशी टप्पेवारी करण्यात आली.
पावरप्ले १ : पहिली दहा षटके. ३० यार्डाबाहेर दोनच क्षेत्ररक्षक आणि दोघेजण कॅचिंग पझिशन्समध्ये.
पावरप्ले २, ३ : पूर्वी ५-५ षटकांचे हे टप्पे कधी घ्यायचे ते क्षेत्ररक्षण करणार्या संघाचा कर्णधार ठरवीत असे. २००८ पासून मात्र फलंदाजी करणार्या संघाला एक पावरप्ले घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पहिल्या दहा षटकांनंतर कधीही हे पावरप्ले घेतले जाऊ शकतात मात्र दोन्ही टप्पे एकाच वेळी घेतले जाऊ शकत नाहीत. दोघा कर्णधारांनी चाळिसाच्या षटकापर्यंत पावरप्ले घेतलेले नसल्यास ४१-४५ आणि ४६-५० ही षटके पावरप्ले बनतात. दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात तीनच क्षेत्ररक्षक ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर राहू शकतात. कॅचिंग पझिशन्सबाबत मात्र कोणतीही अट या टप्प्यांमध्ये नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply