नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला.
त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. साहित्य हा त्यांचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते.
अखेर जमलं या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. राजा नेने ह्यांच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. त्यानंतर फिल्मिस्तान या संस्थेत त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली.
त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. आलिया भोगासी, पहिले प्रेम, पतिव्रता, सप्तपदी, ह्याला जीवन ऐसे नांव, हा माझा मार्ग एकला इ. अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. १९६३ साली दिल्या घरी तू सुखी रहा हे रंगभूमीवर आलेले नाटक खुपच गाजले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली बरीच नाटकं यशस्वी झालीत. शंभराच्यावर त्यांचे प्रयोग झाले.
स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले उद्याचे जग हे कालेलकरांचे पहिले नाटक. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा. अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं.
सहज भाषा आणि पकड घेणारे संवाद त्यामुळे ही नाटकं चित्ताकर्षक ठरली.
मधुसूदन कालेलकर यांचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply